Tuesday, November 22, 2011

देऊळ - जेथे कर माझे जुळती

मला आवडणारी देवळं ३. एक सारसबाग, दुसरं पर्वती आणि तिसरं कोथरूडमधलं पूजा पार्क. त्यात काल अजून एकाची भर पडली. हे देऊळ म्हणजे ऊमेश आणि गिरीश कुलकर्णींनी घडवलेलं आणि घोलपांच्या फंडातून ऊभं राहिलेलं.

काल रात्री देऊळ पाहिला. एक नितांतसुंदर कलाकृती पाहिल्याचं समाधान मिळालं. ही "पोस्ट" म्हणजे देऊळ ची समीक्षा नाही. माझ्यासारख्या पामराने ती करूही नये. मिळालेल्या समाधानातून अगदी सहज सांगावं असं वाटलेलं इथे लिहीत आहे.

देऊळ ही कथा घडते एका अगदीच छोट्या गावात. गावातली प्रमुख वस्ती, छोट्या टेकाडावरून पाहिलं तरी नजरेत मावेल एवढी. विशेष काहीच न घडणारं आणि त्यामुळे अगदी छोट्या प्रसंगांची ही बातमी व्हावी असं हे गाव. गावातली कॅरॅक्टर्स म्हणजे राजकारणी, नशिबाला दोष देत रिकामधंदे करणारे टोळभैरव, समज आणि विवेक ह्याच्या जोडीने गावाच्या विकासाची आस धरणारे अण्णा, महिला आरक्षणातून निवडून आलेली सरपंच, गावच्या काड्यांतून कुठे विस्तव पेटवता येईल का ह्या शोधात असणारा पत्रकार, एक निरागस आणि निखळ व्यक्तीमत्त्वाचा तरूण केशा, त्याचं कुटुंब आणि इतर गावकरी. चित्रपटाचा वेग हा गावातील एकंदर घडामोडींच्या वेगाशी नाळ साधणारा.

अशा पार्श्वभूमीवर केशाला एका ऊंबराच्या झाडाखाली पहूडलं असताना दत्ताचा साक्षात्कार होतो. गावात दत्त आल्याची बातमी होते आणि गावातल्या समाजकारणाला एक वेगळंच वळण लागतं. "विकासाची" स्वप्न साकारायचं राजकारण अगदी स्वाभाविकपणे शिजू लागतं आणि बघता बघता गावात दत्ताचं देऊळ ऊभं राहातं. दत्ताचा "टीआरपी" वाढवायचे सर्व नैतिक, अनैतिक प्रकार घडतात आणि सगळं गावंच त्या क्षेत्राच्या तीर्थात आपले हात ओले करू लागतं. ह्या सर्व प्रकाराचा फोलपणा आणि त्यातली अनैतिकता पटत नाही ती फक्त अण्णांना. ह्या सर्व प्रकाराचं योग्य फलित प्राप्त करणं कोणाच्याच हातात नाही हे अगतिकपणे बघत असताना ते गाव सोडून शहरात जाण्याचा निर्णय घेतात. आता ऊरतो तो फक्त केशा.

केशाची वास्तल्यस्थानं असतात ती दोन - एक दत्त आणि दुसरी त्या दत्ताची गाय, करडी. ऊरलेल्या गावकर्‍यांचा संबंध असतो तो फक्त "देऊळाशी". जेव्हा व्यावसायिक प्रगतीने बेधुंद झालेल्या गावात करडीचा अंत होतो आणि केशाला त्याच्या देवापासून वेगळं केलं जातं तेव्हा त्याला ह्या अवडंबराच्या वास्तवाची जाणीव होते. ऊद्विग्नावस्थेतला केशा भक्तांना मुक्तीचा मार्ग दाखवणार्‍या त्या दत्ताला देऊळातून "मुक्त" करतो. गावकर्‍यांचा देव मात्र मूर्तीतच असल्याने ते दुसरा "देव" आणून पुन्हा देऊळ सुरू करतात.

ही कथा पडद्यावर कसा आकार घेते हे प्रत्येकाने प्रत्यक्षच पहावं. मार्मिक आणि प्रसंगनिष्ट विनोदी अंगाने खुलवलेली ही कथा कुठेही त्यामागची वैचारिक बैठक सोडत नाही. खेड्यातल्या समाजातले आणि देशातल्या धार्मिक संस्कृतीचे ऊद्विग्न करणारे प्रश्न डोळ्यासमोर ऊभे करताना लेखक आणि दिग्दर्शक कुठेही कुठलाही ऊपदेश करत नाहीत पण योग्य ते भाष्य करायचं सोडतही नाहीत. विनोदाची साथ घेताना कुठेही कथा गांभीर्याशी फारकत घेऊन ऊथळ होत नाही तशीच कुठेही गांभीर्याच्या आहारी जाऊन मूळ विनोदी अंग सोडत नाही. धार्मिक अवडंबराचं संपूर्ण "दर्शन" घडवताना, देव - भक्ती - धर्म - संस्कृती ह्या संकल्पनांना कुठेही तडा जाऊ न देता - खरंतर तेही केशाच्या आणि अण्णांच्या विचारातून योग्यतेने दाखवण्याचं अवघड काम ऊमेश आणि गिरीश अतिशय सहजतेने करतात. ह्या जोडीचं खूपच कौतुक!

"देऊळ" मधले कित्येक प्रसंग लक्षात राहतात ते त्यातल्या साधेपणामुळे, मार्मिकपणामुळे आणि कलाकारांनी ऊत्कृष्टपणे वठवलेल्या त्यांच्या भूमिकांमुळे. योग्य कथा आणि दिग्दर्शन लाभलेल्या गुणी मराठी कलाकारांकडून असा अभिनय घडणं हे आपल्याला नवीन नाही. परंतु सिनेमात केलेला कॅमेराचा आणि प्रकाश्/छायेचा वापर हा "देऊळ" ला एका वेगळ्याच ऊंचीवर नेऊन ठेवतो आणि ही कला मराठी चित्रपटात आणल्याबद्दल ऊमेश आणि टीमचं विशेष अभिनंदन. चित्रपट पहाताना अनेक फ्रेम्स नजरेला वेड लावतात. सिनेमा सुरूच होतो तो वाळूत रेखाटन केलेल्या सुरेख नामावलीपासून. आणि संपतो तो श्रेयनामावलीत वाटा असलेल्या प्रत्येकाचा न चुकता ऊल्लेख करून. रॉटरडॅमचा ऊल्लेख असणारं "ईस्टर एग" ह्या टीमबद्दल जरा जास्त माहिती असणार्‍यांसाठी मस्त वाटतं.

वळू, विहीर आणि देऊळ ह्यातून गिरीश आणि ऊमेशची एक स्वत:ची स्टाईल असल्याचं लक्षात येतं. कथेची पडद्यावरची हाताळणी, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत ह्यातून ती जाणवते. एका दिग्दर्शकासाठी हे एक मोठं यश आहे आणि ऊमेश कुलकर्णीने ते फार लवकर मिळवलं आहे. त्याच्या कलाकारांचा संच पण अगदी छान जमला आहे. मात्र पुन्हा त्यांनी गावातल्या पार्श्वभूमीवर हेच कलाकार घेऊन सिनेमा केला तर त्यात तोचतोचपणा येईल की काय माहित नाही. तो येऊ न देण्याची क्षमता ह्या दोघांत निश्चितच आहे.

परवा गिरीश कुलकर्णीशी "देऊळ" वर गप्पांचा कार्यक्रम आयोजित झाला होता. सिनेमा न पाहिल्यामुळे त्याला गेलो नाही. देऊळ आधी पाहिला असता तर त्यात सहभागी होता आलं असतं ही रुखरूख आता थोडे दिवस राहील.

असो. ब्लॉगच्या वाचकांनो (म्हणजे दोन तीन लोक :-)) "देऊळ" जरूर पहा आणि अशाच सुंदर कलाकृती आपल्याला बघायला मिळोत ह्याबद्दल आपापल्या देवाकडे प्रार्थना करा.