Saturday, March 13, 2010

मराठी अभिमान गीत

माझ्या आणि अनेकही काही लोकांच्या मते मी एक अंतर्बाह्य मराठी माणूस आहे. मराठी भाषा, बोली, वाङमय, संस्कृती ह्यापासून मी वेगळा होऊ शकत नाही.

' ळ' आणि 'ण' मला अतिशय प्रिय आहेत. म्हणूनच माझा मित्र जेव्हा बालेवाडी असं न म्हणता बाळेवाडी असं म्हणतो तेव्हा मला ते आवडतं (मूळ नावात 'ल' आहे का 'ळ' आहे हे माहीत नसूनही) आणि म्हणूनच श्रेयस तळपदे स्वतः त्याच्या आडनावाचा ऊच्चार जेव्हा तल्पडे असा करतो तेव्हा मला केवळ फॅशन म्हणून अंगिकारलेल्या त्याच्या इंग्रजी गुलामगिरीची चीड येते. अनेक मराठी पालक जेव्हा आपल्या पाल्याला मराठी कसं धड येत नाही हे कौतुकाने सांगतात तेव्हा मला ते ऐकून खिन्नता वाटते.

सांगायचा मुद्दा की मी मराठी आहे एवढंच न सांगता त्या गोष्टीवर भरभरून बोलत सुटण्याइतका मी मराठी आहे. माझा हा बाणा मी आनंदाने जपला आहे मात्र तो कधी अमराठी लोकांवर लादलेला नाही.ह्या पार्श्वभूमीवर, मी जेव्हा हे ऐकलं की कौशल ईनामदारने अथक प्रयत्नांनी मराठी अभिमान गीत तयार केलं आहे तेव्हा मला खूप आनंद झाला.

असंच एक गाणं 'लख लख चंदेरी' (गीत - श्रीरंग गोडबोले, अप्रतिम संगीत - अजय अतुल, गायक - स्वप्नील बांदोडकर). त्यातलं 'प्रभात आली प्रभात झाली जगती गाजावाजा, बोलपटांचा मुहूर्त ठरला अयोध्येचा राजा' नंतर जेव्हा प्रभात ची तुतारी वाजते तेव्हा प्रभात युगाच्या अनेक वर्ष नंतर जन्मलेल्या माझ्या डोळ्यासमोर त्या युगाची माझ्या कल्पनेतली चित्रं तरळू लागतात. (हेच गाणं यु-ट्यूब वर बघा, ह्याच क्षणाच्या वेळचे हेमा-मालिनी च्या चेहेर्‍या वरचे भाव, खरंतर कोणत्याही भावाचा अभाव बघा. मराठी नसण्याचा फरक तुम्हाला दिसेल. असो.) गाण्याच्या शेवटी 'मराठी पाऊल पडते पुढे' जेव्हा येतं तेव्हा आपण अभिमानाच्या परमोच्च बिंदूला पोहोचलेलो असतो.

वास्तविक ह्यासारखी अपेक्षा ठेवून महाराष्ट्र गौरव गीताचा काही भाग नुकताच ऐकला. पण निराशा झाली. म्हणजे देवकी पंडीत चं गाणं ऐकायला जावं आणि काही अपरिहार्य कारणास्तव ते नं होता त्याऐवजी वैशाली सामंत ऐकायला मिळाल्यावर जे होईल तसं झालं. कौशल ईनामदार मुलाखतीत म्हणाले की "खूप लोकांचं असं मत आहे की ते ऐकून स्फुरण चढत नाही. पण हे तसं गाणं नाहीच आहे. हे प्रेमळ गीत आहे. भाषेबद्दल असलेल्या प्रेमाचं, ओलाव्याचं." असेल बुवा. कदाचित हा हळुवारपणा माझ्यात कमी असावा.

टीपः
पहा - अजय अतुल चे लख लख चंदेरी
पहा - मराठी अभिमान गीत

2 comments:

  1. तुम्हाला बहुतेक 'मराठी अभिमान गीत' अभिप्रेत आहे (महाराष्ट्र गौरव गीत वेगळे आहे) मी मराठी अभिमान गीत अनौपचारिकपणे कौशल इनामदारांच्या तोंडी ऐकले होते, व तुमचा ब्लॉग वाचल्यानंतर यूट्यूबवर बघितले व ऐकले.

    मला आवडले

    एकतर गाण्यात एक निर्मळपणा आहे, चाल मोहक आहे, गुणगुणत बसाविशी वाटते, व विडियो बघताना सर्व कलाकारांचे आवाज व हरकती ऐकल्या की धन्य वाटते. गाण्याची लय हळूवार असली तरी त्यात हळू हळू गायन समूह मिसळून, तालवाद्य व व्हायोलीन समूह मिसळून अखेर जो प्रचंड समूहाचा एकसंधपणा येतो तो आजच्या दबलेल्या मराठी अस्मितेला साजेसा आहे. ह्यात जरी युद्धाची ललकारी नसली तरी सत्याचा आग्रह धरण्याचा संथ पण अटळ निर्धार आहे.

    अतुल
    (तुमच्या ब्लॉगमध्ये गाण्याचा दुवा नाहिये म्हणून इथे देतो - http://www.marathimanoranjan.com/)

    ReplyDelete
  2. पूर्वीच्या शिर्षकातील चूक लक्षात आणून दिल्याबद्दल आणि गाण्याचा दुवा ऊपलब्ध करून दिल्याबद्द्ल धन्यवाद

    ReplyDelete