चेतनने केलेल्या ह्या एक उत्कृष्ट कथेचा हा स्वैर कवितानुवाद.
( पार्श्वभूमी )
मावळ प्रांतातील एक गाव छानसे
त्या किनार एका सुंदर नदीची असे
गावात ल्हानग्या घरी तरूण तो वसे
खंडोबा ज्याच्या जवळ राऊळी बसे
लवकरी ऊठावे न्याहारी करून निघावे
वनी हिंडत-भटकत, जिन्नस जमवत जावे
दो घास भाकरी ठेच्यासमवे खावे
अन् मधूर गूळाच्या खड्यात सूखा पहावे
अशी साधी भोळी आयुष्याची रेष
ना गंभीर चिंता नसती भलते क्लेष
परि ग्रहण कसे ना कळे तया लागले
ना कळे कुणा का दैव असे वागले
( आपत्ती काल )
कळस ऊडाला राऊळ भग्न जहाले
खंडोबा पडला, माल्य विखरून गेले
गावातील खंदे वीर ऊताणे पडले
कुंकू लोपले, हिरवे कंकण फुटले
हरपली शांतता, गेले सौख्य दूर
नासली निद्रा ग्लानीचा आला पूर
जागे होऊनी कळले स्वप्न नव्हते
उद्वेग, निराशा, प्रश्नच सत्य होते
जो रक्षणकर्ता तोचि तुटूनी पडला
मग मर्त्य जीवा आधार असे तो कुठला?
हा विचार घेऊनि येई आठवण एक
त्या शूर मुलाचे कार्य म्हणे तू देख
तरूण़ जरी तो असे वीरांचा वीर
तेजाचा पुंज जो, सूर्याचा अवतार
बुद्धीने तल्लख अन् मुत्सद्दी नेता
देव, देश, धर्माचा रक्षणकर्ता
( आठवणी नंतर )
नयनांस लागला दिसू ऊगवता गोळा
रंग केशरी, पोटी तेज नी ज्वाळा
जरी भासे तरीही योग मुळी हा नसे
की "भगव्या"सदृश सूर्यंबिंब ते दिसे
बळ आले अंगी तरूणा नकळत त्याच्या
रक्तातील थेंबाथेंबा फुटली वाचा
किंतु न आता ऊरे शोधता ध्येय
किमया ही त्या एकाची, जय शिवराय
तुका लोकी निराळा
8 years ago
No comments:
Post a Comment