Friday, January 16, 2009

सा-रे-ग-म-प चा निर्णय, प्रेक्षकांची पसंती का फसवणूक?

सा-रे-ग-म-प ने मागच्या आठवड्यात कार्यक्रमातून स्पर्धेचं स्वरूप काढून टाकलं आणि अनेकांना हायसं वाटलं। हा निर्णय बहुजनहिताय-बहुजनसुखाय असल्याचं दाखवण्यात ही आलं. सर्व स्पर्धकांना, त्यांच्या पालकांना हा निर्णय आवडणं हे समजण्यासारखं आहे. मात्र सगळ्यांनाच महा-अंतिम फेरीची दारं ऊघडून झी-मराठी ने प्रेक्षकांच्या मताला आणि पसंतीला मान दिल्याचा आव आणला आणि प्रेक्षकांना गंडवलं.

ह्या मुलांनी हा रेकॉर्ड केला आहे, सा-रे-ग-म-प च्या इतिहासात हे प्रथमच घडतंय वगैरे डायलॉग्स ऍकून भारावून जाणार्‍या प्रेक्षकांच्या साधेपणाचा मला हेवा वाटतो. कदाचित फार शंकेखोर स्वभाव असल्याने असेल, पण जे घडतंय ते तसंच असेल हे मानायला सहजासहजी तयार होण्याकडे माझ्या स्वभावाचा कल नाही. सा-रे-ग-म-प आणि झी-मराठी जो निरागसतेचा आव आणतंय तो मला तितकासा पटत नाही.

निर्णयाबाबत न समजणारे काही मुद्दे असे
१. महा-अंतिम फेरी मध्ये पाचच का? सहा का नाही? असं होतं तर शाल्मली ने काय घोडं मारलं? बरं एक आठवड्यापूर्वी परिस्थिती निर्णय घेण्यासारखी होती मात्र पाच जण ऊरल्यावर ती अवघड झाली असा बदल होण्यासारखं विशेष काही घडलं नाही.
२. जर का आज पाच मधून बाद कोण होणार ह्याचा निर्णय करणं शक्य नाही तर अजून काही दिवसांनी पाच मधलं सर्वोत्कॄष्ट कोण हे ठरवणं कसं जमणार आहे?
३. स्पर्धेचं स्व्ररूप "बाद-फेरी" असं होतं आणि केवळ आपला आवडता स्पर्धक बाद होऊ नये म्हणून प्रेक्षक त्याला मत देत होते. म्हणजे "अ" ऐवजी "ब" ने बाद व्हावं म्हणून प्रेक्षक "अ" ला मत देत होते. जर का "अ" आणि "ब" दोघेही अंतिम फेरीत जाणार हे माहित असेल तर देणार्‍याने एस-एम-एस चे पैसे वाया घालवले असते का? आयडिया ने ह्या प्रकारात किती एस-एम-एस लाटले ह्याचा विचार करा. आजवर ह्या पाचांना, इतर चारांपैकी दुसर्‍या कोणाही पेक्षा जास्त मत मिळावं ह्यासाठी आलेला एस-एम-एस हा निरूपयोगी ठरला. आयडिया ला पैसे मिळाले. आणि तो आम्ही अंतिम निर्णयासाठी मोजू अशी मखलाशी आता ही मंडळी करत आहेत. पण ही फसवणूकच ठरते.
४. अवधूत वैशाली ह्यांनी निर्णया च्या वेळी एकदम नाटक करणं, तेव्हाच अंतिम स्पर्धेसाठी ठरलेल्या "ज्यूरी" ची मतं दाखवणं हे सगळं पाहता, हे सगळं आयत्या वेळी ठरलं हे दाखवणं म्हणजे गंमत आहे. हा असा निर्णय घेतला जाणार हे खरंतर तेव्हाच दिसत होतं.

कोणी मला माझ्या मते ह्या पाचांचा क्रम लावायला सांगितला तर तो प्रथमेष, आर्या, कार्तिकी, मुग्धा आणि रोहित असा आहे. बाकीच्यांच्या मते क्रम वेगळा असेल. मुद्दा हा आहे की अनेक लोकांच्या मनात एक ठराविक अग्रक्रम पक्का झाला असेल. पाचातलं कोण चांगलं आणि कोण वाईट हे कळतच नाही असं सांगणारे फार असायचं कारण नाही. अनेक बायका साड्यांच्या दुकानात गेल्या की ही घेऊ का ती, अशा प्रश्नात पडतात पण दुकानातून बाहेर पडताना त्या पाच साङ्या घेऊन येत नाहीत कारण प्रकाशात नेऊन, नेसवून, पदर ऊघडून पाहिल्या की साडी बरोबर आवडही ऊलगडत जाते. (एक ही न आणणारी तुम्हाला भेटली असेल तर तुम्ही नशीब काढलंय!) सा-रे-ग-म-प ने प्रेक्षकांना एवढी समज नाही असं गृहित धरलंय.

असं का घडलं असावं ह्याचा अंदाज लावता येऊ शकतो.

१. लोकप्रियता आणि क्षमता ह्याचा मेळ घालणं कठीण होत गेलं. मुग्धाला दे मार एस-एम-एस मिळाले, आर्याला फारच कमी. मग सा-रे-ग-म-प ने हे सांगून टाकलं की ह्या वेळी शेवटपर्यंत परीक्षकांच्या मताला अर्धी किंमत असेल. आता झी ची अशी गोची झाली की लोकप्रिय मुग्धाला किंवा रोहित ला काढलं तर भविष्यातले एस-एम-एस गेले. आणि सक्षम आर्या किंवा प्रथमेष ला काढलं तर कार्यक्रमाची रंगत गेली.त्यापेक्षा त्यांनी एकदम सोपा ऊपाय काढला.
२. स्पर्धकांच्या यशाच्या आणि लोकप्रियतेच्या व्यावसायिकरणाची संधी. पाचही स्पर्धक पुढे नेऊन ती अधिकाधिक होतेय. ह्या आधी कोणत्याच स्पर्धेला ईतकं यश आणि लोकप्रियता मिळाली नाही. कोसंबी-अनघा-बोरगावकर, राघवन-ओक, ४० शीतलीमंङ़ळी .. आठवून पहा, एवढी लोकप्रिय झाली नाहीत. आता हे लोणी निसटू देणं झी आणि आयडिया ला पटलं नसावं.

ह्या अशा व्यावसायिक गोष्टींमुळे हा निर्णय घेण्यात आला असं मला वाटतं. झी, आयडिया आणि त्यांची धेडगुजरी मराठीत बोलणारी पल्लवी ह्यांनी हे सगळ्या प्रेक्षकांच्या आवडीने करण्यात आलंय असा ऊपकाराचा कितीही आव आणू दे.

Thursday, January 15, 2009

अमर जी ओक, एक कार्यक्रम करता का?

अमर जी ओक तुम्ही गेले दोन दिवस दिसला नाहीत. आम्हाला रूखरूख वाटली. तुम्ही विदर्भात कार्यक्रम केलात. पुण्याला ही एक करून टाका की राव. तुम्ही आमचे फेवरिट आहात. एक कारण म्हणजे आम्हाला तुमचं बासरी वादन लई आवडतं. दुसरं तुम्ही काँम्पुटर ईंजीनीअर, आमच्या क्षेत्रातले म्हणून आम्हाला अजूनच जवळ. आणि तिसरं म्हणजे तुम्ही आमचा प्रॉब्लेम सोडवू शकता असं आम्हाला कळलंय. सकाळ च्या विदर्भ पुरवणीत आम्ही हे वाचलं बघा.


आमची सौभाग्यवतीही आमच्याची रोज कचाकचा भांडते. तिला घेऊन आलो तर "एका दगडात दोन पक्षी." बासरीने कान तृप्त ही होतील आणि नंतरच्या काही दिवसाच्या शांततेने त्या सूरांची जादू तशीच टिकून हीराहील

Monday, January 12, 2009

वसंतोत्सव आणि सा-रे-ग-म-प स्पर्धकां संबंधी

ह्या वर्षी मी वसंतोत्सवाला गेलो नाही. जावसं वाटलं नाही. मागच्या वर्षी आलेला अनुभव आणि इतर काही संबंधीत विचार, ही कारणं. कदाचित काही वाचकांना पटावीत.

१. मागच्या वसंतोत्सवात नाना ने वाजवीपेक्षा जास्त बोलून बोअर केलं. निदान मला तरी बोअर झालं. त्यात त्याने प्रेक्षकांचा अपमान केला. एका श्रोत्याने "वन्स-मोअर" दिला. नाना म्हणाला "केवळ आपण तिकिट काढलंय ह्याचा अर्थ आपण काहीही फर्माईश करावी का? आधी स्वतः काहीतरी होऊन दाखवा." मला कळलं नाही. म्हणजे काय? एकतर हा श्रोता त्याच्या पेशात, क्षेत्रात मोठा नसेल कशावरून? समजा नसला, तरी पैसे देऊन कार्यक्रमाला आल्यावर वन्स मोअर द्यायचा त्याला हक्क नाही? आणि नसेल तर त्याचा असा अपमान करण्याचा अधिकार पाटेकरांना कोणी दिला? नाना हा कलाकार म्हणून श्रेष्ठ आहे ह्यात काहीच वाद नाही. पण एकंदर अशा बडबडीमुळे एकंदर कार्यक्रमाविषयीचा आदर कमी झाला.
२. राहुल देशपांडे च्या गाण्याला मागे साथीला डॉ. विजय कोपरकर बसले होते. राहूल हा वसंतरावांची सगळीच गाणी हूबेहूब आणि छान म्हणतो. पण अभिजात शास्त्रीय संगीतामध्ये त्याला बराच पल्ला अजून गाठायचा आहे. मला तरी हे हरभजन सिंग ने सचिन तेंडूलकरला रनर म्हणून घेतल्यासारखं वाटलं.
३. सवाई गंधर्व शी स्पर्धा. ती जरूर असावी आणि करावी. पण किती कराल, आणि किती घाई? विकिपीडीयाच्या पूणे पेज वर भला मोठा भाग "वसंतोत्सव" वर टाकाल? माझ्या मित्राने चीड येऊन तो ताबडतोब काढून ही टाकला. (हे एक विकिपीडीयाचं खूप छान आहे).
४. सा-रे-ग-म-प च्या बालकलाकारांचा कार्यक्रम आयोजित करणं. बरेच जण म्हणतील की ह्यात चूक ते काय? तसं पाहिलं तर काहीच नाही. आपला कार्यक्रम यशस्वी ठरावा आणि त्याने गर्दी खेचावी ह्या साठी वसंतोत्सव ने सर्वतोपरी प्रयत्न केले तर त्यात काहीही वावगं नाही. हे बालकलाकार गातात छानच. पण त्यांना आपण किती गायला लावावं? दर आठवड्याला गाऊन गाऊन त्यांचा आवाज थकलेला अधून-मधून जाणवतो. भारतीय क्रिकेट टीम ची मध्ये जशी क्रिकेट बोर्डाने एकामागोमाग एक वन-डे सिरीज खेळायला लावून अवस्था केली तसंच हे होतंय.

ही मुलं प्रचंड क्षमता आणि आकलन शक्ती घेऊन जन्माला आली आहेत. ईथून पुढची त्यांची वर्ष ही सरावाची आहेत. स्वतःचा आवाज, शैली शोधण्याची आणि तयार करण्याची आहेत. ते आपण त्यांना करू दिलं तर आपल्या आवाजाने ते पुढची अनेक तपं रसिकांची सेवा करतील. मात्र आपण त्यांना आत्ताच ह्या व्यावसायिक स्पर्धेत ओढलं तर त्यांचं करियर दाजीबासारखी चार गाणी आणि ऊरलेला वेळ ती ऑर्केस्ट्रा मधून गात राहणं ह्याच्या पलिकडे जाणार नाही. कदाचित आज वसंतराव असते तर वाडकरांसारखाच् ह्या मुलांनी अजिबात कार्यक्रमांच्या फंदात न पडता अभ्यास चालू ठेवावा असा सल्ला त्यांनी दिला असता. मात्र एवढी बांधिलकी दाखवणं वसंतोत्सवाने गरजेचं मानलं नसावं.

कार्यक्रम सुंदर झाला असं लोकसत्ता मधून वाचण्यात आलं.

Saturday, January 10, 2009

बातम्यांचे जन्म आणि त्यासंबंधीचे विषयांतर

विषयांतर हे "संबंधीचे" कसे असेल? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तो सोडवा, आज रविवार आहे, तुम्हाला नेहेमीपेक्षा जास्त रिकामा वेळ असणे अपेक्षित आहे. आणि रिकामटेकडे नसूनही हा ब्लॉग वाचत असाल तर आम्ही आणि आमचा मोत्या तुम्हाला हसतो आहोत. असो. आज आमचा घसा बसला आहे. त्यामुळे जीभेवरच्या सरस्वतीला आराम देऊन बोटांमधल्या गणेशाला आम्ही कामाला लावतो आहोत. (आजच्या आत्मप्रौढीत ऊद्याच्या लोकप्रियतेची बीजे असतात हे सिनेसृष्टीकडून मिळालेले बाळकडू पिऊन आमचा शम्मी कपूर झाला आहे. असो.) बोलण्याचा डेफिसिट लिहीण्यातून भरुन काढताना मूळ मुद्द्यापासून भरकटणे क्रमप्राप्त आहे. (ऊदाहरणार्थ-पुढची काही वाक्ये) खरंतर मुद्देसूद वाक्ताडन हे आमच्या साठ्यामधले एक जालीम शस्त्र आहे, पण ते आम्ही ब्रम्हास्त्रासारखं जपून वापरतो. अगदी ब्रम्हास्त्र नाही तरी सुदर्शन तर नक्कीच. पण ते सोडू म्ह्टलं तर टारगेटेड दुर्वास पळणार कुठे? ट्रॅफिक किती वाढलाय !

मोत्या कंटाळून निघून गेला वाटतं. तसाही तो थांबला नसताच. "दिलखुलास" ची वेळ झालीय. प्रत्येक सडेतोड ऊत्तरावर तो भुंकून दाद देतो. ह्या वेळेत तो सगळ्यात कमी भुंकतो म्हणून आमचे शेजारी तेव्हा रविवारचं झोपून घेतात. असो.

तर मुकुलायन च्या असंख्य वाचकांनो (सहावी "क" म्हणजे त्रिखंड काय रे मोर्‍या?), तुम्ही अजून जागे असाल तर आज तुम्हाला ही पत्रकार मंडळी बातमी कशी जन्माला घालतात ह्याचा एक किस्सा सांगणार आहे. मात्र लवकर सांगा अशी घाई करायची नाही बरं का. तर ह्या पत्रकारमंडळीं पैकी काही खूप हुशार असतात बरं का. (खूप हुशार म्हणजे ऊरलेल्यांशी तुलना करू गेल्यास. सापेक्षतावादाने का प्रवादाने.) ती असं काही लिहीतात की वाचणार्‍या तुम्हाआम्हाला काहीतरी वेगळंच वाटतं.

झालं असं की आमचा एक लग्न न झालेला, जाड चष्मेवाला, साधासुदा-सदा असा मित्र आहे. आमचे सगळे मित्र असेच अळणी - आमच्यासारखे. आता हेच पहा, आम्हाला कित्येक दिवस तो डान्स बार कसा असतो तो ह्याचि देहि डोळा पाहण्याची ईच्छा होती. आबांना काही लोकांचं बरं बघवलं नाही. त्यांनी बंदी आणण्याआधी आम्ही खूप प्रयत्न केले की कोणी मित्र ते दाखवेल का आम्हाला. पण जाऊन आलेला एकजण माहीत नाही हो. नाही त्या गोष्टी दाखवायला सगळे ऊत्सुक. म्हणजे एकाने आम्हाला "पारी" चे रोबोटीक आर्म्स कसे चालतात ते दाखवले. एकाने आम्हाला आय.आय.टी. मधला तो नाच्या "नटराज" रोबो दाखवला. आता यांत्रिक हात-पाय आणि त्यांच्या हालचाली बघायलाच फक्त आमचा जन्म का? तर ह्याचं ऊत्तर हो. हेच ईन्कम टॅक्स ऑफीस, सिनेसृष्टी, मिडीया, पोलीस, आर्.टी.ओ., सचिवालय ईथे कुठे काम करणारा कोणी मित्र असता तर अगदी तरन्नुम नाही पण कोणीतरी मानवी स्त्रीरूप हातपाय हलवताना आम्ही पाहिलं असतं की नाही? सोडा.

सांगायचा मुद्दा की हा आमचा अगदीच साधा मित्र आम्हाला म्हणाला की "पतंगराव कदम कुस्ती खेळतात तुला माहितीय का?". मी म्हणालो की "अरे त्यात नवीन काय? राजकारण आहे बाबा ते. आणि हे असं कारण नसताना ऊपमा अलंकारात बोलायला आपण काय कुठल्या च्यॅनल च्या ऍवॉर्ड फंक्शन चे होस्ट का अँकर का काय ते आहोत का?". तो म्हणाला "नाही रे खरीखुरी कुस्ती. हे वाच" त्याने ई-सकाळ१० पुढे केला. त्यात खरंच लिहिलं होतं हो, की "पतंगराव कदमांनी कुस्तीचा आनंद लुटला". आम्ही त्याला समजावलं की "अरे वेड्या, म्हणजे त्यांनी कुस्ती बघण्याचा आनंद लुटला असं म्हणायचं आहे". मग ते तसं का नाही लिहिलं हा त्याचा प्रश्न आलाच. त्यानंतर आम्ही त्याला जे सांगितलं तेच आता आम्ही तुम्हाला संक्षिप्त रूपाने येथे सांगत आहोत, सत्यनारायणाच्या पूजेतल्या गोष्टीसारखं.

दोन प्रकारचे पत्रकार असतात. एक आपण जे लिहितो आहोत त्याचा (मराठी) भाषेतला अर्थ काय होईल ह्याची कल्पना आणि अक्कल नसणारे. दुसरे, आपण जे लिहितो आहोत ह्याचा अपेक्षित नसलेला अर्थ काय होईल ह्याची पूर्ण जाणीव असताना, मुद्दाम नवीन बातमी जन्माला घालणारे. सांख्यिकीचा (स्टॅटिस्टिक्स) विचार करता, ही बातमी देणारी व्यक्ती पहिल्या प्रकारची असण्याची शक्यता खूपच जास्त आहे. मात्र दुसर्‍या प्रकारच्या व्यक्तींचं कौतुक केल्याशिवाय रहावत नाही. ह्याच पार्श्वभूमीवर आता मि. क्ष ने मि. य ला सांगितलेला एक किस्सा मी तुला सांगतो तो तू नीट ऐकावास.

एकदा एका लहानशा शहरास एका धर्मगुरूने भेट देण्याचे ठरवले. अपेक्षेप्रमाणे आगमनाच्या वेळी विमानतळावर पत्रकारांची गर्दी जमली. धर्मगुरू विमानातून ऊतरता ऊतरता एका चतुर पत्रकाराने पहिला प्रश्न विचारला "आमच्या शहरातील वेश्यांच्या समस्येबद्दल तुमचं काय मत आहे?" धर्मगुरूंनी आश्चर्याने विचारले "तुमच्या शहरात वेश्या आहेत?" लागलीच पेपर मध्ये बातमी छापून आली, "विमानातून ऊतरल्या ऊतरल्या, धर्मगुरूंचा पहिला प्रश्न, तुमच्या शहरात वेश्या आहेत का?"

तर वाचकहो तुम्ही योग्य तो बोध घेतला असेल. बातमी जन्माला कशी घालावी हे तुम्ही आज शिकला असालच. ऊद्या पत्रकार झालात तर आम्हाला नक्की दुवा द्या.

१. आमच्या ज्ञानाच्या कक्षा कशा जयललितासारख्या विस्तृत आहेत पहा
२. रंगरूपावरून कोणाची अशी चेष्टा करणं आमच्या तत्त्वात बसत नाही. पण हे लिहिलं नसतं तर आमचं हे तत्त्व तुम्हाला सांगता आलं नसतं म्हणून केवळ.
३. खरंच ट्रॅफिक खूप वाढलाय.
४. प्रत्येक तळटीप ही वाचण्यायोग्य असतेच असं नाही. असो.
५. ह्या लेखात असो हा शब्द किती वेळा आला आहे मोजा पाहू. ६,७
६. नं ७ ही तळटीप नसून नं ५ ची शिखरटीप आहे.
८. वाचा - ऊदयाचल - माझी संपदकीय कारकीर्द, गोळाबेरीज, कोणतीही आवृत्ति. लेखक - पु.ल.देशपांडे.
९. आम्ही आमची लायकी ओळखून असतो. कुठे मुरलीधरन, कुठे आम्ही.
१०. हे संभाषण ई-मेल वर झालं आणि त्याने कालच्या ई-सकाळ ची लिंक फॉरवर्ड केली. ऊगाच ऑनलाईन पेपर पुढे कसा केला असे फालतू प्रश्न विचारू नका.

Friday, January 9, 2009

बापूजी (आत्रंग्यांचे), आमच्या रामू भैय्याला नोकरी मिळेल का?

प्रिय बापूजी, पत्रकारिता क्षेत्राबद्दलचं आमचं ज्ञान म्हणजे मल्लिकाच्या स्कर्टापेक्षा तोकडं. आम्हाला त्यातलं ओ का ठो माहित नाही. वर्तमानपत्रांची किंमत ही आम्ही त्यांना मिळणार्‍या रद्दीच्या भावातून करतो. ही आमची (का त्यांची?) लायकी. मात्र आम्ही तुमच्या बातमीदार आणि कळत-नकळत चे अगदी नियमित वाचन करतो. आम्ही लहान होतो तेव्हा रस्त्यात मारामारी दिसली की बघ्यांमधला आमचा नंबर पहिला. शाब्दिक फटकार्‍यांबद्दल आम्ही वय वाढलं तशी ही आवड वाढवून आहोत. त्यामुळे "एस-एम-एस" आला रे आला की वाचणार्‍यांमधले आम्ही पहिले. सांगायचा मुद्दा मात्र हा नाही.

तुमचे तेजाबफेकू (हे आम्ही कौतुकाने म्हणत आहोत) ब्लॉग वाचून, आम्हाला तुमचं ते पत्रकारिता क्षेत्र हे एकंदरीत एकदम मजेदार वाटू लागलं आहे. काही दिवसांपूर्वी "कळत-नकळत" मध्ये तुम्ही जॉब बद्दल जाहिरात दिली होती की "पाहिजेत मुंबई लोकमतला पत्रकार". ती वाचून आमच्या डोळ्यासमोर ताबडतोब आमच्या रामू भैय्याची मूरत ऊभी राहिली. (ऍक्च्युअली ती गादीवर बसली होती) त्यात लिहिलंय की "उपसंपादक/वार्ताहर पदासाठी किमान पदवीधर, दोन वर्षांचा आणि पाने लावण्याचा अनुभव या किमान अटी आहेत".

तुम्हाला सांगतो
आमचा रामू भैया रांचीचा बी.ए. आहे - म्हणजे पदवीधर वर टीक मार्क.
आम्ही गेले ८ वर्ष त्याच्या ठेल्यावर तोबरे भरून तोंडं लाल करायला जातो. - दोन वर्ष काय चौपट अनुभव - टीक मार्क.
आणि मुख्य म्हणजे पाने लावणे. ह्यात तर त्याचा हात कोणपण ध्ररू नाही जात. आम्ही सगळ्या गल्ल्या, रोड्स पालथ्या घातल्या, अगदी त्या कर्वे रोड्च्या ए.सी. शौकीन मध्ये पण गेलो. पण बनारसी, कलकत्ता, मघई, फुलचंद, पूना सादा काही पण सांगा. रामू भैय्या सारखा पाने लावणारा कोणी शोधून दाखवावा ! ह्यात तर एकदम मोठ्ठं टीक मार्क.

त्यात तुमच्या क्षेत्रात लागणारी बातम्या पुरवण्याची हौस? अहो, आम्ही एकदा का ठेल्यावर गेलो की आठवड्याची सगळी बित्तंबातमी आम्हाला मिळते. त्यात पुन्हा तीऐकली की तिची शहानिशा न करताच रामू पहिल्याछूट नंतर येणार्‍यांना ऐकवतो. हे तुमच्या बातमीदारांच्या किस्स्यांशी एकदम तंतोतंत जुळतं की नाही? त्यात भर म्हणजे त्याची पाने पुसण्याची कला. म्हणजे एकदम पानावर चेरीच झालं.

आमच्या रामूला रोज रोज तंबाकू चोळून कंटाळा आला आहे. हात काळेच करायचे तर शाईने करू असं म्हणाला होता एकदा. परवा सकाळच्या पान-सुपारी कार्यक्रमाला आपला ठेला असावा असं त्याला राहून राहून वाटत होतं. तुम्ही सांगा की त्याला ही नोकरी मिळेल का. संपादकांना रोज सुपारी कातरून ही देईल तो.

Wednesday, January 7, 2009

"गुड-मॉर्निंग" पथक करणार मॉर्निंग बॅड

कालच्या ई-सकाळ मधील वृत्त्तानुसार "गुड-मॉर्निंग" नावाचं पथक सासवड मधे एक अभियान सुरु करत आहे. कसलं ते सकाळ च्या शब्दातच वाचा.

आपापल्या पोटांची स्वच्छता करणार्‍यांना जागीच अटक करून थेट पोलीस स्टेशन ला आणलं तर त्यांच्यावर पुढची कारवाई म्हणजे नक्की काय करणार ह्याचा विचार करता करता आमची मती कुंठीत झाली आहे.

बातमीतल्या लाल वर्तुळातील आडनावाचा बातमीशी संबंध असण्याचा योगायोग चोखंदळ वाचकांच्या नजरेतून सुटला नसेलच. वास्तविक आम्ही नावा-आडनावावरून थट्टा करण्याच्या विरुद्ध आहोत मात्र वर्डस्वर्थ ने म्हणल्याप्रमाणे नावात काय आहे?

१ खरं तर हे शेक्सपिअर ने म्हणून ठेवलंय, पण नावात काय आहे?

Tuesday, January 6, 2009

सा रे ग म प आणि त्यातून जन्माला आलेल्या इतर स्पर्धा

आयडिया सा रे ग म प हा सध्या त्यातील अतिशय गुणी आणि दर्जेदार बाल-कलाकारांमुळे गाजतो आहे. त्यांच्या प्रतिभेबद्दल कोणालाच यत्किंचितही शंका असण्याचं कारण नाही. मात्र ह्या मुलांचं साधन करून अनेक मंडळी आपल्या भांडवलाची सोय करणार आणि ह्या एका स्पर्धेतून अनेक वेगळ्याच स्पर्धा जन्माला येतील असं एकंदर दिसतंय.

ह्या स्पर्धेला प्रांतिक स्वरूप असणं हे अपेक्षितच आहे. आपल्या जिल्ह्यातल्या, शहरातल्या, गावच्या स्पर्धकांना लोक मत देणार ह्याचा व्यावसायिक फायदा टेलिकॉम कंपन्या घेणार आणि त्याचा कोणाला आक्षेप नसावा. पण ह्या मुलांचं कौतुक करणार्‍यांची एक स्पर्धा सुरु झाली आहे. मुग्धा ला रायगड गौरव पुरस्कार मिळाला, झालं मग प्रथमेश ला कोकण गंधर्व, आर्या ला माणिक वर्मा अशी रीघ लागली. परवाच कार्तिकी आणि रोहित राऊत ला ही त्यांच्या प्रांताने असे पुरस्कार दिले. हे सगळं इतक्या सहज आणि पटापट की एकाला चॉकलेट मिळालं म्हणून बाकीच्यांचा हट्ट पुरवण्यासारखं झालं. त्यात तो हट्ट त्या मुलांचा नाहीच मुळी. ह्ट्ट "आमास्नी पन हे पायजेलाय" म्हणत प्रांताचं सांस्कृतिक राजकारण खेळणार्‍यांचा आहे.

नवीन बातमीनुसार शाल्मली सुखटणकर हिला सारस्वत बँकेने "बाल-अग्रदूत" नेमलं आहे - बाल अग्रदूत’ म्हणून बँकेतर्फे तिला पुढील पाच वर्षांसाठी करारबद्ध करण्यात येणार आहे. तिला मिळणारी रक्कम ही शिष्यवृत्तीच्या स्वरूपातील असेल. मात्र या शिष्यवृत्तीची रक्कम गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. शाल्मलीच्या पुढील प्रगत संगीत शिक्षणाचा सारा खर्च यापुढे बँकेतर्फे करण्यात येईल. संगीत शिक्षण आणि सराव, रियाझ यासाठी आवश्यक असणाऱ्या वाद्यांचा खर्चही बँकच उचलेल. त्याशिवाय एखाद्या राजदूताप्रमाणेच तिची बडदास्त ठेवण्यात येईल. तिच्यासाठी साऱ्या सोयीसुविधा पंचतारांकित असतील. विमानप्रवास, चालकासहित वाहन, पंचतारांकित वास्तव्याची व्यवस्था आदींचा त्यात समावेश असेल. असे बँकेच्या सूत्रांनी सांगितले.

माझ्या मते आता बाकी स्पर्धकांना अग्रदूत बनवण्याची स्पर्धा लागेल. एखाद्याच्या लोकप्रियतेचं भांडवल करून आपला कार्यभाग कसा साधावा हे माहित असणारे ईथे अनेक आहेत.

Sunday, January 4, 2009

अजि म्या मॅन्युअल वाचले

स्वयंपाक ह्या गोष्टीशी माझा संबंध हा ऍक्टिंग शी शाहरूख खान चा, गायनाशी प्रशांत दामले चा आणि नृत्याशी अशोक सराफ चा जितका संबंध आहे तेवढाच! थोडक्यात वेळ पडलीच तर काहीतरी खूड्बूड करता येईल ईतकंच. पण माईक्रोवेव्ह ह्या ऊपकरणाने माझ्या सारख्यांवर अनंत ऊपकार केले आहेत. तापमान आणि वेळेचं गणित पुस्तकात दिल्याप्रमाणे पाळलं तर खाण्यायोग्य पदार्थ बनण्यास विशेष अडथळे येत नाहीत. परवा मी गाजराचा हलवा केला. गाजर किसण्यासाठी फूड-प्रोसेसर वापरला. हे दिव्य मॅन्युअल च्या मदतीने अगदी सहज पार पडलं. माझ्यासाठी ह्या सगळ्याच गोष्टी धक्कादायक आहेत. प्रॉडक्ट मॅन्युअल ह्या गोष्टीचा मला विशेष धसका आहे. काहीही नवीन विकत आणलं की ते वापरायचं कसं हे सांगणारी ही जाडजूड पुस्तिका मी पहिल्यांदा दिसणार नाही ईतक्या दूर फेकून देतो. ह्या मागची कारणं काय असावीत ह्याचा मी जरा सविस्तर विचार केला (कामधंदे काय दुसरे?)

१. सुरुवातीच्या काही पानांमध्ये भरलेल्या असंख्य "वॉर्निग्स" किंवा "धोक्याच्या सूचना". कोणकोणत्या परिस्थितीत ऊपकरण वापरू नका ह्याची जंत्री. अतिशय निरूपयोगी आणि बिनडोक माहिती(!) भरलेला हा भाग असतो. कोणकोणत्या प्रकारांनी तुम्हाला ईजा होऊ शकते हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर एकदा हे जरूर वाचा. हे विचार आणि आकलनाच्या पलीकडलं असतं. ऊदाहरणार्थ, हा ब्लॉग पोहत असताना वाचू नये, तुम्ही नायट्रोजन ने भरलेल्या चेंबर मध्ये बसून हा ब्लॉग वाचत असाल आणि त्यातल्या लेखाला आग लावावी असं तुम्हाला वाटलं तरी काडी पेटवू नका. वगैरे वगैरे.

च्यायला, कोण मरायला असं काही करेल? हा तुम्हा-आम्हा सामान्यांना पडणारा प्रश्न. अमेरिकेतले काही रिकामटेकडे आणि श्रीमंत मूर्ख हे त्याचं ऊत्तर. दावे लावून पैसे मिळविण्याच्या नादात असलेल्या ह्या मंडळींनी जगाला दिलेली ही भेट आहे. अशी माणसे आणि त्यांच्याकडे असलेला वेळ ह्या दोन्हीची अजिबात कमी नसल्याने ईजा करून घेण्याचे नवनवीन मार्ग चोखाळले जातात आणि मॅन्युअल मारूतीच्या शेपटीसारखं वाढत जातं

२. लोकांना नको असलेले पन्नास "फिचर्स" गळी मारण्याची ऊत्पादकांची हौस. ह्याची अनेक ऊदाहरणं देता येतील. वाचकांनी अनुभवलेली ऊदाहरणं जरूर कळवावीत. एक ऊदाहरण म्हणजे "पिक्चर ईन पिक्चर". बोंबलायला कोण ते वापरतं देव जाणे. एकतर
एका स्क्रीन वर काय चायलंय हे समजणं अवघड.
त्यात आता त्यातली ४०% जागा फिरत्या बातम्या, जाहीरातीनी व्यापलेली.
पाहण्यासारखं एक च्यॅनेल मिळायची मारामार, दोन कुठून सापडणार?
सापडलीच तर ती एकत्र पहायची कशी हे लक्षात ठेवणं अवघड.
असे असंख्य "फिचर्स" ! आणि ते वापरायचे कसे ह्याची अनंत पानं भरलेली मॅन्युअल्स.

३. एक गोष्ट धड करण्यापेक्षा पन्नास धेडगुजरी गोष्टी करणारी ऊत्पादने. म्हणजे मोबाईल कम रेडीओ कम कॅमेरा कम यु.एस्.बी डिस्क कम हॅंड ग्रेनेड. सीडी-डीव्हीडी प्ल्रेअर कम गजराचं घड्याळ कम पेपरवेट कम पोळी लाटायचं यंत्र. अरे किती त्रास द्याल? एका यंत्रात आम्ही किती बटणं बडवायची? आणि आता ही अशी बटणांची लाख कॉबिनेशन्स आली म्हणजे त्यासाठी शेकड्याने ते वापरण्यासंबंधीची पाने लिहीणे आलं.

ह्या सगळ्या मुळे ते मॅन्युअल अतिशय निरूपयोगी आणि एखाद्या अध्यात्मिक पोथीसारखं झालेलं असतं. पोथ्या निरूपयोगी असतात असं मी म्हणत नाहीये, पोथीसारखं मोठं असं म्हणतोय. मात्र अशा पार्श्वभूमीवर मी मॅन्युअल वाच्तो काय, त्याप्रमाणे ते ऊपकरण वापरतो काय आणि ते अपे़क्षेप्रमाणे चालतं काय सगळंच विश्वासापलीकडलं.

ह्या फोटोतील व्यक्ती तुम्ही असल्यास

ह्या ब्लॉग चा टी.आर.पी. वाढविण्यासाठी नवीन वर्षात अनेक क्लृप्त्या आणि शक्कला लढविण्याचे आम्ही ठरविले आहे. त्या दृष्टीने हे एक नवी सदर सुरू करत आहोत.
गांधीगिरीचा साराव केल्याबद्दल ट्रॅफिक पोलिसांचे आम्ही अभिनंदन करतो. वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांना गुलाबाची फुले देणारी ही व्यक्ती आ असल्यास आम्हाला संपर्क करा. (तुम्ही पोलिस असल्याने तो कसा करावा हे तुम्ही शोधून काढालच) आम्ही तुम्हाला गांधींचा (महात्मा, सोनिया नाही) आणि संजू बाबाचा प्रत्येकी एक फोटो बक्षीस देणार आहोत. ही फुले तुम्ही ती विकणार्‍या मुलांकडून योग्य (विकणार्‍याच्या दृष्टीने, तुमच्या नाही) दराने विकत घेतली असतील अशी आशा आहे. नसल्यास तसं आधी आम्हाला कळवा, आम्ही तुम्हाला एक गुलाबाचं रोप ही देऊ.

आपल्या फोन/मेल ची वाट पाहत आहे.

Friday, January 2, 2009

ऍक्टिंग कशाशी खातात?

परवा आमच्या एका जिवलग मित्रामुळे आम्हाला सिनेतारकांनी खचखचलेली एक पार्टी अटेंड करण्याचा योग आला. (ज्या मित्रांमुळे असे योग येतात ते सगळे जिवलग) तिथे अनेक ओळखीचे चेहेरे भेटले. आम्ही संधीचा फायदा साधून एक प्रश्न काही जणांना विचारला. ऍक्टिंग कशाशी खातात? हा तो प्रश्न. आम्हाला मिळालेली रंजक ऊत्तरं खाली देत आहोत.

शाहरूख : वेल, मी शूटींग मध्ये बिझी असल्याने माझं खाणं, पिणं, रूटीन सगळं काही ग्वॉरी च बघते. खाण्याचं तिलाच विचारा. (ह्यानंतर तोतरं हसून तो निघून गेला)

सलमान खान : ते त्यात किती कॅलरीज आहेत त्यावर अवलंबून आहे.

ह्रितीक रोशन : माझं फिटनेस रूटीन मी सल्लूच्या सल्ल्याने ठरवतो. त्याचं ऊत्तर तेच माझं.

ऍश्वर्या : खरंतर ह्या प्रश्नाचं ऊत्तर अमितजींच्या सहवासात राहिल्याने मिळेल म्हणून मी इकडच्या स्वारीशी लग्न केलं. पण अजून काही ऊत्तर सापडलेलं नाहीये. आणि त्यात तुम्ही मराठीत प्रश्न विचारताय, आम्ही यू.पी. वाले आहोत हे माहीत असूनही.

रणवीर कपूर : ऊगाच काहीतरी निरर्थक विचारू नका. हे माहित असणं दिग्दर्शकांचं काम आहे.

दिपीका पदुकोण : व्हाय शूड आय केअर?

तेवढ्यात आम्हाला श्रेयस तल्पडे (असा ऊच्चार करायचा असतो म्हणे) दिसला. त्याच्याकडून ऊत्तराची अपेक्षा होती. पण "नंतर भेटा, सविस्तर सांगतो. आत्ता घाईत आहे. ही मंडळी पुढे गेली वाटतं" असं सांगून तो शाहरूख, ग्वॉरीच्या दिशेने पळाला.

आम्ही काय विचारतोय ह्याची बातमी पोहोचल्याने स्वतःहूनच सचिन पिळगावकर आले. त्यांनी "त्या काळी राजा परांजप्यांना एका लहान मुलाच्या भूमिकेसाठी ... " अशी आम्ही पन्नास वेळा ऐकलेली टेप लावली. लिहून घेताघेता पेनमधली शाई संपली असं दाखवत आम्ही दुसरं पेन आणायच्या निमित्ताने पळालो. तिथे आमीर खान ऊभा होता. त्याला आम्ही विचारलं तेव्हा तो म्हणाला की "तसं हे सांगायला खूप वेळ लागेल. बस, दाढी करता करता सांगतो." आमच्या खिशात मोजून परतीच्या तिकिटाचे पैसे असल्याने आमीर कडून साधी मिशी कापून घेणं परवडणार नाही हे लक्षात आल्याने "आलोच" सांगून आम्ही परत सटकलो.

कोपर्‍यावर आमच्या प्रश्नाचं नेमकं ऊत्तर ठावूक असलेल्या मंडळींचं कोंडाळं दिसलं. पण त्यांच्याकडे फिरकायला काही कारणच नव्हतं. त्यांची ऊत्तरं छापली तर ह्या ब्लॉग ला ग्लॅमर कसं मिळेल? असली डाऊनमार्केट कामं आपण नाही करत.

Thursday, January 1, 2009

पाकीस्तानमधील गन मार्केट

सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. नवीन वर्षात काय बदलणार आहे? कॅलेंडर बदललं. नोकरदार वर्गाच्या सुट्ट्यांचं अकाऊंट पुन्हा भरलं. पोपटवाल्यांच्या लेखण्या नव्याने कामाला लागल्या. अनेक अक्षरशत्रूंनी भविष्य वाचण्याच्या ऊद्देशाने पेपर आणि मासिके हातात घेतली. अशा काही मोजक्या गोष्टी सोडल्या तर बदललं काहीच नाही. तोच सूर्य, तीच प्रभा, तेच काळोखात बॅटर्‍या घेऊन फिरणारे कवी आणि त्याच त्या रटाळ कविता, असा अगदी निराशावादी सूर मी लावणार नाही. पण वास्तव बघता ३१ डिसेंबरला नैमित्तिक महत्तावाच्या पेक्षा खूप जास्त काही मानण्याचं कारण नाही ही आमची विचारसरणी. २००८ मध्ये खूप काही घडून गेलं असेल, चांगलं वाईट, आंबट गोड - पण बोकाळलेला दहशतवाद वर्षाशेवटी त्यावर स्वतःची मोहोर ऊमटवून गेला.

Wednesday मधला नासिरूद्दीन शाह सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा नव्हता त्यापेक्षा २६ नोव्हेंबर नंतर खूप जास्त जवळ आला. आणि वर्ष बदललं तरी तो काही लांब जात नाही. ह्या पार्श्वभूमीवर विचार करताना एक खूप आधी बघितलेला व्हिडीयो पुन्हा कोणीतरी पाठवला. जरुर पहा. बघताना थोडी गंमत वाटावी ह्या पद्धतीने तो तयार केला आहे. मात्र त्या मागच्या भयाण वास्तवाची जाणीव पार हादरवून टाकते.

विशेष पहाण्याच्या गोष्टी -

१. मंडई च्या धर्तीवर चालणारं गन मार्केट (फरक एवढाच की भाजी ऐवजी शस्त्र आणि दारूगोळा)
२. अद्ययावत शस्त्रांची ऊपलब्धी.
३. शस्त्रांच्या किंमती. (आमच्या आनंद नगरचे ऊच्चभ्रू भाजीवाले ३ दिवसांची भाजी सुद्धा ह्यापेक्षा जास्त भावाने विकतात)
४. शस्त्र चालवणार्‍यांच्या चेहेर्‍यावरचे, "हे अगदी रोजचंच" असल्याचे भाव.
५. शस्त्र तपासून घेण्याची आणि वापरून बघण्याची सोय आणि पद्धत

दहशतवादाचा सामना करण्याच्या गोष्टी सध्या सगळीकडेच ऐकू येत आहेत. पण त्याची पाळेमुळे ऊखडून काढण्याच्या घोषणा ही दिल्या जातात. ह्या गोष्टी जरूर घडायला हव्यात. पण ऊपाययोजना करण्या आधी मूळ प्रश्न किती गहन आहे ह्याची योग्य कल्पना असणंही तितकंच महत्त्वाचं आहे एवढंच.

लिंक - http://www.youtube.com/watch?v=Ma7GL9q6z90