Tuesday, July 26, 2011

स्मृतीभंश

एकदा एक कोल्हा म्हणे झालंय ऊदास जंगल
खेळ घेऊन सगळ्यांचे ऊडवून देऊ दंगल

सिंह झाला खूष म्हणे मस्त ऊपाय काढला
ताबडतोब सगळ्या जंगलांना निरोप त्याने धाडला

जंगल लागले कामाला साफसूफ झाली सुरू
रहायला नवीन गुहा आणि नवीन ग्राऊंड करू

कोल्हा होता नायक त्याची सगळीकडे देखरेख
सगळ्या खर्चाचा भार ऊरी, रोज फाडू लागे चेक

बघता बघता दिवस ऊजाडला आले सगळे चमू
क्रीडानगरीत धमाल ऊडवायला खेळिये लागले जमू

गुहा होत्या गळक्या आणि स्टेडियम फुटके
आईस हॉकी खेळतानाही बसू लागले चटके

प्राणी सर्व चिडले म्हणती व्यवस्था ही कसली?
एवढा खर्च करूनही स्पर्धा का ही पिचली?

घेतलं कोपर्‍यात कोल्ह्याला आणि विचारला जाब
अशी कशी परतफेड जेव्हा केली राब राब?

कोल्हा म्हणे कोणती स्पर्धा? कसले पैसे कसले चेक?
पाच वर्षे झाली, मला आठवत नाही काही एक.

प्राणी म्हणती असं कसं, खात होतास तेव्हा?
शाबूत होती स्मॄती तूझी, टेडर्स काढली जेव्हा

कोल्हा झाला निराश म्हणे ऊफराटी तुमची तर्‍हा
भूकेचा नियम नैसर्गिक लागेल तेव्हा चरा

बाकी सगळा खेळ नियतीचा मी काय करू?
स्मृतीभंशात चूक झाली दंड कसा भरू?

माकड होता वैद्य त्याला आणलं लगेच तिथे
म्हणती तपास कर रोगाचा स्मृती गेली कुठे

माकडानेही थोडं लोणी कोल्ह्याघरी चाखलं होतं
खाल्ल्या मीठाचं ईमान त्यानेही नीट राखलं होतं

तो म्हणाला बाबांनो असाच विचित्र रोग हा
शिक्षा काय करता ज्याला आधीच आहे भोग हा

नशीब समजा फक्त पैशाच्याच गोष्टी हा विसरला
तुम्ही सहानुभूती दाखवा जर लंगड्याचा पाय घसरला

हताश झाले प्राणी काही, गुमान परत घरी गेले
त्यांचीही स्मृती धूसर झाली कोल्ह्याला ते विसरून गेले

जंगल तसंच ऊदास आहे, रोज वणवा रोज फायरिंग
राजा प्रधान मात्र म्हणती "अवर जंगल इज शायनिंग"

~ मुकुल जोशी

1 comment: