Saturday, August 17, 2013

लग्न

 लग्न म्हणजे काय रे भाऊ?
 छोटा विचारीत आला
 गहन विषय सोपा
 कसा करून सांगू त्याला?

 लग्न म्हणजे मीलन
 का लग्न म्हणजे जुगार?
 लग्न म्हणजे तोंड दुसरे
 वाटून खाण्या पगार?

 लग्न दगडाखालचा विंचू
 लग्न फुरफुरणारा साप
 लग्न म्हणजे स्वातंत्र्याला 
 घट्ट लावलेला चाप?

 लग्न म्हणजे तडफड
 का लग्न नुसता अट्टाहास
 क्षणाच्या आनंदाकरिता असे
 का कवटाळिलेला एक फास?

 अनेक प्रश्न छोट्याचे
 हेलाविती मनाला 
 कसे समजाऊ ना कळे
 त्या भाबड्या जीवाला 

 कोण सांग ऐकवी
 ह्या अशा गोष्टी तुला?
 कधी समजावून घेतलेस
 का रे तू बागुलबुवाला?

 लग्नाचा ऊहापोह
 सांगितला रे तुला कोणी?
 सूर राग जरी न कळे
 तरी गायलीसच ना तू गाणी?

 बावळ्या लोकांपरी तू
 चर्चा कशास मांडली?
 गंध वास ही न घेता
 फुले जी त्यांनी सांडली

ज्या गोष्टी जगताना
नव्याने रोज भेटती
त्यांची चर्चा अपूर्णातच
का बरे हे फेटती?

लग्न हे स्वप्न सुंदर
लग्न जीवनातील सेतू
समरसून ते जगावे
हाच ठेवावा तू हेतू

लग्न दोघांचा प्रवास
लग्न दोघांची कहाणी
लग्न हे द्वंद्वगीत
प्रेमकाव्य वा विराणी

जे प्रवासे सापडावे
चार डोळ्यांनी पहावे
कालच्या ग्रीष्मासही मग
सुखानेच आठवावे

हातावरी जमवावे अश्रू
सुखदु़:ख जय भयाचे  
दोघांनीच घेता ओठी
प्रत्येक थेंब ते मधाचे

No comments:

Post a Comment