Saturday, August 17, 2013

लग्न

 लग्न म्हणजे काय रे भाऊ?
 छोटा विचारीत आला
 गहन विषय सोपा
 कसा करून सांगू त्याला?

 लग्न म्हणजे मीलन
 का लग्न म्हणजे जुगार?
 लग्न म्हणजे तोंड दुसरे
 वाटून खाण्या पगार?

 लग्न दगडाखालचा विंचू
 लग्न फुरफुरणारा साप
 लग्न म्हणजे स्वातंत्र्याला 
 घट्ट लावलेला चाप?

 लग्न म्हणजे तडफड
 का लग्न नुसता अट्टाहास
 क्षणाच्या आनंदाकरिता असे
 का कवटाळिलेला एक फास?

 अनेक प्रश्न छोट्याचे
 हेलाविती मनाला 
 कसे समजाऊ ना कळे
 त्या भाबड्या जीवाला 

 कोण सांग ऐकवी
 ह्या अशा गोष्टी तुला?
 कधी समजावून घेतलेस
 का रे तू बागुलबुवाला?

 लग्नाचा ऊहापोह
 सांगितला रे तुला कोणी?
 सूर राग जरी न कळे
 तरी गायलीसच ना तू गाणी?

 बावळ्या लोकांपरी तू
 चर्चा कशास मांडली?
 गंध वास ही न घेता
 फुले जी त्यांनी सांडली

ज्या गोष्टी जगताना
नव्याने रोज भेटती
त्यांची चर्चा अपूर्णातच
का बरे हे फेटती?

लग्न हे स्वप्न सुंदर
लग्न जीवनातील सेतू
समरसून ते जगावे
हाच ठेवावा तू हेतू

लग्न दोघांचा प्रवास
लग्न दोघांची कहाणी
लग्न हे द्वंद्वगीत
प्रेमकाव्य वा विराणी

जे प्रवासे सापडावे
चार डोळ्यांनी पहावे
कालच्या ग्रीष्मासही मग
सुखानेच आठवावे

हातावरी जमवावे अश्रू
सुखदु़:ख जय भयाचे  
दोघांनीच घेता ओठी
प्रत्येक थेंब ते मधाचे

Wednesday, August 7, 2013

काहीही

 डोंबिवली वासी, वास नाकाशी, कचरा दाटे चोहीकडे
 क्षणात येती समोर वासरे, क्षणात मागे डुक्क्रर फिरे

 स्टेशन बघता अलोट गर्दी, जीव जाई शिणलासे
 काँक्रीट्च्या ह्या बिल्डींगींचा गोफ कुणई हा विणलासे?

 झालेले जंगल हे वाटे, गच्च आहाहा ठाण्यात
 तापती जन, मृत्यू दारी, कावळे पडता पाण्यात

 फडफड करूनी भिजले आपुले कपडे जन हे आवरती
 गर्दी हेची प्राक्तन धरूनि मनास अपुल्या सावरती

 वासाचेच अत्तर करूनि प्रफुल्लित मग जन होती
 सगळ्या चिंता फाटी मारूनी मराठी मने ती सजती

 पाट वाहती कलागुणांचे गुणीजनांच्या नगरात
 मराठीयांच्या संस्कृतीचे, वर्धन होते थाटात

 प्राप्य जीवना कवटाळावे कसे ते पहावे नीट
 कल्लोळातही श्रावण फुलतो मग अपुल्या डोंबिवलीत

Monday, August 5, 2013

नव्या युगातील नव्या दमाचा

केशवसुतांची माफी मागून त्यांच्या कवितेचे विडंबन तुमच्या भेटीस आजच्या शुभदिनी देत आहे

नव्या युगातील नव्या दमाचा अट्ट्ल बेवडा आहे
कोण मला ऊचलून घरी नेऊ शकतो मी पाहे
व्हिस्की, व्होडका, देशी दारू, न मी एक पंथाचा
तेच पतित की जे चालविती घोष दारूबंदीचा
चकण्यासाठीच माझी भूक,
'चतकोराने' (क्व्रार्टर) मला न सूख,
पब मधला मी नच मंडूक,
गुत्त्यास श्रावणी कुंपण पडणे अगदी मला न साहे
कोण मला ऊचलून घरी नेऊ शकतो मी पाहे

जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत
सर्वत्र गटारे लोळण्यास बघ मला दिसताहेत
कोठेही जा फेसाळणारी शांभवीच मज दिसते
कोठेही जा हातांमधले चषक पहा चमकते
कॉलेजातली तरूण मुले
दारूत जशी मोहाची फुले
बघता तन हर्षून "डुले"
मी त्यांची, ती माझी - एक गटार आम्हातून वाहे
नव्या युगातील नव्या दमाचा अट्ट्ल बेवडा आहे

पुजितसे मी कोणाला - तर मी पूजी दारूला
बाटलीमध्ये विश्व पाहूनी पूजी मी विश्वाला
'बास' ह शब्दच मजला नलगे, संपुष्टी हे लोक
आणुती तो, वर बूच लाविती फिरती दुनिया न देख,
"लहान मोठे" (स्मॉल्/लार्ज) मज न कळे
सॉफ्ट हार्ड हे द्वयही गळे
देशी विदेशी भाव पळे
सर्वच अट्ट्ल बेवडे जवळ त्या गुत्त्या जवळी मी राहे
कोण मला ऊचलून घरी नेऊ शकतो मी पाहे

चकण्या करिता काजूवरती कण चढती लवणाचे
स्वान्तसुखाच्या केंद्राभवते पाक मधूर मदिरेचे
आत समचि ऊदास हृदय वरी स्रदृश आनंदी तो फेस
परी अन्या वाटेला लावी वाहत गटारी तोच
अशी स्थिती ही असे जनी
बेहोष मुक्त तरूण मनी
चिंतामुक्त गटारी दिनी
चंगळाचे साम्राज्य स्थापू बघत काळ जो आहे
प्रेषित त्याचा नव्या युगाचा अट्ट्ल बेवडा आहे

मुकुल जोशी

Tuesday, November 22, 2011

देऊळ - जेथे कर माझे जुळती

मला आवडणारी देवळं ३. एक सारसबाग, दुसरं पर्वती आणि तिसरं कोथरूडमधलं पूजा पार्क. त्यात काल अजून एकाची भर पडली. हे देऊळ म्हणजे ऊमेश आणि गिरीश कुलकर्णींनी घडवलेलं आणि घोलपांच्या फंडातून ऊभं राहिलेलं.

काल रात्री देऊळ पाहिला. एक नितांतसुंदर कलाकृती पाहिल्याचं समाधान मिळालं. ही "पोस्ट" म्हणजे देऊळ ची समीक्षा नाही. माझ्यासारख्या पामराने ती करूही नये. मिळालेल्या समाधानातून अगदी सहज सांगावं असं वाटलेलं इथे लिहीत आहे.

देऊळ ही कथा घडते एका अगदीच छोट्या गावात. गावातली प्रमुख वस्ती, छोट्या टेकाडावरून पाहिलं तरी नजरेत मावेल एवढी. विशेष काहीच न घडणारं आणि त्यामुळे अगदी छोट्या प्रसंगांची ही बातमी व्हावी असं हे गाव. गावातली कॅरॅक्टर्स म्हणजे राजकारणी, नशिबाला दोष देत रिकामधंदे करणारे टोळभैरव, समज आणि विवेक ह्याच्या जोडीने गावाच्या विकासाची आस धरणारे अण्णा, महिला आरक्षणातून निवडून आलेली सरपंच, गावच्या काड्यांतून कुठे विस्तव पेटवता येईल का ह्या शोधात असणारा पत्रकार, एक निरागस आणि निखळ व्यक्तीमत्त्वाचा तरूण केशा, त्याचं कुटुंब आणि इतर गावकरी. चित्रपटाचा वेग हा गावातील एकंदर घडामोडींच्या वेगाशी नाळ साधणारा.

अशा पार्श्वभूमीवर केशाला एका ऊंबराच्या झाडाखाली पहूडलं असताना दत्ताचा साक्षात्कार होतो. गावात दत्त आल्याची बातमी होते आणि गावातल्या समाजकारणाला एक वेगळंच वळण लागतं. "विकासाची" स्वप्न साकारायचं राजकारण अगदी स्वाभाविकपणे शिजू लागतं आणि बघता बघता गावात दत्ताचं देऊळ ऊभं राहातं. दत्ताचा "टीआरपी" वाढवायचे सर्व नैतिक, अनैतिक प्रकार घडतात आणि सगळं गावंच त्या क्षेत्राच्या तीर्थात आपले हात ओले करू लागतं. ह्या सर्व प्रकाराचा फोलपणा आणि त्यातली अनैतिकता पटत नाही ती फक्त अण्णांना. ह्या सर्व प्रकाराचं योग्य फलित प्राप्त करणं कोणाच्याच हातात नाही हे अगतिकपणे बघत असताना ते गाव सोडून शहरात जाण्याचा निर्णय घेतात. आता ऊरतो तो फक्त केशा.

केशाची वास्तल्यस्थानं असतात ती दोन - एक दत्त आणि दुसरी त्या दत्ताची गाय, करडी. ऊरलेल्या गावकर्‍यांचा संबंध असतो तो फक्त "देऊळाशी". जेव्हा व्यावसायिक प्रगतीने बेधुंद झालेल्या गावात करडीचा अंत होतो आणि केशाला त्याच्या देवापासून वेगळं केलं जातं तेव्हा त्याला ह्या अवडंबराच्या वास्तवाची जाणीव होते. ऊद्विग्नावस्थेतला केशा भक्तांना मुक्तीचा मार्ग दाखवणार्‍या त्या दत्ताला देऊळातून "मुक्त" करतो. गावकर्‍यांचा देव मात्र मूर्तीतच असल्याने ते दुसरा "देव" आणून पुन्हा देऊळ सुरू करतात.

ही कथा पडद्यावर कसा आकार घेते हे प्रत्येकाने प्रत्यक्षच पहावं. मार्मिक आणि प्रसंगनिष्ट विनोदी अंगाने खुलवलेली ही कथा कुठेही त्यामागची वैचारिक बैठक सोडत नाही. खेड्यातल्या समाजातले आणि देशातल्या धार्मिक संस्कृतीचे ऊद्विग्न करणारे प्रश्न डोळ्यासमोर ऊभे करताना लेखक आणि दिग्दर्शक कुठेही कुठलाही ऊपदेश करत नाहीत पण योग्य ते भाष्य करायचं सोडतही नाहीत. विनोदाची साथ घेताना कुठेही कथा गांभीर्याशी फारकत घेऊन ऊथळ होत नाही तशीच कुठेही गांभीर्याच्या आहारी जाऊन मूळ विनोदी अंग सोडत नाही. धार्मिक अवडंबराचं संपूर्ण "दर्शन" घडवताना, देव - भक्ती - धर्म - संस्कृती ह्या संकल्पनांना कुठेही तडा जाऊ न देता - खरंतर तेही केशाच्या आणि अण्णांच्या विचारातून योग्यतेने दाखवण्याचं अवघड काम ऊमेश आणि गिरीश अतिशय सहजतेने करतात. ह्या जोडीचं खूपच कौतुक!

"देऊळ" मधले कित्येक प्रसंग लक्षात राहतात ते त्यातल्या साधेपणामुळे, मार्मिकपणामुळे आणि कलाकारांनी ऊत्कृष्टपणे वठवलेल्या त्यांच्या भूमिकांमुळे. योग्य कथा आणि दिग्दर्शन लाभलेल्या गुणी मराठी कलाकारांकडून असा अभिनय घडणं हे आपल्याला नवीन नाही. परंतु सिनेमात केलेला कॅमेराचा आणि प्रकाश्/छायेचा वापर हा "देऊळ" ला एका वेगळ्याच ऊंचीवर नेऊन ठेवतो आणि ही कला मराठी चित्रपटात आणल्याबद्दल ऊमेश आणि टीमचं विशेष अभिनंदन. चित्रपट पहाताना अनेक फ्रेम्स नजरेला वेड लावतात. सिनेमा सुरूच होतो तो वाळूत रेखाटन केलेल्या सुरेख नामावलीपासून. आणि संपतो तो श्रेयनामावलीत वाटा असलेल्या प्रत्येकाचा न चुकता ऊल्लेख करून. रॉटरडॅमचा ऊल्लेख असणारं "ईस्टर एग" ह्या टीमबद्दल जरा जास्त माहिती असणार्‍यांसाठी मस्त वाटतं.

वळू, विहीर आणि देऊळ ह्यातून गिरीश आणि ऊमेशची एक स्वत:ची स्टाईल असल्याचं लक्षात येतं. कथेची पडद्यावरची हाताळणी, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत ह्यातून ती जाणवते. एका दिग्दर्शकासाठी हे एक मोठं यश आहे आणि ऊमेश कुलकर्णीने ते फार लवकर मिळवलं आहे. त्याच्या कलाकारांचा संच पण अगदी छान जमला आहे. मात्र पुन्हा त्यांनी गावातल्या पार्श्वभूमीवर हेच कलाकार घेऊन सिनेमा केला तर त्यात तोचतोचपणा येईल की काय माहित नाही. तो येऊ न देण्याची क्षमता ह्या दोघांत निश्चितच आहे.

परवा गिरीश कुलकर्णीशी "देऊळ" वर गप्पांचा कार्यक्रम आयोजित झाला होता. सिनेमा न पाहिल्यामुळे त्याला गेलो नाही. देऊळ आधी पाहिला असता तर त्यात सहभागी होता आलं असतं ही रुखरूख आता थोडे दिवस राहील.

असो. ब्लॉगच्या वाचकांनो (म्हणजे दोन तीन लोक :-)) "देऊळ" जरूर पहा आणि अशाच सुंदर कलाकृती आपल्याला बघायला मिळोत ह्याबद्दल आपापल्या देवाकडे प्रार्थना करा.

Tuesday, July 26, 2011

स्मृतीभंश

एकदा एक कोल्हा म्हणे झालंय ऊदास जंगल
खेळ घेऊन सगळ्यांचे ऊडवून देऊ दंगल

सिंह झाला खूष म्हणे मस्त ऊपाय काढला
ताबडतोब सगळ्या जंगलांना निरोप त्याने धाडला

जंगल लागले कामाला साफसूफ झाली सुरू
रहायला नवीन गुहा आणि नवीन ग्राऊंड करू

कोल्हा होता नायक त्याची सगळीकडे देखरेख
सगळ्या खर्चाचा भार ऊरी, रोज फाडू लागे चेक

बघता बघता दिवस ऊजाडला आले सगळे चमू
क्रीडानगरीत धमाल ऊडवायला खेळिये लागले जमू

गुहा होत्या गळक्या आणि स्टेडियम फुटके
आईस हॉकी खेळतानाही बसू लागले चटके

प्राणी सर्व चिडले म्हणती व्यवस्था ही कसली?
एवढा खर्च करूनही स्पर्धा का ही पिचली?

घेतलं कोपर्‍यात कोल्ह्याला आणि विचारला जाब
अशी कशी परतफेड जेव्हा केली राब राब?

कोल्हा म्हणे कोणती स्पर्धा? कसले पैसे कसले चेक?
पाच वर्षे झाली, मला आठवत नाही काही एक.

प्राणी म्हणती असं कसं, खात होतास तेव्हा?
शाबूत होती स्मॄती तूझी, टेडर्स काढली जेव्हा

कोल्हा झाला निराश म्हणे ऊफराटी तुमची तर्‍हा
भूकेचा नियम नैसर्गिक लागेल तेव्हा चरा

बाकी सगळा खेळ नियतीचा मी काय करू?
स्मृतीभंशात चूक झाली दंड कसा भरू?

माकड होता वैद्य त्याला आणलं लगेच तिथे
म्हणती तपास कर रोगाचा स्मृती गेली कुठे

माकडानेही थोडं लोणी कोल्ह्याघरी चाखलं होतं
खाल्ल्या मीठाचं ईमान त्यानेही नीट राखलं होतं

तो म्हणाला बाबांनो असाच विचित्र रोग हा
शिक्षा काय करता ज्याला आधीच आहे भोग हा

नशीब समजा फक्त पैशाच्याच गोष्टी हा विसरला
तुम्ही सहानुभूती दाखवा जर लंगड्याचा पाय घसरला

हताश झाले प्राणी काही, गुमान परत घरी गेले
त्यांचीही स्मृती धूसर झाली कोल्ह्याला ते विसरून गेले

जंगल तसंच ऊदास आहे, रोज वणवा रोज फायरिंग
राजा प्रधान मात्र म्हणती "अवर जंगल इज शायनिंग"

~ मुकुल जोशी

Tuesday, July 19, 2011

Harry Potter Movie 8 : A few disappointments

This weekend was dedicated to Harry Potter and JKR. I watched all the movies from the morning till the night and finally went to the cinema hall to mark the day by completing the marathon after watching HP 8.

The movie is good. For any fan of Harry Potter its needless to say that the movie is a must watch. That applies to any HP movie for that matter, whether they are excellent or they suck.

However, being a member of the clan that lives in the Harry Potter era, there are few things that disturbed me. And these are not great mistakes. Those of you who are into parenting will know how it feels to see your kid making a mistake at basic addition, when you know she is good at math. You are okay to accept that she fails to grasp a tricky problem. But somehow you don't like to it when there isn't a good reason to commit that kind of mistake in the first place.

Here are some such points about the movie and before you rant me about them please read the "Disclaimer" under the title of this blog.

1. 3D effects
The movie is 3D. Cool. That helps the film industry saving losses from piracy. (25% I guess, not sure) But it didn't give a feel that there is any reason beyond this to have the movie in 3D. Seriously, it has only handful of them. They could have made it a great 3D experience.

Some of the scenes are so dark that couple of times I felt like removing my 3D glasses. (I know the recent study asks you to get your eyesight checked if this happens.)

2. Not showing important aspects of the story

I would have liked to see Teddy Lupin. But that's fine. My biggest problem is not showing the story of Albus Dumbledore, Aberforth, Ariana and Grindelwald. It explains the weaker side of Dumbledore and tells that there were times when he committed mistakes for gaining power. Those who haven't read the books and have only seen the movies are now going to take Dumbledore as perfect.

3. Showing things that were un-necessary (of course IMO)

In this department there is just too much of liberty taken to add extra spice which was just not required. Sometimes it made the characters appear weaker/funny.

These things are

a. Olivander telling harry that he is f-word ed if Voldemort has got the wand.
b. Showing that Neville has crush on Luna!
c. Harry telling Hermione that their fears are indeed true, he has to die etc. etc.
d. McGongall saying she always wanted to use that spell. Yeah, that naughty-ness created a few laughs, but McGongall's character won't perhaps need that.
e. Malfoys running away like cowards ???
f. Showing too much of army. We know that the death eaters escaped from Azkaban, but this was a battle and not a war. It was mostly at personal level. Why think that big and grand means best always?
g. Harry falling down with Voldemort saying "Tom, lets end it together the way it started".. or something of that sort. Seems like Parvati Patil has taken the crew to a few Hindi movies and they are super impressed with the climax dialogues.

4. Showing Voldemort's character as weaker

I love Voldemort. He is a no-nonsense villain. He means his business and he excels at it.

Remember the previous movie when he takes the wand from Lucious Malfoy? Malfoy has this nice silver handle to his wand, which Voldemort throws away. He wants just the wand and no useless decoration.

If any of you are programmers, try to recall how you feel when you see the laptops with accessories to give it different feminine looks to match the rest of the dress. The country has been on intellectual decline since the VAIOs & Dells started to manufacture these. The typical customers of these must be sending texts to their flock like "Dad got me a new lappy, its baby pink.. scho schweet"! (Very likely that the shade I mentioned is wrong, but my vocabulary doesn't go beyond basic colors and baby pink)

The way we loathe the concept and love our bare bone machine, Voldemort means his business. I was maha-impressed with this scene. We know when its a computer you talk about its processor and cores! Even if its a wand the core is what matters! You, me and Voldemort know this.

Now come to movie 8. He laughs like a comic character. I felt pain. The moment any horcrux gets destroyed Voldemort may be losing power, but lose all horcruxes on any day he is still ass-kicking powerful guy. The movie portrays him to get too weak (mentally) as if he has started losing heart in the whole business. He is trying to hide Nagini as if he knows hell will break lose on him soon. At least I felt so, and hence didn't like it.

5. 19 years later

If you don't know it, let me tell you that Prof. Flitwick and Griphook were played by the same actor. This means that the make up artists team kicks butts. No doubts.

But then, was this team serving its punishment in Azkaban when the "19 years later" scene was shot? If not they should be sent there.

Who looks of 36/37 amongst all of them? Maybe Ginny. Harry looks a bit old than usual, Ron looks like the same Ron (only clean shaven) and Hermione - are you telling us that Emma Watson will look exactly same 19 years down the line? Seriously, such a poor job at makeup!!

I am going to watch it once again for sure, and I am hoping that I don't notice anything more.

Friday, June 3, 2011

कोरी पाटी

मागच्याच महिन्यात गार्गीची पुस्तकं आणि वह्या आणल्या. पहिलीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि दप्तराचं वजन पाहता मला माझं बालपण आठवलं. मी मराठी माध्यमाच्या सरकारी अनुदान असलेल्या शाळेचा विद्यार्थी. नवीन कोरी पुस्तकं विकत घेऊन वापरणार्‍या आर्थिक स्तरातला. अनेक मुलं भावाबहिणींची जुनी पुस्तक वापरत असत.

पहिलीपासूनच वेगवेगळ्या टाईपच्या शंभर आणि दोनशे पानी वह्या वापरणं ही चैन अनेकांना परवडणारी नव्हती. बाजरातून घाऊक प्रमाणात ताव किंवा रद्दीतून कोरी पानं घेऊन ही मुलं वह्या बाईंड करून घेत असत. चौथी पर्यंत तर आम्ही बर्‍याचशा लिखाणासाठी पाटी वापरत होतो.

गार्गीला मी दोन वर्षांपूर्वी पाटी आणली. कोणत्याही दुकानात आपल्याला सहज पाटी विकत मिळेल ही माझी कल्पना पार खोटी ठरली. आणलेली पाटी ही तिच्यासाठी एक गंमत किंवा खेळ ह्यापलिकडे काही नव्हतं. ईथून पुढेही ह्यात काही बदल घडेल असं नाही. कारण आता पाटीवर लिहीणं हा शालेय ऊपक्रमांतला भागच नाही.

आमच्या वेळी दगडी पाटीवर लिहीणं हा नित्यनियमाचा भाग होता. शाळेतून दिलेला घरचा अभ्यास आणि पाढे आम्ही घरून पाटीवर गिरवून आणत होतो. माझ्यासारख्या चांगल्या (!) घरातील मुलांकडे कमी वजनाच्या डबल पाट्या असायच्या. स्पंजचा तुकडा ठेवायला एक छोटी त्याच आकारची डबी आमच्याकडे होती. कधीतरी तो न वापरता जीभेवर बोट लावून आम्ही पाटीवरचं चूकीचं लिहिलेलं खोडायचो. स्वच्छ कोर्‍या पाटीवर लिहायला खूप छान वाटायचं.

हे सगळं आता गेलं. पाटी एकदम 'डाऊन मार्केट' झाली. बहुदा ती वापरणं हे 'घाटी'पणा ठरत असावं. कोर्‍या, गुळ्गुळीत पानांच्या, चित्रं असलेल्या वह्यांपुढे पाटी एकदमच गावरान नाही का? कापडी पिशव्यांपेक्षा आकर्षक दिसणार्‍या प्लॅस्टिकच्या पिशव्या रोजच्या वापरात आल्या त्या ह्यामुळेच. आजकाल प्रत्येक गोष्टीला "ऊंफ फॅक्टर" लागतो, प्रियांका चोप्राचा जो आहे तसा.

पाटीला कालबाह्य करून आपण तो मिळवला खरा. पण त्यामुळे काही इतर गोष्टी घडू लागल्या. पाटीने अक्षर वळणदार होतं हे मी म्हणू शकत नाही. माझं स्वतःचं अक्षर पाह्ता मी नियमाचा अपवादच ठरेन.

१. पण माझ्या लहानपणी पेन्सिलीला टोक करण्यात माझ्या आईबाबांना फार वेळ वाया घालवावा लागला नाही.
२. जी काही खाडाखोड मी केली असेल त्याच्या स्मॄती त्या पाटीने कधी अंगावर खेळवल्या नाहीत. लिहायला शिकताना सहज होणार्‍या त्या चूकांच्या पुराव्यांवरून घरी काय किंवा शाळेत काय, मला शेरे कधी मिळाले नाहीत.
३. रेकॉर्ड न राहिल्याने कालच्यापेक्षा मी सुधारणा केली का नाही ह्याची अनाठायी चर्चा कोणी केली नाही.
४. पालक-शिक्षक संवाद (जो कधी फारसा घडतच नसे) हा, "अजून त्याच्या वेलांटीचं वळण नीट येत नाही" अशा मुद्द्यांवर कधी घडला नाही.

आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, वॄक्षतोड, पर्यावरण, रिसायकल्ड पेपर अशा गोष्टींचं बाळकडू कोणी मला न कळत्या वयात पाजलं नाही. शाळेतून पाटी बाद करून ह्या गोष्टी मुलांच्या पचनी पडाव्यात अशी अपेक्षा करणार्‍या आपल्या सगळ्यांची पाटी, खरतर नसते हव्यास धरण्यानं कोरीच राहत्येय असं मला वाटतं. पण ती आपण जपून ठेवूया.

आपल्या लहानपणी बोरू ही जशी संग्रहालयातून पाहण्याची गोष्ट होती तशीच आपल्या नातवंडांना इतिहासकालीन लिखाणाची सामुग्री म्हणून ती दाखवायला आपल्याला ऊपयोगी ठरेल.