Showing posts with label खोचक. Show all posts
Showing posts with label खोचक. Show all posts

Saturday, January 10, 2009

बातम्यांचे जन्म आणि त्यासंबंधीचे विषयांतर

विषयांतर हे "संबंधीचे" कसे असेल? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तो सोडवा, आज रविवार आहे, तुम्हाला नेहेमीपेक्षा जास्त रिकामा वेळ असणे अपेक्षित आहे. आणि रिकामटेकडे नसूनही हा ब्लॉग वाचत असाल तर आम्ही आणि आमचा मोत्या तुम्हाला हसतो आहोत. असो. आज आमचा घसा बसला आहे. त्यामुळे जीभेवरच्या सरस्वतीला आराम देऊन बोटांमधल्या गणेशाला आम्ही कामाला लावतो आहोत. (आजच्या आत्मप्रौढीत ऊद्याच्या लोकप्रियतेची बीजे असतात हे सिनेसृष्टीकडून मिळालेले बाळकडू पिऊन आमचा शम्मी कपूर झाला आहे. असो.) बोलण्याचा डेफिसिट लिहीण्यातून भरुन काढताना मूळ मुद्द्यापासून भरकटणे क्रमप्राप्त आहे. (ऊदाहरणार्थ-पुढची काही वाक्ये) खरंतर मुद्देसूद वाक्ताडन हे आमच्या साठ्यामधले एक जालीम शस्त्र आहे, पण ते आम्ही ब्रम्हास्त्रासारखं जपून वापरतो. अगदी ब्रम्हास्त्र नाही तरी सुदर्शन तर नक्कीच. पण ते सोडू म्ह्टलं तर टारगेटेड दुर्वास पळणार कुठे? ट्रॅफिक किती वाढलाय !

मोत्या कंटाळून निघून गेला वाटतं. तसाही तो थांबला नसताच. "दिलखुलास" ची वेळ झालीय. प्रत्येक सडेतोड ऊत्तरावर तो भुंकून दाद देतो. ह्या वेळेत तो सगळ्यात कमी भुंकतो म्हणून आमचे शेजारी तेव्हा रविवारचं झोपून घेतात. असो.

तर मुकुलायन च्या असंख्य वाचकांनो (सहावी "क" म्हणजे त्रिखंड काय रे मोर्‍या?), तुम्ही अजून जागे असाल तर आज तुम्हाला ही पत्रकार मंडळी बातमी कशी जन्माला घालतात ह्याचा एक किस्सा सांगणार आहे. मात्र लवकर सांगा अशी घाई करायची नाही बरं का. तर ह्या पत्रकारमंडळीं पैकी काही खूप हुशार असतात बरं का. (खूप हुशार म्हणजे ऊरलेल्यांशी तुलना करू गेल्यास. सापेक्षतावादाने का प्रवादाने.) ती असं काही लिहीतात की वाचणार्‍या तुम्हाआम्हाला काहीतरी वेगळंच वाटतं.

झालं असं की आमचा एक लग्न न झालेला, जाड चष्मेवाला, साधासुदा-सदा असा मित्र आहे. आमचे सगळे मित्र असेच अळणी - आमच्यासारखे. आता हेच पहा, आम्हाला कित्येक दिवस तो डान्स बार कसा असतो तो ह्याचि देहि डोळा पाहण्याची ईच्छा होती. आबांना काही लोकांचं बरं बघवलं नाही. त्यांनी बंदी आणण्याआधी आम्ही खूप प्रयत्न केले की कोणी मित्र ते दाखवेल का आम्हाला. पण जाऊन आलेला एकजण माहीत नाही हो. नाही त्या गोष्टी दाखवायला सगळे ऊत्सुक. म्हणजे एकाने आम्हाला "पारी" चे रोबोटीक आर्म्स कसे चालतात ते दाखवले. एकाने आम्हाला आय.आय.टी. मधला तो नाच्या "नटराज" रोबो दाखवला. आता यांत्रिक हात-पाय आणि त्यांच्या हालचाली बघायलाच फक्त आमचा जन्म का? तर ह्याचं ऊत्तर हो. हेच ईन्कम टॅक्स ऑफीस, सिनेसृष्टी, मिडीया, पोलीस, आर्.टी.ओ., सचिवालय ईथे कुठे काम करणारा कोणी मित्र असता तर अगदी तरन्नुम नाही पण कोणीतरी मानवी स्त्रीरूप हातपाय हलवताना आम्ही पाहिलं असतं की नाही? सोडा.

सांगायचा मुद्दा की हा आमचा अगदीच साधा मित्र आम्हाला म्हणाला की "पतंगराव कदम कुस्ती खेळतात तुला माहितीय का?". मी म्हणालो की "अरे त्यात नवीन काय? राजकारण आहे बाबा ते. आणि हे असं कारण नसताना ऊपमा अलंकारात बोलायला आपण काय कुठल्या च्यॅनल च्या ऍवॉर्ड फंक्शन चे होस्ट का अँकर का काय ते आहोत का?". तो म्हणाला "नाही रे खरीखुरी कुस्ती. हे वाच" त्याने ई-सकाळ१० पुढे केला. त्यात खरंच लिहिलं होतं हो, की "पतंगराव कदमांनी कुस्तीचा आनंद लुटला". आम्ही त्याला समजावलं की "अरे वेड्या, म्हणजे त्यांनी कुस्ती बघण्याचा आनंद लुटला असं म्हणायचं आहे". मग ते तसं का नाही लिहिलं हा त्याचा प्रश्न आलाच. त्यानंतर आम्ही त्याला जे सांगितलं तेच आता आम्ही तुम्हाला संक्षिप्त रूपाने येथे सांगत आहोत, सत्यनारायणाच्या पूजेतल्या गोष्टीसारखं.

दोन प्रकारचे पत्रकार असतात. एक आपण जे लिहितो आहोत त्याचा (मराठी) भाषेतला अर्थ काय होईल ह्याची कल्पना आणि अक्कल नसणारे. दुसरे, आपण जे लिहितो आहोत ह्याचा अपेक्षित नसलेला अर्थ काय होईल ह्याची पूर्ण जाणीव असताना, मुद्दाम नवीन बातमी जन्माला घालणारे. सांख्यिकीचा (स्टॅटिस्टिक्स) विचार करता, ही बातमी देणारी व्यक्ती पहिल्या प्रकारची असण्याची शक्यता खूपच जास्त आहे. मात्र दुसर्‍या प्रकारच्या व्यक्तींचं कौतुक केल्याशिवाय रहावत नाही. ह्याच पार्श्वभूमीवर आता मि. क्ष ने मि. य ला सांगितलेला एक किस्सा मी तुला सांगतो तो तू नीट ऐकावास.

एकदा एका लहानशा शहरास एका धर्मगुरूने भेट देण्याचे ठरवले. अपेक्षेप्रमाणे आगमनाच्या वेळी विमानतळावर पत्रकारांची गर्दी जमली. धर्मगुरू विमानातून ऊतरता ऊतरता एका चतुर पत्रकाराने पहिला प्रश्न विचारला "आमच्या शहरातील वेश्यांच्या समस्येबद्दल तुमचं काय मत आहे?" धर्मगुरूंनी आश्चर्याने विचारले "तुमच्या शहरात वेश्या आहेत?" लागलीच पेपर मध्ये बातमी छापून आली, "विमानातून ऊतरल्या ऊतरल्या, धर्मगुरूंचा पहिला प्रश्न, तुमच्या शहरात वेश्या आहेत का?"

तर वाचकहो तुम्ही योग्य तो बोध घेतला असेल. बातमी जन्माला कशी घालावी हे तुम्ही आज शिकला असालच. ऊद्या पत्रकार झालात तर आम्हाला नक्की दुवा द्या.

१. आमच्या ज्ञानाच्या कक्षा कशा जयललितासारख्या विस्तृत आहेत पहा
२. रंगरूपावरून कोणाची अशी चेष्टा करणं आमच्या तत्त्वात बसत नाही. पण हे लिहिलं नसतं तर आमचं हे तत्त्व तुम्हाला सांगता आलं नसतं म्हणून केवळ.
३. खरंच ट्रॅफिक खूप वाढलाय.
४. प्रत्येक तळटीप ही वाचण्यायोग्य असतेच असं नाही. असो.
५. ह्या लेखात असो हा शब्द किती वेळा आला आहे मोजा पाहू. ६,७
६. नं ७ ही तळटीप नसून नं ५ ची शिखरटीप आहे.
८. वाचा - ऊदयाचल - माझी संपदकीय कारकीर्द, गोळाबेरीज, कोणतीही आवृत्ति. लेखक - पु.ल.देशपांडे.
९. आम्ही आमची लायकी ओळखून असतो. कुठे मुरलीधरन, कुठे आम्ही.
१०. हे संभाषण ई-मेल वर झालं आणि त्याने कालच्या ई-सकाळ ची लिंक फॉरवर्ड केली. ऊगाच ऑनलाईन पेपर पुढे कसा केला असे फालतू प्रश्न विचारू नका.

Friday, January 9, 2009

बापूजी (आत्रंग्यांचे), आमच्या रामू भैय्याला नोकरी मिळेल का?

प्रिय बापूजी, पत्रकारिता क्षेत्राबद्दलचं आमचं ज्ञान म्हणजे मल्लिकाच्या स्कर्टापेक्षा तोकडं. आम्हाला त्यातलं ओ का ठो माहित नाही. वर्तमानपत्रांची किंमत ही आम्ही त्यांना मिळणार्‍या रद्दीच्या भावातून करतो. ही आमची (का त्यांची?) लायकी. मात्र आम्ही तुमच्या बातमीदार आणि कळत-नकळत चे अगदी नियमित वाचन करतो. आम्ही लहान होतो तेव्हा रस्त्यात मारामारी दिसली की बघ्यांमधला आमचा नंबर पहिला. शाब्दिक फटकार्‍यांबद्दल आम्ही वय वाढलं तशी ही आवड वाढवून आहोत. त्यामुळे "एस-एम-एस" आला रे आला की वाचणार्‍यांमधले आम्ही पहिले. सांगायचा मुद्दा मात्र हा नाही.

तुमचे तेजाबफेकू (हे आम्ही कौतुकाने म्हणत आहोत) ब्लॉग वाचून, आम्हाला तुमचं ते पत्रकारिता क्षेत्र हे एकंदरीत एकदम मजेदार वाटू लागलं आहे. काही दिवसांपूर्वी "कळत-नकळत" मध्ये तुम्ही जॉब बद्दल जाहिरात दिली होती की "पाहिजेत मुंबई लोकमतला पत्रकार". ती वाचून आमच्या डोळ्यासमोर ताबडतोब आमच्या रामू भैय्याची मूरत ऊभी राहिली. (ऍक्च्युअली ती गादीवर बसली होती) त्यात लिहिलंय की "उपसंपादक/वार्ताहर पदासाठी किमान पदवीधर, दोन वर्षांचा आणि पाने लावण्याचा अनुभव या किमान अटी आहेत".

तुम्हाला सांगतो
आमचा रामू भैया रांचीचा बी.ए. आहे - म्हणजे पदवीधर वर टीक मार्क.
आम्ही गेले ८ वर्ष त्याच्या ठेल्यावर तोबरे भरून तोंडं लाल करायला जातो. - दोन वर्ष काय चौपट अनुभव - टीक मार्क.
आणि मुख्य म्हणजे पाने लावणे. ह्यात तर त्याचा हात कोणपण ध्ररू नाही जात. आम्ही सगळ्या गल्ल्या, रोड्स पालथ्या घातल्या, अगदी त्या कर्वे रोड्च्या ए.सी. शौकीन मध्ये पण गेलो. पण बनारसी, कलकत्ता, मघई, फुलचंद, पूना सादा काही पण सांगा. रामू भैय्या सारखा पाने लावणारा कोणी शोधून दाखवावा ! ह्यात तर एकदम मोठ्ठं टीक मार्क.

त्यात तुमच्या क्षेत्रात लागणारी बातम्या पुरवण्याची हौस? अहो, आम्ही एकदा का ठेल्यावर गेलो की आठवड्याची सगळी बित्तंबातमी आम्हाला मिळते. त्यात पुन्हा तीऐकली की तिची शहानिशा न करताच रामू पहिल्याछूट नंतर येणार्‍यांना ऐकवतो. हे तुमच्या बातमीदारांच्या किस्स्यांशी एकदम तंतोतंत जुळतं की नाही? त्यात भर म्हणजे त्याची पाने पुसण्याची कला. म्हणजे एकदम पानावर चेरीच झालं.

आमच्या रामूला रोज रोज तंबाकू चोळून कंटाळा आला आहे. हात काळेच करायचे तर शाईने करू असं म्हणाला होता एकदा. परवा सकाळच्या पान-सुपारी कार्यक्रमाला आपला ठेला असावा असं त्याला राहून राहून वाटत होतं. तुम्ही सांगा की त्याला ही नोकरी मिळेल का. संपादकांना रोज सुपारी कातरून ही देईल तो.

Friday, January 2, 2009

ऍक्टिंग कशाशी खातात?

परवा आमच्या एका जिवलग मित्रामुळे आम्हाला सिनेतारकांनी खचखचलेली एक पार्टी अटेंड करण्याचा योग आला. (ज्या मित्रांमुळे असे योग येतात ते सगळे जिवलग) तिथे अनेक ओळखीचे चेहेरे भेटले. आम्ही संधीचा फायदा साधून एक प्रश्न काही जणांना विचारला. ऍक्टिंग कशाशी खातात? हा तो प्रश्न. आम्हाला मिळालेली रंजक ऊत्तरं खाली देत आहोत.

शाहरूख : वेल, मी शूटींग मध्ये बिझी असल्याने माझं खाणं, पिणं, रूटीन सगळं काही ग्वॉरी च बघते. खाण्याचं तिलाच विचारा. (ह्यानंतर तोतरं हसून तो निघून गेला)

सलमान खान : ते त्यात किती कॅलरीज आहेत त्यावर अवलंबून आहे.

ह्रितीक रोशन : माझं फिटनेस रूटीन मी सल्लूच्या सल्ल्याने ठरवतो. त्याचं ऊत्तर तेच माझं.

ऍश्वर्या : खरंतर ह्या प्रश्नाचं ऊत्तर अमितजींच्या सहवासात राहिल्याने मिळेल म्हणून मी इकडच्या स्वारीशी लग्न केलं. पण अजून काही ऊत्तर सापडलेलं नाहीये. आणि त्यात तुम्ही मराठीत प्रश्न विचारताय, आम्ही यू.पी. वाले आहोत हे माहीत असूनही.

रणवीर कपूर : ऊगाच काहीतरी निरर्थक विचारू नका. हे माहित असणं दिग्दर्शकांचं काम आहे.

दिपीका पदुकोण : व्हाय शूड आय केअर?

तेवढ्यात आम्हाला श्रेयस तल्पडे (असा ऊच्चार करायचा असतो म्हणे) दिसला. त्याच्याकडून ऊत्तराची अपेक्षा होती. पण "नंतर भेटा, सविस्तर सांगतो. आत्ता घाईत आहे. ही मंडळी पुढे गेली वाटतं" असं सांगून तो शाहरूख, ग्वॉरीच्या दिशेने पळाला.

आम्ही काय विचारतोय ह्याची बातमी पोहोचल्याने स्वतःहूनच सचिन पिळगावकर आले. त्यांनी "त्या काळी राजा परांजप्यांना एका लहान मुलाच्या भूमिकेसाठी ... " अशी आम्ही पन्नास वेळा ऐकलेली टेप लावली. लिहून घेताघेता पेनमधली शाई संपली असं दाखवत आम्ही दुसरं पेन आणायच्या निमित्ताने पळालो. तिथे आमीर खान ऊभा होता. त्याला आम्ही विचारलं तेव्हा तो म्हणाला की "तसं हे सांगायला खूप वेळ लागेल. बस, दाढी करता करता सांगतो." आमच्या खिशात मोजून परतीच्या तिकिटाचे पैसे असल्याने आमीर कडून साधी मिशी कापून घेणं परवडणार नाही हे लक्षात आल्याने "आलोच" सांगून आम्ही परत सटकलो.

कोपर्‍यावर आमच्या प्रश्नाचं नेमकं ऊत्तर ठावूक असलेल्या मंडळींचं कोंडाळं दिसलं. पण त्यांच्याकडे फिरकायला काही कारणच नव्हतं. त्यांची ऊत्तरं छापली तर ह्या ब्लॉग ला ग्लॅमर कसं मिळेल? असली डाऊनमार्केट कामं आपण नाही करत.

Tuesday, December 30, 2008

निखळ विनोदाचा झरा - इंडिया TV

"डॉक्टरकाका, निखळ विनोद म्हणजे नक्की काय हो?" असा कोथळाकाढू प्रश्न चिमीने डॉ. पोट्यांना ना धड घरात ना बाहेर, ना दिवसा ना रात्री, ना धड शुद्धीत ना तारेत अशा अवस्थेत विचारला. डॉ. पोटे हे बिनऔषधाचे पी. एच. डी. डॉक्टर. विद्यापीठात प्रोफेश्वरकी करतात. फावल्या वेळात पुस्तकं छापून रद्दीवाल्यांचा धंदा ही वाढवतात. (वास्तविक त्यांच्या ह्या पेशामुळे अगदीच त्यांचा रोगांशी संबंध नाहीच असं नाही, पोटदुखी त्यांना विशेष मानवते.) "विनोद" हा त्यांचा जिव्हाळ्याचा आणि अभ्यासाचा विषय. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी विनोदाची प्रक्रिया, विनोद - प्रकॄती, विकृती की कलाकृती?, काही विनोदी पाककृती, पाककलेतील विनोदांचे संस्करण असे विविध ऊल्लेखनिय लेख, शोधनिबंध प्रसिदध केले आहेत. "कुमारसंभवातील विनोद आणि विक्रमोर्वशीयातील पिचक्या" आणि "कुमारसंभवातील विनोदप्रक्रियेतील कालिदासाच्या त्रुटींचे बिघडलेल्या पाककृतींतील त्रुटींशी असणारे साम्य व फरक" ह्या विषयांवर त्यांच्या दोन विद्यार्थिनींनींना विद्यापीठाने पी. एच. डी. प्रदान केली. डॉक्टरांचा नुकताच त्यांच्या गावाने "कुर्डुवाडीचे अत्रे" असा गौरव केला.

हे सगळं सांगण्याचं कारण, विनोद ह्या विषयावर डॉ. पोटे ही किती मोठी ऍथॉरिटी आहे हे तुम्हाला कळावं ईतकंच. तर चिमीच्या पृच्छेने डॉ. विचारांच्या गर्तेत गेले. समोरून लवकर ऊत्तर येणार नाही हे जोखायला चिमीला वेळ लागला नाही. आपणच प्रश्न विचारून ऊत्तर काढून घ्यायला हवं हे तिने ताडलं. घडलेला संवाद तो हा असा

चिमी: डॉक्टरकाका, निखळ विनोद म्हणजे नक्की काय हो?
डॉ: ......................... काहीच नाही.

चिमी: म्हणजे भरत जाधव, केदार शिंद्यांचा असतो. तो का?
डॉ: छे, छे. तो विनोद नाही. तो झाला आचरटपणा.

चिमी: मग ते आजकाल च्यानलवाले पुरस्कार देतात, त्याच्या कार्यक्रमात सूत्रसंचालक करतात तो?
डॉ: तो वाह्यातपणा.

चिमी: ओह. ते ह्सा हसा लागतं ते. जितेंद्र जोशी, अनासपुरे असतात ते हो. त्यात ते स्पर्धक करतात तो का निखळ विनोद?
डॉ: तो कसला विनोद. तो नुसताच विनोदनिर्मीतीचा अनाठायी प्रयत्न.

चिमी: अरेच्या. मग तो प्रशांत दामले (अनेक ऊवांचा पती) काहीबाही बोलून हसतो बघा, ते?
डॉ: तो विनोदनिर्मीतीचा फसलेला प्रयत्न.
... एव्हाना डॉ. ना प्रश्न विचारणं हा ऊत्तर मिळवण्याचा फसलेला प्रयत्न आहे हे चिमीच्या लक्षात येऊ लागलं होतं.

डॉ. : तू गडकरी, चिं.वि., प्र्.के, द.मा., पु.ल. वाचले असशील ना?
चिमी: नाही हो. माझं एज्युकेशन इंग्लिश मिडीयम मध्ये झालं ना काका. आणि तुम्हाला तर माहितीय मला कित्ती बोअर होतं वाचताना ते?

डॉ. : अग मग तू मराठी विषय घेतलासच का?
चिमी: असं कसं काक? थोडं मराठी मला यायला नको का? माझ्यासारखं धेडगुज्री का काय ते मर्‍हाठी येणार्‍या यंग मुलांना कित्ती स्कोप आहे आत्ता नवीन टी. व्ही. आणि रेडिओ च्यानेल्स वर?

डॉ. : पण मग तुला एवढा गहन प्रश्न पडायचं कारणंच काय? (ऊत्तर येत नसेल तर मूळ प्रश्नाच्या शक्यतेलाच हात घालावा ही प्रोफेश्वरांची जुनी ट्रीक)
चिमी: होमवर्क ला दिलाय हो.

हा संवाद चालू असतानाच डॉ. एकीकडे च्यानेल्स फिरू लागले. आणि काय चमत्कार. आपण शोधत असलेल्या ऊत्तराचं दर्शन त्यांना घडलं. "युरेका", डॉ ओरडले. कोणतं च्यानल समोर असेल हे वाचकांच्या लक्षात हे आलं असेलच. नवीन पी.एच. डी. साठी डॉ. ना आता अनेक विषय सुचले आहेत.




Saturday, December 27, 2008

गजनी संबंधी

आमीर खान चा गजनी चित्रपट येऊ घातला आहे आणि मेमेन्टो" शी त्याचा काहीतरी संबंध आहे असं ऐकिवात होतं. हे "गजनी" नक्की काय आहे ते आम्हाला कळेना. एक तर आमचे भाषा विषय कच्चे ( मग पक्के कोणते? असा गहन प्रश्न विचारू नका) त्यामुळे हा नक्की कोणत्या भाषेतला शब्द ते आम्हाला कळेना. बरं तो ईंग्रजी तून वाचल्याने त्याचं ऊच्चारण कसं करावं ही एक पंचाईत. गजनी, घजनी, घजिनी, गजिनी? समजेना. बरं जे काय असेल ते नक्की काय आहे, त्याच अर्थ काय हे कळेना.

टी व्ही वर कुठे तरी दाखवलं असेल. एवढा मोठा राष्ट्रीय अभिरूचीशी संबंध असणारा विषय टाळण्याइतकी आपली प्रसारमाध्यमं नक्कीच नाठाळ नाहीत. पण आम्ही सदानकदा "तोडू बातम्या" दाखविणारी च्यानेल्स बघण्यात मश्गूल असतो. त्यावर अधून-मधून ऊघडाबंब आमीर खान दिसला. पण आम्ही त्याच्या टरारून फुगलेल्या अंगावरचं गोंदवलेलं वाचण्यातच वेळ घालवला. (इतकं करून ते शेवटी वाचता आलं नाहीच) त्यामुळे बातमी आम्ही कधी ऐकलीच नाही.

शेवटी आज विकीपिडीया वरून कळलं की "गजनी" हे ह्या चित्रपटातल्या गुंडाचं नाव आहे. विकीपिडीया जिंदाबाद ! आम्हला एक कोडं सुट्ल्याचं समाधान मिळालं. त्यातल्या आमीर खान च्या बॉडीला, एट पॅक ऍब्स म्हणतात म्हणे. आम्ही परवाच एका साईट वरून "हाऊ टू गेट सिक्स पॅक ऍब्स" असं पुस्त्तक डाऊनलोड केलं. आमचं हे असंच असतं, वरातीमागून घोडं. आता राहणार की नाही आमचे ऍब्स जगाच्या दोन पॅक्स मागे? चालायचंच.

नेहेमी प्रमाणे वेळ होताच, आणि सुदैवाने नेट चालू होतं म्हणून आम्ही आमची जिज्ञासा जागृत केली आणि अजून शोध घेतला. त्यात आमी खान ला नाभिक-गिरी ची हौस असल्याचं कळलं. वा! आपल्याला हे जाम आवडलं. नेहेमीप्रमाणे त्याला किरण ताईंचा फोन गेला होता की "आमीर, कुठे हजामती करतो आहेस?". But she was literal and not at all metaphorical this time.

मंदीत फुकटचे खर्च नको म्हणून आम्ही केस वाढवित आहोत, मात्र आमीर खान च्या हस्ते क्षौर आणि श्मश्रू होणार असेल तर आम्ही गजनी कट करून घ्यायला तयार आहोत.तुमच्या कडे आमीर चा फोन नं आहे का? असल्यास जरूर कळवा. पाणी, वाटी, वस्तरा, साबण हे आम्ही भागीदारी तत्त्वावर पुरवू.

१. ऊच्चारण असा नवीन शब्द सा-रे-ग-म-प आणि पल्लवी जोशी ताई ह्यांच्या कृपाप्रसादाने आम्हाला कळला. आम्हाला ऊच्चार आणि ऊच्चाटन हे माहिती होतं, पण सांगितलं ना, भाषा विषय कच्चे.

Tuesday, December 23, 2008

खाडिलकरान्चा बंडू

काय बरं त्याचं नाव? हां, त्यागराज, त्यागराज. आम्ही लहानपणापासून त्याला अधून मधून बघत आणि ऐकत आलोय. तो भविष्यात दिवे लावणार हे आमच्या बाल-मनाने त्याच सांगितीक पदार्पण पाहतानाच जोखलं होतं *
तेव्हा आम्ही शाळेत होतो.

स्मरण यात्रा ह्या कार्यक्रमातून बंडू च पहिलं दर्शन झालं. मुकुंद फणसळ्कर, मृदुला दाढे हे गायक पण ह्याच कार्यक्रमात भेटले.** पण बंडू ख़ास लक्षात राहिला. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात तो फारच चुळ्बूळ करत होता. कानात बोटं घाल, नाकच खाजव, मांडी हलवत बस असं काही ना काहीतरी तो सतत करत होता. थोडक्यातच स्वस्थ रहाणं
हां आपला स्वभाव नाही हे तो दाखवून देत होता. आमच्या कुशाग्र + बुद्धीने तेव्हाच ओळखल की बंडू सतत दिवे लावत राहणार.

त्या नंतर तो कायम ह्या ना त्या कार्यक्रमातून दर्शन द्यायचा. एका मोठ्या पार्श्व-गायकाला मराठी जनता कशी मूकली आहे हे दाखवायाचा तो परोपरीने प्रयत्न करायचा. दुर्दैवाने अस फक्त त्यालाच वाटत होतं. त्याच्यातली कला जोखण्याची ताकद कोणात नाही अशी त्याची एकंदर देहबोली असायची. मग तो संगीत द्यायला लागला. (सांगा पाहू त्यांने संगीत दिलेलं एकतरी गाणं. आहे की नाही अवघड! मग? ते साधं काम नाहीच आहे मुळी) त्याने संगीत दिलेलं गाणं गायल्यामुळे त्याची बहीण अमृता सा-रे-ग-म जिंकता जिंकता राहिली. पण म्हणून बंडू ने काही हार मानली नाही. कलाकाराने स्वत:ला मोठ समजू नये हे त्याने अगदी शब्दश: घेतलं. तो अजूनच लहान लहान असल्यासारखं करायला लागला.

पण परवा झी मराठी ने आयोजीत केलेल्या कार्यक्रमात त्याला पाहिलं, आणि त्याच्या प्रयत्नांना यश अल्याचं पाहून बरं वाटलं. त्याला फायनली दिशा सापडली आहे.

आम्ही लहान असताना, ऑर्केस्ट्रा मध्ये एक मिमिक्री आइटम असायचा. गाण्यांच्या मधे प्रेक्षकांची हसवून करमणूक करणारे हे आर्टिस्ट दादा कोंडके, श्रीराम लागू आदींच्या नकला वगैरे करायचे. बंडू ने ह्या कलेला पुनर्जीवन दिल आहे. तूम्ही हा कार्यक्रम पुन:प्रक्षेपित झाला तर चुकवू नका. बन्डूच रूपड, त्याचा वेष, त्याचा नाच, गाण्यात मुळीच अपेक्षित नसलेल्या आलापी सगळच हास्यास्पद! मिमिक्री ची गरजच काय हा प्रश्न कोणी विचारला नव्हता आणि त्याला गाण्याचाच पर्याय देणार्या बन्डूच कौतुक किती करावं?

बंडू, तूला दिशा सापडली आहे. तू असाच आम्हाला हसवत रहा. माकड-चेष्टा कर, उडया मार, नाही त्या ताना घे तूला ते शोभतं लेका. गायला काय खूप जण आहेत.

* आत्म-स्तुति करू नये, पण काय ही दूर-दृष्टी !
** तुम्हाला आठवत असेल तर सुधीर गाडगीळ आणि शैला मुकुंद ह्यांनी निवेदन केल होतं। त्या काळी मराठी गाण्यांच्या कार्यक्रमांच निवेदन मराठीत करायची प्रथा होती.
+ कुश - गवत, अग्र - टोक : कुशाग्र बुद्धि - गवताच्या टोकावर मावेल एवढी

Monday, December 22, 2008

सामंतांची वैशाली

झी मराठी च्या सौजन्याने वैशाली सामंत (लावणी ला आग लावणारी, तीच ती)* हिचं गाणं ऐकण्याचा नुकताच योग आला. अजय-अतुल ह्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमात आणि पोलिसान्साठी आयोजीत केलेल्या कार्यक्रमात ती "कोम्बडी पळाली" गायली**. ते ऐकताना तो योग नसून भोग आहेत हे लक्षात आल.

स्वत: चं लाईव्ह गाणं इतकं वाईट होत असतानाही ज्या अधिकारवाणीने वैशाली सा-रे-ग-म-प च्या स्पर्धकांना सूचना करत असते ते पाहून तीच्या धैर्याचं आम्हाला कौतुक वाटतं. आता खरच सगळे स्वत:हून म्हणायला लागतील की "ऐ वैशाली ताई, आमच्या 10% तरी सूर लावता येतो का तूला? मग का उगाच परीक्षकाच्या खुर्चीत ठेव्हलय म्हणून नाटकं करतेस? दे "नी" नाहीतर तूला गायला लावेन". आणि हे ऐकल्यावर वैशाली काय करेल माहित नाही पण मान्यवर तरी नी देऊन मोकळे होतील, वैशालीचं गाणं कोण ऐकणार?

* लावणी ऑन फायर हा वैशाली चा पहिला अल्बम, ज्यात तिने रेशमांच्या रेघांनी ला धुरी दिली
** वास्तविक गायली असं लिहिताना माझ्या हातांना आणि बुद्धीला खूप त्रास होतो आहे. तसं ही गाणं हे "गायल" जातं, हे सा-रे--- फेम पल्लवी जोशी आणि इतर ह्यांच्या मराठीत बसत नाही. "लास्ट टाइम ला" (हे पल्लवी मराठी आहे.) मी कार्यक्रम पाहत होतो तेव्हा सगळे खूप छान गाणं म्हणत होते.

Sunday, December 7, 2008

माहिती तंत्रज्ञानातील नवीन संधी - क्याचिंग!

इन्डिक-थ्रेड्स ही कॉन्फ़रन्स नुकतीच पुण्यात पार पडली. पुणेटेक ह्या ब्लॉग ने त्याचा एक छान परामर्श घेतला. अर्थातच पुण्यात घडणारी ही ईव्हेन्ट सकाळ ने कव्हर केली. की-नोट ऍड्रेस मध्ये आनंद ने सांगितलं की मल्टी कोअर चिप्स आणि क्यॅशिंग ह्या कडे प्रोग्रॅमर्स नी लक्ष द्यावं. सकाळ ने हे "क्यॅचिंग" असं छापलं। ते वाचताना आमची पार च चिडचिड झाली। म्हणजे तो शब्द अगदी डोक्यातच गेला. क्यॅचिंग?? अरे दया करा रे! तुम्हाला ह्याचे दूरगामी परिणाम लक्षात नाही का येत?

  • तुम्ही असं काहीतरी लिहीणार.
  • माहिती तंत्रज्ञानाने भारावलेल्या ह्या पुण्य-नगरीतले जबाबदार(!) पालक ते वाचणार.
  • कुठलीही पोच आणि कशाचही फ़ारसं ज्ञान नसलेले एका चहाच्या बदल्यात ऊगाचच सल्ले देणारे, सल्लापटू ते वाचणार.
  • ते ऑपरेटींग सिस्टीम्स, C, C++ वगैरे सगळं जुनं झालं असं ते सांगत फ़िरणार, पुराव्यासाठॊ तुमच्या बातमीचा दाखला देणार.
  • पालक ही क्याचिंग, क्याचिंग करत क्लासेस शॊधत फ़िरणार.
आणि मग ह्या नंतर पुन्हा जुन्या फ़ॅड प्रमाणे जर का पालकांनी त्यांच्या मुलांना "नेहरू स्टेडिअम" ला पाठवायला
सुरूवात केली तर त्याला जबाबदार कोण?

Wednesday, December 3, 2008

आम्ही सारे खवय्ये

आपल्या "खवय्येगिरी" ने नावलौकिकास पोचलेल्या आमदारांनी बहुदा प्रशांत दामले (एक लग्नाची गोष्ट मधला घोड़-नवरा) चा "आम्ही सारे खवय्ये" पाहिला आणि त्यांना लक्षात आलं की आपल्या पेक्षा ही जास्त खाणारी माणसं राज्यात आहेत. हे काही बरोबर नाही, असं सर्वांच मत झालं. शेवटी खवय्येगिरी कुठल्याही प्रकारची का असेना, मक्तेदारी आपलीच असायला हवी असा सगळ्याच पक्षांचा आग्रह झाला त्यामुळेच यंदाच्या हिवाळी अधिवेशानासाठी केलेली ही उपाय योजना पाहा (सोर्स - eSakaL - विदर्भ)

चोखन्दळ वाचकांच्या नजरेतून हे सुटल नसेलच, पण तरीही विशेष ध्यानात घेण्यासारखे काही मुद्दे नमूद करत आहोत

एका क्षणात साठ पोळ्यान्ची चळत ! क्या बात है. आमची नम्र सूचना आहे की ह्या उपहारगृहाला "द्रौपदीची थाळी" असं
नाव द्यावं
सार्वजनिक बांधकाम विभाग अल्पोपहाराची सोय ही करतं हे तुम्हाला माहित होतं का?
पालेभाज्या आणि दही १० दिवस राहणार म्हणजे आमदारांना किमान १० दिवसांची जूनी भाजी किंवा कोशिंबीर मिळणार
टोस्टर मधे ओम्लेट होतं हे तुम्ही ऐकलं होतं का?
चपात्या बनवण्यासाठी आता कणीक करायची गरज नाही? का कणीक हाताने करायची गरज नाही?
रोटी तव्यावर डोसे आणि उत्तप्पे ही -- खा लेको खा!
स्वयंपाक करण्यासाठी मसाला ही सगळ्यात मोठी बाब? आम्हाला वाटलं होतं की भाज्या, धान्य वगैरे असायला हवं, मसाला महत्वाचा तो चित्रपट आणि न्यूज़ साठी.
आणि एकदम १० किलो मसाला? अरे किती मसालेदार खाल? घशाशी येइल ना!

बहुदा कोणीतरी हे उपहारगृह सुरु करण्याआधी आमदार किती खातात असा प्रश्न बाहेर खूप जणांना विचारला असेल, आणि "बकासूरासारखे" असं उत्तर त्यांना मिळाल असेल. सन्दर्भ लक्षात न आल्याने घोळ झाला असेल.

काही असो, खा प्या गुट्गुटित व्हा.

Tuesday, December 2, 2008

मराठीकरण असावं तर असं

आज पेपर मध्ये नवीन वायरस बद्दल सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
सोर्स http://www.esakal.com/esakal/12032008/SpecialnewsBE52E56E19.htm
ज्यांनी ही बातमी फक्त नेट वर वाचली असेल त्यांनी हार्ड-कॉपी घेउन वाचावी कारण मूळ बातमीतील मराठीकरण उल्लेखनीय आहे

त्यात असं सांगितले आहे की - अजून ह्या वायरस वर "उतारा" उपलब्ध नाही. त्याची "लस" मिळत नाही. वायरस एक्टिवेट झाल्यानंतर सुरु होणार्या "दुष्ट-चक्रा" च त्यात वर्णन दिलं आहे.

एकंदरीतच बातमी वाचून ह्या ब्लॉग चे असंख्य (म्हणजे एक) मराठी वाचक एकदम दिलसे आणि मनसे खूष होतील

उद्या कंपनीला नावाच्या बोर्ड प्रमाणेच सगळा कारभार मराठीत करण्यासंबंधी कायदा निघाला तर "मक्काफी" सारख्या कंपनी मधले हुद्दे खालीलप्रमाणे असतील

चढत्या क्रमाने
  • हकीम
  • वैदू
  • रामदेव
  • वैद्यबुवा
  • पतंजली
  • चरकाचार्य
  • सुश्रुताचार्य
  • धन्वन्तरी
एखादा विशेष द्न्यान नसूनही तसा आव आणून बाता मारणारा कर्मचारी असेल तर त्याला बाताम्बे असं संबोधण्यात येइल