Friday, January 9, 2009

बापूजी (आत्रंग्यांचे), आमच्या रामू भैय्याला नोकरी मिळेल का?

प्रिय बापूजी, पत्रकारिता क्षेत्राबद्दलचं आमचं ज्ञान म्हणजे मल्लिकाच्या स्कर्टापेक्षा तोकडं. आम्हाला त्यातलं ओ का ठो माहित नाही. वर्तमानपत्रांची किंमत ही आम्ही त्यांना मिळणार्‍या रद्दीच्या भावातून करतो. ही आमची (का त्यांची?) लायकी. मात्र आम्ही तुमच्या बातमीदार आणि कळत-नकळत चे अगदी नियमित वाचन करतो. आम्ही लहान होतो तेव्हा रस्त्यात मारामारी दिसली की बघ्यांमधला आमचा नंबर पहिला. शाब्दिक फटकार्‍यांबद्दल आम्ही वय वाढलं तशी ही आवड वाढवून आहोत. त्यामुळे "एस-एम-एस" आला रे आला की वाचणार्‍यांमधले आम्ही पहिले. सांगायचा मुद्दा मात्र हा नाही.

तुमचे तेजाबफेकू (हे आम्ही कौतुकाने म्हणत आहोत) ब्लॉग वाचून, आम्हाला तुमचं ते पत्रकारिता क्षेत्र हे एकंदरीत एकदम मजेदार वाटू लागलं आहे. काही दिवसांपूर्वी "कळत-नकळत" मध्ये तुम्ही जॉब बद्दल जाहिरात दिली होती की "पाहिजेत मुंबई लोकमतला पत्रकार". ती वाचून आमच्या डोळ्यासमोर ताबडतोब आमच्या रामू भैय्याची मूरत ऊभी राहिली. (ऍक्च्युअली ती गादीवर बसली होती) त्यात लिहिलंय की "उपसंपादक/वार्ताहर पदासाठी किमान पदवीधर, दोन वर्षांचा आणि पाने लावण्याचा अनुभव या किमान अटी आहेत".

तुम्हाला सांगतो
आमचा रामू भैया रांचीचा बी.ए. आहे - म्हणजे पदवीधर वर टीक मार्क.
आम्ही गेले ८ वर्ष त्याच्या ठेल्यावर तोबरे भरून तोंडं लाल करायला जातो. - दोन वर्ष काय चौपट अनुभव - टीक मार्क.
आणि मुख्य म्हणजे पाने लावणे. ह्यात तर त्याचा हात कोणपण ध्ररू नाही जात. आम्ही सगळ्या गल्ल्या, रोड्स पालथ्या घातल्या, अगदी त्या कर्वे रोड्च्या ए.सी. शौकीन मध्ये पण गेलो. पण बनारसी, कलकत्ता, मघई, फुलचंद, पूना सादा काही पण सांगा. रामू भैय्या सारखा पाने लावणारा कोणी शोधून दाखवावा ! ह्यात तर एकदम मोठ्ठं टीक मार्क.

त्यात तुमच्या क्षेत्रात लागणारी बातम्या पुरवण्याची हौस? अहो, आम्ही एकदा का ठेल्यावर गेलो की आठवड्याची सगळी बित्तंबातमी आम्हाला मिळते. त्यात पुन्हा तीऐकली की तिची शहानिशा न करताच रामू पहिल्याछूट नंतर येणार्‍यांना ऐकवतो. हे तुमच्या बातमीदारांच्या किस्स्यांशी एकदम तंतोतंत जुळतं की नाही? त्यात भर म्हणजे त्याची पाने पुसण्याची कला. म्हणजे एकदम पानावर चेरीच झालं.

आमच्या रामूला रोज रोज तंबाकू चोळून कंटाळा आला आहे. हात काळेच करायचे तर शाईने करू असं म्हणाला होता एकदा. परवा सकाळच्या पान-सुपारी कार्यक्रमाला आपला ठेला असावा असं त्याला राहून राहून वाटत होतं. तुम्ही सांगा की त्याला ही नोकरी मिळेल का. संपादकांना रोज सुपारी कातरून ही देईल तो.

No comments:

Post a Comment