Friday, June 3, 2011

कोरी पाटी

मागच्याच महिन्यात गार्गीची पुस्तकं आणि वह्या आणल्या. पहिलीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि दप्तराचं वजन पाहता मला माझं बालपण आठवलं. मी मराठी माध्यमाच्या सरकारी अनुदान असलेल्या शाळेचा विद्यार्थी. नवीन कोरी पुस्तकं विकत घेऊन वापरणार्‍या आर्थिक स्तरातला. अनेक मुलं भावाबहिणींची जुनी पुस्तक वापरत असत.

पहिलीपासूनच वेगवेगळ्या टाईपच्या शंभर आणि दोनशे पानी वह्या वापरणं ही चैन अनेकांना परवडणारी नव्हती. बाजरातून घाऊक प्रमाणात ताव किंवा रद्दीतून कोरी पानं घेऊन ही मुलं वह्या बाईंड करून घेत असत. चौथी पर्यंत तर आम्ही बर्‍याचशा लिखाणासाठी पाटी वापरत होतो.

गार्गीला मी दोन वर्षांपूर्वी पाटी आणली. कोणत्याही दुकानात आपल्याला सहज पाटी विकत मिळेल ही माझी कल्पना पार खोटी ठरली. आणलेली पाटी ही तिच्यासाठी एक गंमत किंवा खेळ ह्यापलिकडे काही नव्हतं. ईथून पुढेही ह्यात काही बदल घडेल असं नाही. कारण आता पाटीवर लिहीणं हा शालेय ऊपक्रमांतला भागच नाही.

आमच्या वेळी दगडी पाटीवर लिहीणं हा नित्यनियमाचा भाग होता. शाळेतून दिलेला घरचा अभ्यास आणि पाढे आम्ही घरून पाटीवर गिरवून आणत होतो. माझ्यासारख्या चांगल्या (!) घरातील मुलांकडे कमी वजनाच्या डबल पाट्या असायच्या. स्पंजचा तुकडा ठेवायला एक छोटी त्याच आकारची डबी आमच्याकडे होती. कधीतरी तो न वापरता जीभेवर बोट लावून आम्ही पाटीवरचं चूकीचं लिहिलेलं खोडायचो. स्वच्छ कोर्‍या पाटीवर लिहायला खूप छान वाटायचं.

हे सगळं आता गेलं. पाटी एकदम 'डाऊन मार्केट' झाली. बहुदा ती वापरणं हे 'घाटी'पणा ठरत असावं. कोर्‍या, गुळ्गुळीत पानांच्या, चित्रं असलेल्या वह्यांपुढे पाटी एकदमच गावरान नाही का? कापडी पिशव्यांपेक्षा आकर्षक दिसणार्‍या प्लॅस्टिकच्या पिशव्या रोजच्या वापरात आल्या त्या ह्यामुळेच. आजकाल प्रत्येक गोष्टीला "ऊंफ फॅक्टर" लागतो, प्रियांका चोप्राचा जो आहे तसा.

पाटीला कालबाह्य करून आपण तो मिळवला खरा. पण त्यामुळे काही इतर गोष्टी घडू लागल्या. पाटीने अक्षर वळणदार होतं हे मी म्हणू शकत नाही. माझं स्वतःचं अक्षर पाह्ता मी नियमाचा अपवादच ठरेन.

१. पण माझ्या लहानपणी पेन्सिलीला टोक करण्यात माझ्या आईबाबांना फार वेळ वाया घालवावा लागला नाही.
२. जी काही खाडाखोड मी केली असेल त्याच्या स्मॄती त्या पाटीने कधी अंगावर खेळवल्या नाहीत. लिहायला शिकताना सहज होणार्‍या त्या चूकांच्या पुराव्यांवरून घरी काय किंवा शाळेत काय, मला शेरे कधी मिळाले नाहीत.
३. रेकॉर्ड न राहिल्याने कालच्यापेक्षा मी सुधारणा केली का नाही ह्याची अनाठायी चर्चा कोणी केली नाही.
४. पालक-शिक्षक संवाद (जो कधी फारसा घडतच नसे) हा, "अजून त्याच्या वेलांटीचं वळण नीट येत नाही" अशा मुद्द्यांवर कधी घडला नाही.

आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, वॄक्षतोड, पर्यावरण, रिसायकल्ड पेपर अशा गोष्टींचं बाळकडू कोणी मला न कळत्या वयात पाजलं नाही. शाळेतून पाटी बाद करून ह्या गोष्टी मुलांच्या पचनी पडाव्यात अशी अपेक्षा करणार्‍या आपल्या सगळ्यांची पाटी, खरतर नसते हव्यास धरण्यानं कोरीच राहत्येय असं मला वाटतं. पण ती आपण जपून ठेवूया.

आपल्या लहानपणी बोरू ही जशी संग्रहालयातून पाहण्याची गोष्ट होती तशीच आपल्या नातवंडांना इतिहासकालीन लिखाणाची सामुग्री म्हणून ती दाखवायला आपल्याला ऊपयोगी ठरेल.