Thursday, January 1, 2009

पाकीस्तानमधील गन मार्केट

सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. नवीन वर्षात काय बदलणार आहे? कॅलेंडर बदललं. नोकरदार वर्गाच्या सुट्ट्यांचं अकाऊंट पुन्हा भरलं. पोपटवाल्यांच्या लेखण्या नव्याने कामाला लागल्या. अनेक अक्षरशत्रूंनी भविष्य वाचण्याच्या ऊद्देशाने पेपर आणि मासिके हातात घेतली. अशा काही मोजक्या गोष्टी सोडल्या तर बदललं काहीच नाही. तोच सूर्य, तीच प्रभा, तेच काळोखात बॅटर्‍या घेऊन फिरणारे कवी आणि त्याच त्या रटाळ कविता, असा अगदी निराशावादी सूर मी लावणार नाही. पण वास्तव बघता ३१ डिसेंबरला नैमित्तिक महत्तावाच्या पेक्षा खूप जास्त काही मानण्याचं कारण नाही ही आमची विचारसरणी. २००८ मध्ये खूप काही घडून गेलं असेल, चांगलं वाईट, आंबट गोड - पण बोकाळलेला दहशतवाद वर्षाशेवटी त्यावर स्वतःची मोहोर ऊमटवून गेला.

Wednesday मधला नासिरूद्दीन शाह सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा नव्हता त्यापेक्षा २६ नोव्हेंबर नंतर खूप जास्त जवळ आला. आणि वर्ष बदललं तरी तो काही लांब जात नाही. ह्या पार्श्वभूमीवर विचार करताना एक खूप आधी बघितलेला व्हिडीयो पुन्हा कोणीतरी पाठवला. जरुर पहा. बघताना थोडी गंमत वाटावी ह्या पद्धतीने तो तयार केला आहे. मात्र त्या मागच्या भयाण वास्तवाची जाणीव पार हादरवून टाकते.

विशेष पहाण्याच्या गोष्टी -

१. मंडई च्या धर्तीवर चालणारं गन मार्केट (फरक एवढाच की भाजी ऐवजी शस्त्र आणि दारूगोळा)
२. अद्ययावत शस्त्रांची ऊपलब्धी.
३. शस्त्रांच्या किंमती. (आमच्या आनंद नगरचे ऊच्चभ्रू भाजीवाले ३ दिवसांची भाजी सुद्धा ह्यापेक्षा जास्त भावाने विकतात)
४. शस्त्र चालवणार्‍यांच्या चेहेर्‍यावरचे, "हे अगदी रोजचंच" असल्याचे भाव.
५. शस्त्र तपासून घेण्याची आणि वापरून बघण्याची सोय आणि पद्धत

दहशतवादाचा सामना करण्याच्या गोष्टी सध्या सगळीकडेच ऐकू येत आहेत. पण त्याची पाळेमुळे ऊखडून काढण्याच्या घोषणा ही दिल्या जातात. ह्या गोष्टी जरूर घडायला हव्यात. पण ऊपाययोजना करण्या आधी मूळ प्रश्न किती गहन आहे ह्याची योग्य कल्पना असणंही तितकंच महत्त्वाचं आहे एवढंच.

लिंक - http://www.youtube.com/watch?v=Ma7GL9q6z90

1 comment:

  1. Tuzi link chalat nahiye

    http://www.youtube.com/watch?v=Ma7GL9q6z90

    ReplyDelete