Sunday, January 4, 2009

अजि म्या मॅन्युअल वाचले

स्वयंपाक ह्या गोष्टीशी माझा संबंध हा ऍक्टिंग शी शाहरूख खान चा, गायनाशी प्रशांत दामले चा आणि नृत्याशी अशोक सराफ चा जितका संबंध आहे तेवढाच! थोडक्यात वेळ पडलीच तर काहीतरी खूड्बूड करता येईल ईतकंच. पण माईक्रोवेव्ह ह्या ऊपकरणाने माझ्या सारख्यांवर अनंत ऊपकार केले आहेत. तापमान आणि वेळेचं गणित पुस्तकात दिल्याप्रमाणे पाळलं तर खाण्यायोग्य पदार्थ बनण्यास विशेष अडथळे येत नाहीत. परवा मी गाजराचा हलवा केला. गाजर किसण्यासाठी फूड-प्रोसेसर वापरला. हे दिव्य मॅन्युअल च्या मदतीने अगदी सहज पार पडलं. माझ्यासाठी ह्या सगळ्याच गोष्टी धक्कादायक आहेत. प्रॉडक्ट मॅन्युअल ह्या गोष्टीचा मला विशेष धसका आहे. काहीही नवीन विकत आणलं की ते वापरायचं कसं हे सांगणारी ही जाडजूड पुस्तिका मी पहिल्यांदा दिसणार नाही ईतक्या दूर फेकून देतो. ह्या मागची कारणं काय असावीत ह्याचा मी जरा सविस्तर विचार केला (कामधंदे काय दुसरे?)

१. सुरुवातीच्या काही पानांमध्ये भरलेल्या असंख्य "वॉर्निग्स" किंवा "धोक्याच्या सूचना". कोणकोणत्या परिस्थितीत ऊपकरण वापरू नका ह्याची जंत्री. अतिशय निरूपयोगी आणि बिनडोक माहिती(!) भरलेला हा भाग असतो. कोणकोणत्या प्रकारांनी तुम्हाला ईजा होऊ शकते हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर एकदा हे जरूर वाचा. हे विचार आणि आकलनाच्या पलीकडलं असतं. ऊदाहरणार्थ, हा ब्लॉग पोहत असताना वाचू नये, तुम्ही नायट्रोजन ने भरलेल्या चेंबर मध्ये बसून हा ब्लॉग वाचत असाल आणि त्यातल्या लेखाला आग लावावी असं तुम्हाला वाटलं तरी काडी पेटवू नका. वगैरे वगैरे.

च्यायला, कोण मरायला असं काही करेल? हा तुम्हा-आम्हा सामान्यांना पडणारा प्रश्न. अमेरिकेतले काही रिकामटेकडे आणि श्रीमंत मूर्ख हे त्याचं ऊत्तर. दावे लावून पैसे मिळविण्याच्या नादात असलेल्या ह्या मंडळींनी जगाला दिलेली ही भेट आहे. अशी माणसे आणि त्यांच्याकडे असलेला वेळ ह्या दोन्हीची अजिबात कमी नसल्याने ईजा करून घेण्याचे नवनवीन मार्ग चोखाळले जातात आणि मॅन्युअल मारूतीच्या शेपटीसारखं वाढत जातं

२. लोकांना नको असलेले पन्नास "फिचर्स" गळी मारण्याची ऊत्पादकांची हौस. ह्याची अनेक ऊदाहरणं देता येतील. वाचकांनी अनुभवलेली ऊदाहरणं जरूर कळवावीत. एक ऊदाहरण म्हणजे "पिक्चर ईन पिक्चर". बोंबलायला कोण ते वापरतं देव जाणे. एकतर
एका स्क्रीन वर काय चायलंय हे समजणं अवघड.
त्यात आता त्यातली ४०% जागा फिरत्या बातम्या, जाहीरातीनी व्यापलेली.
पाहण्यासारखं एक च्यॅनेल मिळायची मारामार, दोन कुठून सापडणार?
सापडलीच तर ती एकत्र पहायची कशी हे लक्षात ठेवणं अवघड.
असे असंख्य "फिचर्स" ! आणि ते वापरायचे कसे ह्याची अनंत पानं भरलेली मॅन्युअल्स.

३. एक गोष्ट धड करण्यापेक्षा पन्नास धेडगुजरी गोष्टी करणारी ऊत्पादने. म्हणजे मोबाईल कम रेडीओ कम कॅमेरा कम यु.एस्.बी डिस्क कम हॅंड ग्रेनेड. सीडी-डीव्हीडी प्ल्रेअर कम गजराचं घड्याळ कम पेपरवेट कम पोळी लाटायचं यंत्र. अरे किती त्रास द्याल? एका यंत्रात आम्ही किती बटणं बडवायची? आणि आता ही अशी बटणांची लाख कॉबिनेशन्स आली म्हणजे त्यासाठी शेकड्याने ते वापरण्यासंबंधीची पाने लिहीणे आलं.

ह्या सगळ्या मुळे ते मॅन्युअल अतिशय निरूपयोगी आणि एखाद्या अध्यात्मिक पोथीसारखं झालेलं असतं. पोथ्या निरूपयोगी असतात असं मी म्हणत नाहीये, पोथीसारखं मोठं असं म्हणतोय. मात्र अशा पार्श्वभूमीवर मी मॅन्युअल वाच्तो काय, त्याप्रमाणे ते ऊपकरण वापरतो काय आणि ते अपे़क्षेप्रमाणे चालतं काय सगळंच विश्वासापलीकडलं.

1 comment:

  1. maast....mala tuzi shaili jara jara "Kanekar" valanachi waatli. Keep it up.

    Akash

    ReplyDelete