Wednesday, December 31, 2008

वर्षाचा गोड शेवट

ज्यांच्या ब्लॉगची आम्ही मनोभावे पूजा करतो, ज्यांचे लेख ही आमच्या दिवसाच्या ब्लॉगसफरीची सुरुवात असते, ज्यांच्या लिखाणाच्या सरासरी क्वालिटी च्या जवळपास आमचं एक जरी पोस्ट पोहोचलं तर आम्ही "पहला नशा" त ल्या आमीर खान सारखे (पुलोव्हर च्या ऐवजी, गंजीफ्रॉक फिरवून) नाचू त्या "बातमीदारां"नी आमचा ब्लॉग वाचला. आणि नुसता वाचलाच नाही तर प्रतिक्रिया ही दिली.

रा. रा. मुकुलजी,
पागोट्याकडं पाहून धोतर फेडायची नॅक तर तुमच्याकडंही दिसते.
तुमच्या या ब्लॉगमधले आणखी काय आवडले सांगू?
तुमच्या प्रोफाईलमधला मजकूर.
मस्त.
- ब्लॉगएडिटर, ए-सिडिक कम्युनिकेशन्स, मुंबई

बाकी वर्ष कसं गेलं ह्याचा विचार करावा का नाही ह्या प्रश्नात असताना, शेवटचा दिवस मात्र झकास!!!

Tuesday, December 30, 2008

निखळ विनोदाचा झरा - इंडिया TV

"डॉक्टरकाका, निखळ विनोद म्हणजे नक्की काय हो?" असा कोथळाकाढू प्रश्न चिमीने डॉ. पोट्यांना ना धड घरात ना बाहेर, ना दिवसा ना रात्री, ना धड शुद्धीत ना तारेत अशा अवस्थेत विचारला. डॉ. पोटे हे बिनऔषधाचे पी. एच. डी. डॉक्टर. विद्यापीठात प्रोफेश्वरकी करतात. फावल्या वेळात पुस्तकं छापून रद्दीवाल्यांचा धंदा ही वाढवतात. (वास्तविक त्यांच्या ह्या पेशामुळे अगदीच त्यांचा रोगांशी संबंध नाहीच असं नाही, पोटदुखी त्यांना विशेष मानवते.) "विनोद" हा त्यांचा जिव्हाळ्याचा आणि अभ्यासाचा विषय. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी विनोदाची प्रक्रिया, विनोद - प्रकॄती, विकृती की कलाकृती?, काही विनोदी पाककृती, पाककलेतील विनोदांचे संस्करण असे विविध ऊल्लेखनिय लेख, शोधनिबंध प्रसिदध केले आहेत. "कुमारसंभवातील विनोद आणि विक्रमोर्वशीयातील पिचक्या" आणि "कुमारसंभवातील विनोदप्रक्रियेतील कालिदासाच्या त्रुटींचे बिघडलेल्या पाककृतींतील त्रुटींशी असणारे साम्य व फरक" ह्या विषयांवर त्यांच्या दोन विद्यार्थिनींनींना विद्यापीठाने पी. एच. डी. प्रदान केली. डॉक्टरांचा नुकताच त्यांच्या गावाने "कुर्डुवाडीचे अत्रे" असा गौरव केला.

हे सगळं सांगण्याचं कारण, विनोद ह्या विषयावर डॉ. पोटे ही किती मोठी ऍथॉरिटी आहे हे तुम्हाला कळावं ईतकंच. तर चिमीच्या पृच्छेने डॉ. विचारांच्या गर्तेत गेले. समोरून लवकर ऊत्तर येणार नाही हे जोखायला चिमीला वेळ लागला नाही. आपणच प्रश्न विचारून ऊत्तर काढून घ्यायला हवं हे तिने ताडलं. घडलेला संवाद तो हा असा

चिमी: डॉक्टरकाका, निखळ विनोद म्हणजे नक्की काय हो?
डॉ: ......................... काहीच नाही.

चिमी: म्हणजे भरत जाधव, केदार शिंद्यांचा असतो. तो का?
डॉ: छे, छे. तो विनोद नाही. तो झाला आचरटपणा.

चिमी: मग ते आजकाल च्यानलवाले पुरस्कार देतात, त्याच्या कार्यक्रमात सूत्रसंचालक करतात तो?
डॉ: तो वाह्यातपणा.

चिमी: ओह. ते ह्सा हसा लागतं ते. जितेंद्र जोशी, अनासपुरे असतात ते हो. त्यात ते स्पर्धक करतात तो का निखळ विनोद?
डॉ: तो कसला विनोद. तो नुसताच विनोदनिर्मीतीचा अनाठायी प्रयत्न.

चिमी: अरेच्या. मग तो प्रशांत दामले (अनेक ऊवांचा पती) काहीबाही बोलून हसतो बघा, ते?
डॉ: तो विनोदनिर्मीतीचा फसलेला प्रयत्न.
... एव्हाना डॉ. ना प्रश्न विचारणं हा ऊत्तर मिळवण्याचा फसलेला प्रयत्न आहे हे चिमीच्या लक्षात येऊ लागलं होतं.

डॉ. : तू गडकरी, चिं.वि., प्र्.के, द.मा., पु.ल. वाचले असशील ना?
चिमी: नाही हो. माझं एज्युकेशन इंग्लिश मिडीयम मध्ये झालं ना काका. आणि तुम्हाला तर माहितीय मला कित्ती बोअर होतं वाचताना ते?

डॉ. : अग मग तू मराठी विषय घेतलासच का?
चिमी: असं कसं काक? थोडं मराठी मला यायला नको का? माझ्यासारखं धेडगुज्री का काय ते मर्‍हाठी येणार्‍या यंग मुलांना कित्ती स्कोप आहे आत्ता नवीन टी. व्ही. आणि रेडिओ च्यानेल्स वर?

डॉ. : पण मग तुला एवढा गहन प्रश्न पडायचं कारणंच काय? (ऊत्तर येत नसेल तर मूळ प्रश्नाच्या शक्यतेलाच हात घालावा ही प्रोफेश्वरांची जुनी ट्रीक)
चिमी: होमवर्क ला दिलाय हो.

हा संवाद चालू असतानाच डॉ. एकीकडे च्यानेल्स फिरू लागले. आणि काय चमत्कार. आपण शोधत असलेल्या ऊत्तराचं दर्शन त्यांना घडलं. "युरेका", डॉ ओरडले. कोणतं च्यानल समोर असेल हे वाचकांच्या लक्षात हे आलं असेलच. नवीन पी.एच. डी. साठी डॉ. ना आता अनेक विषय सुचले आहेत.




ॐ भवति फ्रेंडशिप देहि

आम्ही कॉलेज मध्ये शिकत असताना, फ्रेंडशिप मागणे हा प्रकार ऊदयाला येत होता. ही देवघेव भिन्नलिंगी व्यक्तींमध्ये होते हे सूज्ञास सांगावयाची गरज नाही. हा प्रकार आम्हाला कधीच मानवला नाही. मागून ही कोणी दिली नसती हे मुख्य कारण असावं. एकंदरीतच ही लाचारी पटण्यासारखी नव्हती आणि मैत्री ही मागून घेण्याची गोष्ट नाही असं एक आम्हाला वाटतं. सध्या हा प्रकार किती बोकाळला असेल याची आम्हाला कल्पना नव्हती. पण परवाच आम्ही आमच्या एका (जशा की खोर्‍याने आहेत) सुमुखी मैत्रिणीच्या ओर्कुट वरच्या प्रोफाईल ला भेट दिली.

आमची ही मैत्रीण दिसण्याच्या बाबतीत म्हणजे ऐश्वर्या, माधुरी, प्रीती, सुश्मिता आणि दिपीका यांनी बनलेली ॠषिपंचमीची भाजीच जणू! (वा! काय ऊपमा आहे) तिच्या वैयक्तिक आयुष्यात काय घडतंय ह्यात डोकावून पहायची आम्हाला तीव्र ईच्छा झाली. (आणि का असू नये? ओर्कूट सारख्या कम्युनिटीतून एखाद्याने ते रूखवतासारखं मांडलं तर पाहणार्‍यांचा काय दोष म्हणतो आम्ही.) आम्ही लगेच तिचं ऊतू जाणार्‍या दूधासारखं वाहणारं स्क्रॅप-बूक ऊघडलं. बघतो तर त्यात फ्रेंडशिप दे ,फ्रेंडशिप दे अशा अनेक रिक्वेस्टा. आता मला सांगा अशा भिकमंग्यांना वाटून वाटून आमच्या मैत्रिणीची फ्रेंडशिप संपून गेली तर आमच्यासाठी काय ऊरेल? चिंतामग्न झालो आहोत आम्ही.

Monday, December 29, 2008

गर्लफ्रेन्ड सोडून गेली, का?

आमच्या लहानपणी घरी येणार्‍या पाहुण्यांना यजमानांच्या मुलांना कोडी घालण्याची सवय (खोड) असायची. कदाचित "लईच कवतिक करतायेत आईबाप पोराच्या हुशारीचं, बघूया तरी" अशी भूमिका त्या मागे असावी. ह्यातलं एक पेटंट कोडं असं होतं की ज्यात निरनिराळे प्रश्न असायचे पण ऊत्तर मात्र सगळ्यांचं एकच असायचं. भाकरी करपली का, घोडी अडली का, पानं कुजली का? ही ती प्रश्नावली. आज आम्ही त्यात एका नवीन प्रश्नाची भर (जी कायमच मौलिक असते ती) टाकत आहोत.

भाकरी करपली का, घोडी अडली का, पानं कुजली का? "गर्लफ्रेन्ड" सोडून गेली, का? फिरवली नाही म्हणून. आमचं असं अवलोकन आहे. हे असे अनुभव कायम दुसर्‍याला, आमचं बोंबलायला तेवढं फकस्त अवलोकन। चालायचंच. तुम्ही सांगा बरोब्बर की नै ?

ह्या संदर्भात पेट्रोल, डिझेल चे भाव कमी होत आहेत ही "बॉयफ्रेंड" मंडळींसाठी एक विशेष आनंदाची बाब आहे. भागो सिंहगड!

Sunday, December 28, 2008

नवीन वर्षाचे आगमन साजरे करण्यासंबंधी

आमच्या काही निरूद्योगी आणि नाठाळ मित्रांनी नुकतेच आम्हाला नवीन वर्षाचे आगमन साजरे करण्यासाठी एकत्र जमण्यास निमंत्रण दिले. वास्तविक सद्य परिस्थितीत काहीही साजरं करण्याच्या आम्ही विरूद्ध आहोत. अरे परिस्थिती काय, पार्टी कसली करता? मात्र, आमचे मित्र ही ह्याच विचाराचे असल्याने २००८ चं एकत्रित सिंहावलोकन करण्यासाठी आम्ही जमू. पार्टी नाही करणार. असो. तर १ जानेवारी हा नववर्षाचा पहिला दिवस धरावा का हा प्रश्न आमच्या मराठी आणि भारतीय मनास शिवला आणि आम्ही ताबडतोब आंतरजालावर पृच्छा केली. सनातन प्रभात द्वारे लगेचच शंकेचं निरसन झालं. (पहा : http://dainiksanatanprabhat.wordpress.com/)

नववर्षाच्या उत्पत्तीबद्दल मिळालेले ज्ञान
अ. नववर्षाच्या उत्पत्तीच्या वेळी कालचक्रातून क्रियालहरींचे प्रक्षेपण होऊन सृष्टीधारणा नवचेतनेने भारित होत असणे व नववर्षारंभ साजरा करणे, म्हणजेच या लहरींना ग्रहण करून धर्मशक्‍तीच्या तेजाच्या माध्यमातून सृष्टीरूपाला धर्मतेज पुरवणे, तसेच या माध्यमातून स्वत:ची व समाजाची उन्नती करून घेणे नववर्षारंभ गुढीपाडव्याऐवजी १ जानेवारीला साजरा करणे अयोग्य का ?

आम्हाला किती सोपे प्रश्न पडतात ह्याची आम्हाला लाज वाटली. कालचक्रातून क्रियालहरींचे प्रक्षेपण होऊन सृष्टीधारणा नवचेतनेने भारित होत असणे, वगैरे गोष्टी आमच्या वैचारिक शक्तींच्या पलिकडे आहेत. आणि त्याचं ऊत्तर वाचून तर आम्ही दिग्मूढ झालो. संपूर्ण ऊत्तर येथे देत नाही. ते वाचून झाल्यावर शुदधीवर येण्यासाठी आम्हाला १२ घटिका आणि १० पळे लागली. आजूबाजूचे सर्व सहकारी हातात चप्पल घेऊन धावले (हुंगवायला हो!) त्यामुळे ऑफिसमध्ये ठणाणा झाला तो वेगळाच.

काही भाग बघा.

कालपोकळीत आतापर्यंत दिसलेली कालचक्रे वगैरे सर्व गोष्टी काळाची प्रत्यक्ष निर्मिती व संचारण यांच्याशी संलग्न आहेत. समष्टीच्या इच्छाशक्‍तीच्या बळावर कनिष्ठ, म्हणजेच सगुण स्तरावरच्या काळाची निर्मिती होऊन प्रत्यक्ष सगुणत्व स्वरूपातून सगुणत्व काळाच्या क्रियारूपाच्या अनुषंगाने सगुण स्तरावरील काळरूप घटनाचक्र गतीमान होऊन कार्य करते. अशा प्रकारे होणारी काळाची निर्मिती, हे काळाच्या स्थितीरूप संचारणाशी निगडित असल्यामुळे ब्रह्मांडाच्या कालचक्राच्या स्थितीरूपाच्या संचारणात्मक भागात ब्रह्मांडाच्या स्तरावरील काळाच्या अनुषंगाने पृथ्वीवरील काळाच्या घटक स्वरूपातून सगुणत्वरूपी काळाची निर्मिती होते.

अरे-बापरे ! अगबाईअरेच्चा ! अग्गोबाई-ढग्गोबाई ! काय हे? एकंदरीत काहीतरी वाईट आहे १ जानेवारी ला नववर्ष मानणे. त्यामुळे आम्ही ताबडतोब आमच्या सर्व मित्रांना हा लेख ईमेल ने पाठवला आहे. आणि आता आम्ही ह्या लेखात विखुरलेल्या अनंत ज्ञान-कणांवर चर्चा आणि ऊहापोह करण्यासाठी, ३१ डिसेंबरच्या रात्रौ जमण्याचे ठरवलेआहे.

Saturday, December 27, 2008

सर्वात आवडता शब्द

ऊर्ध्वश्रेणीकरण ह्या शब्दाची ओळख करून दिल्याबद्दल धोंडोपंत आपटे ह्यांचे आभार. खरंच छान शब्द आहे. ह्या निमित्ताने विचार आला की आपला आवडता शब्द कोणता?तसे अनेक छान शब्द आहेत आपल्या भाषेत. "एकसमयावच्छेदेकरून" सारखी भारदस्त मंडळी त्यात आहेत, "हळूहळू" सारखे ऊच्चारातून अर्थ ध्वनित करणारी मंडळी आहेत. (ळ मुळे हा शब्द पटकन म्हणता येत नाही, पटकन सारखा). पण आमच्या ल़क्षात आलं आहे की, आमचा सर्वात आवडता शब्द आहे "फुकट".

हा शब्द आम्हाला सर्वात जास्त आनंद देऊन जातो. एखाद्या गोष्टीला फुकट हे विशेषण लागलं की आम्ही हर्षमुदीत होतो. काही नाठाळ मंडळी आम्हाला "फुकटे" असं तुच्छतेने म्हणतील. पण आम्ही त्यांकडे दुर्लक्ष करतो. जे आहे ते आहे - आपण ऊगाच खॉटे आव आणत नाही. अगदी एक शब्द म्हणून सुद्धा "फुकट" ला स्वतंत्र अस्तित्त्व आहे. आम्ही असं म्हणतो कारण त्याचा इंग्रजीतला प्रतीशब्द बघा. free ह्याचे दोन अर्थ होतात. मुक्त किंवा फुकट. त्यामुळे फुकट ह्या अर्थी तो वापरायचा असला तर ऊगाच free as in free beer अशी लांबड लावावी लागते. फुकट चं तसं नाही. आपला अर्थ समजावा ह्या साठी त्याला बाकी शब्दांच्या कुबड्या घ्याव्या लागत नाहीत.

आमच्या खटल्याला, हे अजिबात आवडत नाही. म्हणजे बाकी आमचं काही आवडतं अशातला भाग नाही. पण "फुकट" असं ऐकल्यावर आपल्याला बरं वाटतं, असं आम्ही म्हणालो की ते "श्श्शीईईई" असं करून फणकारतं. खरंतर, आमच्या सारखं रत्न तिच्या नशिबात हुंड्याचा एक पैसा ही ख्रर्च न करता, फुकट पडलं आहे. पण किंमत नाही.

फुकट गोष्टींची किंमत मुळी नसतेच, तसंच त्या बिचार्‍या शब्दाचं झालं आहे. मग ऊर्ध्वश्रेणीकरण सारखे प्रतिस्पर्धी भाव खाऊन जातात. वास्तविक तुमच्या संगणकातील हार्डवेअरच्या प्रोसेसर आणि रॅम चं ऊर्ध्वश्रेणीकरण कोणी तरी फुकट करून देतंय अशी कल्पना करा, आणि मग सांगा, आहे की नाही हा शब्द आनंददायी?

गजनी संबंधी

आमीर खान चा गजनी चित्रपट येऊ घातला आहे आणि मेमेन्टो" शी त्याचा काहीतरी संबंध आहे असं ऐकिवात होतं. हे "गजनी" नक्की काय आहे ते आम्हाला कळेना. एक तर आमचे भाषा विषय कच्चे ( मग पक्के कोणते? असा गहन प्रश्न विचारू नका) त्यामुळे हा नक्की कोणत्या भाषेतला शब्द ते आम्हाला कळेना. बरं तो ईंग्रजी तून वाचल्याने त्याचं ऊच्चारण कसं करावं ही एक पंचाईत. गजनी, घजनी, घजिनी, गजिनी? समजेना. बरं जे काय असेल ते नक्की काय आहे, त्याच अर्थ काय हे कळेना.

टी व्ही वर कुठे तरी दाखवलं असेल. एवढा मोठा राष्ट्रीय अभिरूचीशी संबंध असणारा विषय टाळण्याइतकी आपली प्रसारमाध्यमं नक्कीच नाठाळ नाहीत. पण आम्ही सदानकदा "तोडू बातम्या" दाखविणारी च्यानेल्स बघण्यात मश्गूल असतो. त्यावर अधून-मधून ऊघडाबंब आमीर खान दिसला. पण आम्ही त्याच्या टरारून फुगलेल्या अंगावरचं गोंदवलेलं वाचण्यातच वेळ घालवला. (इतकं करून ते शेवटी वाचता आलं नाहीच) त्यामुळे बातमी आम्ही कधी ऐकलीच नाही.

शेवटी आज विकीपिडीया वरून कळलं की "गजनी" हे ह्या चित्रपटातल्या गुंडाचं नाव आहे. विकीपिडीया जिंदाबाद ! आम्हला एक कोडं सुट्ल्याचं समाधान मिळालं. त्यातल्या आमीर खान च्या बॉडीला, एट पॅक ऍब्स म्हणतात म्हणे. आम्ही परवाच एका साईट वरून "हाऊ टू गेट सिक्स पॅक ऍब्स" असं पुस्त्तक डाऊनलोड केलं. आमचं हे असंच असतं, वरातीमागून घोडं. आता राहणार की नाही आमचे ऍब्स जगाच्या दोन पॅक्स मागे? चालायचंच.

नेहेमी प्रमाणे वेळ होताच, आणि सुदैवाने नेट चालू होतं म्हणून आम्ही आमची जिज्ञासा जागृत केली आणि अजून शोध घेतला. त्यात आमी खान ला नाभिक-गिरी ची हौस असल्याचं कळलं. वा! आपल्याला हे जाम आवडलं. नेहेमीप्रमाणे त्याला किरण ताईंचा फोन गेला होता की "आमीर, कुठे हजामती करतो आहेस?". But she was literal and not at all metaphorical this time.

मंदीत फुकटचे खर्च नको म्हणून आम्ही केस वाढवित आहोत, मात्र आमीर खान च्या हस्ते क्षौर आणि श्मश्रू होणार असेल तर आम्ही गजनी कट करून घ्यायला तयार आहोत.तुमच्या कडे आमीर चा फोन नं आहे का? असल्यास जरूर कळवा. पाणी, वाटी, वस्तरा, साबण हे आम्ही भागीदारी तत्त्वावर पुरवू.

१. ऊच्चारण असा नवीन शब्द सा-रे-ग-म-प आणि पल्लवी जोशी ताई ह्यांच्या कृपाप्रसादाने आम्हाला कळला. आम्हाला ऊच्चार आणि ऊच्चाटन हे माहिती होतं, पण सांगितलं ना, भाषा विषय कच्चे.

Thursday, December 25, 2008

आवाहन - विकीपीडीयाला मदत करा

विकीपीडीया, आंतरजालावरील एक महत्त्वाचं संकेतस्थळ! त्याचा एक अविभाज्य घटक बनलेलं. त्यांनी वाचकांना आवाहन केलं आहे आर्थिक मदतीसाठी.

विकीपीडीया, ही नुसतीच एक वेब-साईट नाहीये, ती एक चळवळच आहे. आंतरजालाची ताकद काय आहे हे दाखवणारं ते सर्वोत्तम उदाहरण आहे. आपण सर्वजण त्याचा दैनंदिन वापर करतो. आपल्या सारख्या अनेकांनी दिलेल्या योगदानातून फोफावलेला हा ज्ञान-वॄक्ष आहे. आपण त्याची फळं खात आलो आहोत. आपण विकीपीडीया चं देणं लागतो.

दुर्दैवाने आज आपल्या विकीपीडीयाला टिकण्यासाठी आणि वाढण्यासाठी आर्थिक अडचणी येत आहेत. आपल्या मदी साठी विकीपीडीया ने आवाहन केलं आहे. आपण त्यांना मदत करावी आणि हे आवाहन आपल्या माहितीतील शक्य तेवढ्या लोकांपर्यत पोहोचवावं ही विनंती.

Tuesday, December 23, 2008

खाडिलकरान्चा बंडू

काय बरं त्याचं नाव? हां, त्यागराज, त्यागराज. आम्ही लहानपणापासून त्याला अधून मधून बघत आणि ऐकत आलोय. तो भविष्यात दिवे लावणार हे आमच्या बाल-मनाने त्याच सांगितीक पदार्पण पाहतानाच जोखलं होतं *
तेव्हा आम्ही शाळेत होतो.

स्मरण यात्रा ह्या कार्यक्रमातून बंडू च पहिलं दर्शन झालं. मुकुंद फणसळ्कर, मृदुला दाढे हे गायक पण ह्याच कार्यक्रमात भेटले.** पण बंडू ख़ास लक्षात राहिला. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात तो फारच चुळ्बूळ करत होता. कानात बोटं घाल, नाकच खाजव, मांडी हलवत बस असं काही ना काहीतरी तो सतत करत होता. थोडक्यातच स्वस्थ रहाणं
हां आपला स्वभाव नाही हे तो दाखवून देत होता. आमच्या कुशाग्र + बुद्धीने तेव्हाच ओळखल की बंडू सतत दिवे लावत राहणार.

त्या नंतर तो कायम ह्या ना त्या कार्यक्रमातून दर्शन द्यायचा. एका मोठ्या पार्श्व-गायकाला मराठी जनता कशी मूकली आहे हे दाखवायाचा तो परोपरीने प्रयत्न करायचा. दुर्दैवाने अस फक्त त्यालाच वाटत होतं. त्याच्यातली कला जोखण्याची ताकद कोणात नाही अशी त्याची एकंदर देहबोली असायची. मग तो संगीत द्यायला लागला. (सांगा पाहू त्यांने संगीत दिलेलं एकतरी गाणं. आहे की नाही अवघड! मग? ते साधं काम नाहीच आहे मुळी) त्याने संगीत दिलेलं गाणं गायल्यामुळे त्याची बहीण अमृता सा-रे-ग-म जिंकता जिंकता राहिली. पण म्हणून बंडू ने काही हार मानली नाही. कलाकाराने स्वत:ला मोठ समजू नये हे त्याने अगदी शब्दश: घेतलं. तो अजूनच लहान लहान असल्यासारखं करायला लागला.

पण परवा झी मराठी ने आयोजीत केलेल्या कार्यक्रमात त्याला पाहिलं, आणि त्याच्या प्रयत्नांना यश अल्याचं पाहून बरं वाटलं. त्याला फायनली दिशा सापडली आहे.

आम्ही लहान असताना, ऑर्केस्ट्रा मध्ये एक मिमिक्री आइटम असायचा. गाण्यांच्या मधे प्रेक्षकांची हसवून करमणूक करणारे हे आर्टिस्ट दादा कोंडके, श्रीराम लागू आदींच्या नकला वगैरे करायचे. बंडू ने ह्या कलेला पुनर्जीवन दिल आहे. तूम्ही हा कार्यक्रम पुन:प्रक्षेपित झाला तर चुकवू नका. बन्डूच रूपड, त्याचा वेष, त्याचा नाच, गाण्यात मुळीच अपेक्षित नसलेल्या आलापी सगळच हास्यास्पद! मिमिक्री ची गरजच काय हा प्रश्न कोणी विचारला नव्हता आणि त्याला गाण्याचाच पर्याय देणार्या बन्डूच कौतुक किती करावं?

बंडू, तूला दिशा सापडली आहे. तू असाच आम्हाला हसवत रहा. माकड-चेष्टा कर, उडया मार, नाही त्या ताना घे तूला ते शोभतं लेका. गायला काय खूप जण आहेत.

* आत्म-स्तुति करू नये, पण काय ही दूर-दृष्टी !
** तुम्हाला आठवत असेल तर सुधीर गाडगीळ आणि शैला मुकुंद ह्यांनी निवेदन केल होतं। त्या काळी मराठी गाण्यांच्या कार्यक्रमांच निवेदन मराठीत करायची प्रथा होती.
+ कुश - गवत, अग्र - टोक : कुशाग्र बुद्धि - गवताच्या टोकावर मावेल एवढी

Monday, December 22, 2008

सामंतांची वैशाली

झी मराठी च्या सौजन्याने वैशाली सामंत (लावणी ला आग लावणारी, तीच ती)* हिचं गाणं ऐकण्याचा नुकताच योग आला. अजय-अतुल ह्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमात आणि पोलिसान्साठी आयोजीत केलेल्या कार्यक्रमात ती "कोम्बडी पळाली" गायली**. ते ऐकताना तो योग नसून भोग आहेत हे लक्षात आल.

स्वत: चं लाईव्ह गाणं इतकं वाईट होत असतानाही ज्या अधिकारवाणीने वैशाली सा-रे-ग-म-प च्या स्पर्धकांना सूचना करत असते ते पाहून तीच्या धैर्याचं आम्हाला कौतुक वाटतं. आता खरच सगळे स्वत:हून म्हणायला लागतील की "ऐ वैशाली ताई, आमच्या 10% तरी सूर लावता येतो का तूला? मग का उगाच परीक्षकाच्या खुर्चीत ठेव्हलय म्हणून नाटकं करतेस? दे "नी" नाहीतर तूला गायला लावेन". आणि हे ऐकल्यावर वैशाली काय करेल माहित नाही पण मान्यवर तरी नी देऊन मोकळे होतील, वैशालीचं गाणं कोण ऐकणार?

* लावणी ऑन फायर हा वैशाली चा पहिला अल्बम, ज्यात तिने रेशमांच्या रेघांनी ला धुरी दिली
** वास्तविक गायली असं लिहिताना माझ्या हातांना आणि बुद्धीला खूप त्रास होतो आहे. तसं ही गाणं हे "गायल" जातं, हे सा-रे--- फेम पल्लवी जोशी आणि इतर ह्यांच्या मराठीत बसत नाही. "लास्ट टाइम ला" (हे पल्लवी मराठी आहे.) मी कार्यक्रम पाहत होतो तेव्हा सगळे खूप छान गाणं म्हणत होते.

Monday, December 8, 2008

अभ्यासाचं तंत्र

आज पेपर मध्ये एक जाहिरात पाहिली.

भूपेश दवे ह्यांची प्रभावी अभ्यासाची गुरुकिल्ली
जरा वेळ होता (तो नेहेमीच असतो, पेपर वचण्याशिवाय इतर उद्योग काय? इति बायको) म्हणून डिटेल मध्ये पाहिली तर त्यात लिहिलं होतं
  • रूट चार्ट
  • स्पेल्स च्यान्ट
  • च्यालेन्ज स्मरणशक्ती - मोठी उत्तरे लक्षात ठेवण्यासाठी
  • प्री-एक्झाम स्मरणशक्ती
  • प्रभावी वाचन
अगं बाबो ! बरं झालं आम्ही काही वर्षांपूर्वी जन्माला आलो नाहीतर ह्या पैकी काहीही येत नसताना कसे काय शिकलो असतो देव जाणे M.Tech वगरे होणं तर सोडूनच द्या.

थोडक्यात काय तर उत्तर देता येणं हे अपेक्षितच नाहिये, उत्तर हे लक्षात ठेवून जसं च्या तसं उतरवता येणं हे महत्त्वाचं आहे.

आमच्या वेळी आम्हाला परीक्षा कधी संपणार हे लक्षात असायचं. आजकालच्या मुलांना काय काय लक्षात ठेवावं लागत असेल? छोटे प्रश्न, छोटी उत्तरं, मोठे प्रश्न, मोठी उत्तरं, मग कोणती उत्तरं कोणत्या प्रश्नांची आहेत हे म्यापिंग लक्षात ठेवायचं म्हणजे कठिणच आहे. कशी देवादूतान्सारखी आहेत ही दवे आणि इतर माणसं.

Sunday, December 7, 2008

माहिती तंत्रज्ञानातील नवीन संधी - क्याचिंग!

इन्डिक-थ्रेड्स ही कॉन्फ़रन्स नुकतीच पुण्यात पार पडली. पुणेटेक ह्या ब्लॉग ने त्याचा एक छान परामर्श घेतला. अर्थातच पुण्यात घडणारी ही ईव्हेन्ट सकाळ ने कव्हर केली. की-नोट ऍड्रेस मध्ये आनंद ने सांगितलं की मल्टी कोअर चिप्स आणि क्यॅशिंग ह्या कडे प्रोग्रॅमर्स नी लक्ष द्यावं. सकाळ ने हे "क्यॅचिंग" असं छापलं। ते वाचताना आमची पार च चिडचिड झाली। म्हणजे तो शब्द अगदी डोक्यातच गेला. क्यॅचिंग?? अरे दया करा रे! तुम्हाला ह्याचे दूरगामी परिणाम लक्षात नाही का येत?

  • तुम्ही असं काहीतरी लिहीणार.
  • माहिती तंत्रज्ञानाने भारावलेल्या ह्या पुण्य-नगरीतले जबाबदार(!) पालक ते वाचणार.
  • कुठलीही पोच आणि कशाचही फ़ारसं ज्ञान नसलेले एका चहाच्या बदल्यात ऊगाचच सल्ले देणारे, सल्लापटू ते वाचणार.
  • ते ऑपरेटींग सिस्टीम्स, C, C++ वगैरे सगळं जुनं झालं असं ते सांगत फ़िरणार, पुराव्यासाठॊ तुमच्या बातमीचा दाखला देणार.
  • पालक ही क्याचिंग, क्याचिंग करत क्लासेस शॊधत फ़िरणार.
आणि मग ह्या नंतर पुन्हा जुन्या फ़ॅड प्रमाणे जर का पालकांनी त्यांच्या मुलांना "नेहरू स्टेडिअम" ला पाठवायला
सुरूवात केली तर त्याला जबाबदार कोण?

Wednesday, December 3, 2008

आम्ही सारे खवय्ये

आपल्या "खवय्येगिरी" ने नावलौकिकास पोचलेल्या आमदारांनी बहुदा प्रशांत दामले (एक लग्नाची गोष्ट मधला घोड़-नवरा) चा "आम्ही सारे खवय्ये" पाहिला आणि त्यांना लक्षात आलं की आपल्या पेक्षा ही जास्त खाणारी माणसं राज्यात आहेत. हे काही बरोबर नाही, असं सर्वांच मत झालं. शेवटी खवय्येगिरी कुठल्याही प्रकारची का असेना, मक्तेदारी आपलीच असायला हवी असा सगळ्याच पक्षांचा आग्रह झाला त्यामुळेच यंदाच्या हिवाळी अधिवेशानासाठी केलेली ही उपाय योजना पाहा (सोर्स - eSakaL - विदर्भ)

चोखन्दळ वाचकांच्या नजरेतून हे सुटल नसेलच, पण तरीही विशेष ध्यानात घेण्यासारखे काही मुद्दे नमूद करत आहोत

एका क्षणात साठ पोळ्यान्ची चळत ! क्या बात है. आमची नम्र सूचना आहे की ह्या उपहारगृहाला "द्रौपदीची थाळी" असं
नाव द्यावं
सार्वजनिक बांधकाम विभाग अल्पोपहाराची सोय ही करतं हे तुम्हाला माहित होतं का?
पालेभाज्या आणि दही १० दिवस राहणार म्हणजे आमदारांना किमान १० दिवसांची जूनी भाजी किंवा कोशिंबीर मिळणार
टोस्टर मधे ओम्लेट होतं हे तुम्ही ऐकलं होतं का?
चपात्या बनवण्यासाठी आता कणीक करायची गरज नाही? का कणीक हाताने करायची गरज नाही?
रोटी तव्यावर डोसे आणि उत्तप्पे ही -- खा लेको खा!
स्वयंपाक करण्यासाठी मसाला ही सगळ्यात मोठी बाब? आम्हाला वाटलं होतं की भाज्या, धान्य वगैरे असायला हवं, मसाला महत्वाचा तो चित्रपट आणि न्यूज़ साठी.
आणि एकदम १० किलो मसाला? अरे किती मसालेदार खाल? घशाशी येइल ना!

बहुदा कोणीतरी हे उपहारगृह सुरु करण्याआधी आमदार किती खातात असा प्रश्न बाहेर खूप जणांना विचारला असेल, आणि "बकासूरासारखे" असं उत्तर त्यांना मिळाल असेल. सन्दर्भ लक्षात न आल्याने घोळ झाला असेल.

काही असो, खा प्या गुट्गुटित व्हा.

तुम्हाला मराठी शिव्या येतात का?

येत नसतील तर पाठ करा कारण तसं असेल तरच तुम्ही पक्के मराठी आहात असं सिद्ध होतं. वानगीदाखल हे वाचा.

इंग्रजी वृत्तपत्राचा एक वार्ताहर मुंबईत घर नसल्यामुळे आमदार निवासात एका आमदाराच्या खोलीत राहतो. गोरापान, उंचापुरा असलेल्या हा पत्रकार सिक्‍स पॉकेट्‌स जीन्स आणि पाठीवर सॅक अशा वेशात रविवारी रात्री नेहमीप्रमाणे साडेअकराच्या सुमारास ऑफिसवरून आमदार निवासात प्रवेश करीत होता. त्याची देहयष्टी आणि कपड्यांकडे पाहून सुरक्षारक्षकांना संशय आला. तळमजल्यावरच त्यांनी त्याला हटकले. कुठे चाललात, काय काम आहे, अशा प्रश्‍नांची सरबत्ती केली.

त्यावर त्याने आपण पत्रकार असल्याचे सांगून ओळखपत्र दाखविले। त्यावरही सुरक्षारक्षकांचे समाधान झाले नाही. त्यांनी त्याला मराठी बोलता येते काय, तुझे गाव कुठे आहे, असे विचारले. त्याने मराठीत उत्तर देत गावाचे नाव सांगितले. सुरक्षारक्षकांना त्याचे ग्रामीण ढंगातील मराठी बोलणे थोडे खटकले. त्यांनी त्याला मराठीत शिव्या देता येतात काय, असा सवाल केला. त्याने मराठीतील एक सौम्य शिवी म्हणून दाखविली. तरीही सुरक्षारक्षकांचा संशय काही संपेना. त्यांनी त्याला एखादी कचकचीत मराठी शिवी म्हणून दाखव, असे सांगितले. त्याने तशी कचकचीत शिवी हाणली तेव्हा कुठे सुरक्षारक्षकांचा संशय संपला. त्यांनी मोठ्याने व्वा! अशी त्याच्या पाठीवर थाप मारत खरा मराठी आहेस म्हणत सध्याच्या धामधुमीच्या काळात सुरक्षेचा प्रश्‍न आहे. आमच्या डोक्‍यावरही वरिष्ठांची टांगती तलवार आहे. त्यामुळे हे सर्व करावे लागते बाबा, म्हणत अखेर त्याला प्रवेश दिला.


Tuesday, December 2, 2008

त्वरा करा - कमी पैशात फ्रीझ मिळवण्याची सुसंधी

तुम्हाला फ्रीझ हवा आहे काय? आणि तो ही कमी पैशात? मग हयासारखी संधी तुम्हाला परत मिळणार नाही. तुम्हाला पैदा करावा लागेल एक "काम चलावु" कंप्यूटर. आणि सेकंड किंवा थर्ड हैण्ड कंप्यूटर दोन हजार पेक्षा ही कमी किम्मती मध्ये मिळतो

ही बातमी वाचा तूम्ही फक्त तुमच्या ह्या कंप्यूटर वरुन एक ईमेल डाउनलोड करून वाचायची आहे, मग तुमच्या कंप्यूटर चा होणार आहे फ्रीझ. आहे की नाही कमाल?

फ्रीझ मिळाला की आइस-क्रीम पार्टी कराल तेव्हा मनातल्या मनात माझे आभार मानायला विसरू नका
source http://www।esakal.com/esakal/12032008/SpecialnewsBE52E56E19.htm

मराठीकरण असावं तर असं

आज पेपर मध्ये नवीन वायरस बद्दल सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
सोर्स http://www.esakal.com/esakal/12032008/SpecialnewsBE52E56E19.htm
ज्यांनी ही बातमी फक्त नेट वर वाचली असेल त्यांनी हार्ड-कॉपी घेउन वाचावी कारण मूळ बातमीतील मराठीकरण उल्लेखनीय आहे

त्यात असं सांगितले आहे की - अजून ह्या वायरस वर "उतारा" उपलब्ध नाही. त्याची "लस" मिळत नाही. वायरस एक्टिवेट झाल्यानंतर सुरु होणार्या "दुष्ट-चक्रा" च त्यात वर्णन दिलं आहे.

एकंदरीतच बातमी वाचून ह्या ब्लॉग चे असंख्य (म्हणजे एक) मराठी वाचक एकदम दिलसे आणि मनसे खूष होतील

उद्या कंपनीला नावाच्या बोर्ड प्रमाणेच सगळा कारभार मराठीत करण्यासंबंधी कायदा निघाला तर "मक्काफी" सारख्या कंपनी मधले हुद्दे खालीलप्रमाणे असतील

चढत्या क्रमाने
  • हकीम
  • वैदू
  • रामदेव
  • वैद्यबुवा
  • पतंजली
  • चरकाचार्य
  • सुश्रुताचार्य
  • धन्वन्तरी
एखादा विशेष द्न्यान नसूनही तसा आव आणून बाता मारणारा कर्मचारी असेल तर त्याला बाताम्बे असं संबोधण्यात येइल

हसा हसा हसा हसा

आजकाल प्रेक्षकांना हसवून त्यांची करमणूक करायच्या प्रयत्नात असलेल्या कार्यक्रमांना उधाण आलं आहे. कोलगेट हास्य-सम्राट च उदाहरण घ्या. त्यातले विनोद (?) ऐकून तूम्ही हसला असाल तर तुमच्या विनोद-बुद्धीला आमचा सलाम!

आम्ही (म्हणजे मीच, आम्हाला कोणी मान देत नही त्यामुले आम्हीच आम्हाला आम्ही म्हणतो, असो) असले कार्यक्रम बघण्याच्या फंदात पडत नाही. आम्ही फक्त न्यूज़ वाचतो आणि पाहतो. त्यात आमची इतकी करमणूक होते की आमच्या गडाबडा लोळण्याला नवज्योत सिद्धू ही घाबरेल.

आता उदाहरणार्थ ही शेजारी दिलेली बातमी पहा

सोर्स - http://www.esakal.com/esakal/12032008/PuneDEDFD81B04.htm
तूम्ही पुणेकर असाल तर एव्हाना तुमचं पोट दूखू लागलं असेल ज्या देशात इतक्या करमणूक प्रधान गोष्टी जवळ्पास रोज घडत असतील तिथे लोकांना आनंदी न रहाण कसं जमेल राव?

अफ़वांच पीक आणि आईडिया सा रे ग म प

अफवा विकून पैसे मिळत असते तर ह्या देशात शेतकर्यांना आत्महत्या करायची वेळ आली नसती. अफवांच पीक फोफवायला ना हंगाम लागत, ना विशिष्ट माती, ना बियाण, ना खत आणि ना कर्ज. लागतो तो बस थोड़ा वेळ, खूप मोठी लोकसंख्या आणि प्रत्येक गोष्ट शहानिशा करुन न घेता दुसरयाला सांगायची घाई. एकंदरीत च दंत कथा ha आपल्या संस्कृतीच एक अविभाज्य भाग आहे त्यामुळे माहितीचा सोर्स देण्याची पद्धत आपल्याकडे अस्तित्वात नाही.

ही प्रस्तावना अशासाठी, की अत्ता एक अशीच ऐकीव बातमी मी इथे पोस्ट करत आहे आणि सोर्स अर्थातच माहीत नाही.

तुम्ही "आईडिया सा रे गा म प" बघता का? हां एक कार्यक्रम मी आवर्जून पाहतो. तर बातमी अशी आहे की
  • आज त्यांचा comeback एपिसोड आहे आणि त्यात केतकी माटेगावकर जिंकणार आहे
  • Finals तीच जिंकणार आहे
  • ती ह्या आधी एलिमिनेट झाली कारण कार्यक्रमाची स्क्रिप्ट तशीच लिहिली गेली आहे
माझं मत
  • मला हे पटत नाही. ही अफवा आहे
  • आत्ता पर्यंत एक दोन निर्णय सोडल्यास परीक्षकांनी दिलेला निकाल हा स्पर्धकांच्या कामगिरीला अनुसरून असाच होता
  • केतकी माटेगावकर ला जिन्कवल तर ते फारच डोळ्यावर येइल, इतकं manipulation कोणी करणार नाही
  • स्पर्धा कोण जिंकतय हयात झी मराठी ला किंवा कोणत्याच च्यांनेल ला विशेष इंटरेस्ट नसेल (जोपर्यंत त्यावरून खूप बेटिंग होत नाही)
बघूया काय होतय ते

Monday, December 1, 2008

A fresh start

एक नवी सुरुवात
तो: का?
मी: कल्पना नाही - वाटतय म्हणून

तो: ह्या आधी प्रयत्न केला होता का?
मी: हो http://kharadpatti.blogspot.com

तो: लोक वाचत होते का?
मी: हो

तो: blog लिहायचं थाम्बवल्यावर कोणी विचारलं का, का लिहित नाहीस?
मी: नाही

तो: ह्याचा अर्थ, लोक वाचत असतील असा म्हणायला काही विशेष कारण नाही. लोकांनी वाचावा म्हणून लिहित होतास का?
मी: नाही खरंतर.

तो: मग blog लिहायचं काय कारण? वहीत ही लिहिता येतं की
मी: काही गोष्टी लोकांनी वाचाव्यात आणि त्यांची मतं समजावीत म्हणून.

तो: लोकांच्या मतान्ना तू किम्मत देतोस का?
मी: हो, कोणाचं मत आहे त्यावर अवलंबून आहे.

तो: काय मत आहे त्यावर अवलंबून असाव असं वाटत नाही का?
मी: जगात काय म्हणलय ह्या पेक्षा कोणी म्हणलय ह्याला जास्त महत्व आहे.

तो: तसं असेल तर ह्या blog ला शून्य किम्मत आहे.
मी: मान्य, पण अनेक मूल्यहीन गोष्टी मी करत असतो, ही अजून एक.

तो: किती उपक्रम तू चालू केलेस आणि सोडून दिलेस?
मी: अनेक.

तो: हा त्यातलाच एक असेल ह्याची शक्यता?
मी: खूप जास्त.

तो: जून्या blog वर च परत सुरूवात का नाही करत?
मी: ते ही एकदा करून झालं

तो: मग काय वेळ जात नाही का?
मी: तसं नाही पण तरीही - कंड.

तो: लोकांकडे फुकट वेळ आहे का की त्यांनी तूझा ब्लॉग वाचून प्रतीक्रिया द्याव्यात?
मी: असेल ही, ते सर्वस्वी त्यांनी ठरवाव.

तो: एकंदर तूझ्या सवयी आणि विचार पाहता तू एक disclaimer टाकावास गडया
मी: अरे ऐ, गडी असेल तूझा ###. बास कर तूझे प्रश्न, तूझ्या नादी लागायचं नाही मला, पण disclaimer चा सल्ला चांगला आहे.

Disclaimer: The opinions expressed in this blogs are of the author and not of the organizations that he belogs to or works for. However, some opinions may not be the true opinions of the author. In fact some opinions though they sound like opinions may not be opinions at all. But some may be opinions that do not sound like opinions. Getting the point, right?

वैधानिक इशारा: ह्या ब्लॉग वर व्यक्त होणारी मतं लेखकाची असून त्यांचा इतर कोणत्याही संस्थेशी अथवा संघटनेशी काहीही संबंध नाही. काही मतं ही लेखकाची खरी मतं असतीलच अशी खात्री नाही. काही मतं मतान्सारखी वाटली तरी मतं असतीलच अस नाही. काही मतं असूनही मतान्सारखी वाटणार नाहीत. लक्षात येतय ना?