Friday, June 3, 2011
कोरी पाटी
पहिलीपासूनच वेगवेगळ्या टाईपच्या शंभर आणि दोनशे पानी वह्या वापरणं ही चैन अनेकांना परवडणारी नव्हती. बाजरातून घाऊक प्रमाणात ताव किंवा रद्दीतून कोरी पानं घेऊन ही मुलं वह्या बाईंड करून घेत असत. चौथी पर्यंत तर आम्ही बर्याचशा लिखाणासाठी पाटी वापरत होतो.
गार्गीला मी दोन वर्षांपूर्वी पाटी आणली. कोणत्याही दुकानात आपल्याला सहज पाटी विकत मिळेल ही माझी कल्पना पार खोटी ठरली. आणलेली पाटी ही तिच्यासाठी एक गंमत किंवा खेळ ह्यापलिकडे काही नव्हतं. ईथून पुढेही ह्यात काही बदल घडेल असं नाही. कारण आता पाटीवर लिहीणं हा शालेय ऊपक्रमांतला भागच नाही.
आमच्या वेळी दगडी पाटीवर लिहीणं हा नित्यनियमाचा भाग होता. शाळेतून दिलेला घरचा अभ्यास आणि पाढे आम्ही घरून पाटीवर गिरवून आणत होतो. माझ्यासारख्या चांगल्या (!) घरातील मुलांकडे कमी वजनाच्या डबल पाट्या असायच्या. स्पंजचा तुकडा ठेवायला एक छोटी त्याच आकारची डबी आमच्याकडे होती. कधीतरी तो न वापरता जीभेवर बोट लावून आम्ही पाटीवरचं चूकीचं लिहिलेलं खोडायचो. स्वच्छ कोर्या पाटीवर लिहायला खूप छान वाटायचं.
हे सगळं आता गेलं. पाटी एकदम 'डाऊन मार्केट' झाली. बहुदा ती वापरणं हे 'घाटी'पणा ठरत असावं. कोर्या, गुळ्गुळीत पानांच्या, चित्रं असलेल्या वह्यांपुढे पाटी एकदमच गावरान नाही का? कापडी पिशव्यांपेक्षा आकर्षक दिसणार्या प्लॅस्टिकच्या पिशव्या रोजच्या वापरात आल्या त्या ह्यामुळेच. आजकाल प्रत्येक गोष्टीला "ऊंफ फॅक्टर" लागतो, प्रियांका चोप्राचा जो आहे तसा.
पाटीला कालबाह्य करून आपण तो मिळवला खरा. पण त्यामुळे काही इतर गोष्टी घडू लागल्या. पाटीने अक्षर वळणदार होतं हे मी म्हणू शकत नाही. माझं स्वतःचं अक्षर पाह्ता मी नियमाचा अपवादच ठरेन.
१. पण माझ्या लहानपणी पेन्सिलीला टोक करण्यात माझ्या आईबाबांना फार वेळ वाया घालवावा लागला नाही.
२. जी काही खाडाखोड मी केली असेल त्याच्या स्मॄती त्या पाटीने कधी अंगावर खेळवल्या नाहीत. लिहायला शिकताना सहज होणार्या त्या चूकांच्या पुराव्यांवरून घरी काय किंवा शाळेत काय, मला शेरे कधी मिळाले नाहीत.
३. रेकॉर्ड न राहिल्याने कालच्यापेक्षा मी सुधारणा केली का नाही ह्याची अनाठायी चर्चा कोणी केली नाही.
४. पालक-शिक्षक संवाद (जो कधी फारसा घडतच नसे) हा, "अजून त्याच्या वेलांटीचं वळण नीट येत नाही" अशा मुद्द्यांवर कधी घडला नाही.
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, वॄक्षतोड, पर्यावरण, रिसायकल्ड पेपर अशा गोष्टींचं बाळकडू कोणी मला न कळत्या वयात पाजलं नाही. शाळेतून पाटी बाद करून ह्या गोष्टी मुलांच्या पचनी पडाव्यात अशी अपेक्षा करणार्या आपल्या सगळ्यांची पाटी, खरतर नसते हव्यास धरण्यानं कोरीच राहत्येय असं मला वाटतं. पण ती आपण जपून ठेवूया.
आपल्या लहानपणी बोरू ही जशी संग्रहालयातून पाहण्याची गोष्ट होती तशीच आपल्या नातवंडांना इतिहासकालीन लिखाणाची सामुग्री म्हणून ती दाखवायला आपल्याला ऊपयोगी ठरेल.
Monday, April 26, 2010
किमया
( पार्श्वभूमी )
मावळ प्रांतातील एक गाव छानसे
त्या किनार एका सुंदर नदीची असे
गावात ल्हानग्या घरी तरूण तो वसे
खंडोबा ज्याच्या जवळ राऊळी बसे
लवकरी ऊठावे न्याहारी करून निघावे
वनी हिंडत-भटकत, जिन्नस जमवत जावे
दो घास भाकरी ठेच्यासमवे खावे
अन् मधूर गूळाच्या खड्यात सूखा पहावे
अशी साधी भोळी आयुष्याची रेष
ना गंभीर चिंता नसती भलते क्लेष
परि ग्रहण कसे ना कळे तया लागले
ना कळे कुणा का दैव असे वागले
( आपत्ती काल )
कळस ऊडाला राऊळ भग्न जहाले
खंडोबा पडला, माल्य विखरून गेले
गावातील खंदे वीर ऊताणे पडले
कुंकू लोपले, हिरवे कंकण फुटले
हरपली शांतता, गेले सौख्य दूर
नासली निद्रा ग्लानीचा आला पूर
जागे होऊनी कळले स्वप्न नव्हते
उद्वेग, निराशा, प्रश्नच सत्य होते
जो रक्षणकर्ता तोचि तुटूनी पडला
मग मर्त्य जीवा आधार असे तो कुठला?
हा विचार घेऊनि येई आठवण एक
त्या शूर मुलाचे कार्य म्हणे तू देख
तरूण़ जरी तो असे वीरांचा वीर
तेजाचा पुंज जो, सूर्याचा अवतार
बुद्धीने तल्लख अन् मुत्सद्दी नेता
देव, देश, धर्माचा रक्षणकर्ता
( आठवणी नंतर )
नयनांस लागला दिसू ऊगवता गोळा
रंग केशरी, पोटी तेज नी ज्वाळा
जरी भासे तरीही योग मुळी हा नसे
की "भगव्या"सदृश सूर्यंबिंब ते दिसे
बळ आले अंगी तरूणा नकळत त्याच्या
रक्तातील थेंबाथेंबा फुटली वाचा
किंतु न आता ऊरे शोधता ध्येय
किमया ही त्या एकाची, जय शिवराय
Wednesday, March 31, 2010
सोनियाचा दिनू
अशोकजींना शुभेच्छा
Wednesday, March 17, 2010
परदेशी विद्यापीठांना भारताची दारं खुली
आपण सगळ्यांनीच ही बातमी वर्तमानपत्रात वाचली असेल. ह्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिलीआहे. वास्तविक भारतातल्या शिक्षण संस्थांची अवस्था आणि गल्लाभरू प्रवृत्ती पाहता विद्यार्थ्यांना अधिक पर्याय मिळतील. स्पर्धा वाढेल, आणि कोणतीही निकोप स्पर्धा कधीही चांगलीच. मात्र शैक्षणिक क्षेत्रातील स्पर्धा निकोप मुळीच नाही.
दुर्देवाने आज आपल्या देशात आणि राज्यात राज्यकर्ता (राजकारणी) तोच बांधकाम व्यावसायिक, तोच शिक्षण महर्षी, तोच गुंतवणूकदार, तोच ऊद्योजक, तोच क्रीडा संस्थांचा सर्वेसर्वा अशी स्थिती आहे. अशा पार्श्वभूमीवर प्रामाणिकपणे काम करणार्या एखाद्या परदेशी विद्यापीठाला ते स्थिरावू देतील का?
दुसरा प्रश्न असा की परदेशातल्या कोणत्या संस्था/विद्यापीठं इथे येतील? एखादं ऑक्सफर्ड, स्टॅनफर्ड येईलही. पण कदाचित असं घडेल की तिथल्या थर्ड क्लास संस्था इथे येऊन केवळ परदेशी असल्याचा फायदा ऊठवतील. अनेक विद्यार्थी फॉरेन ब्रँड ला भूलण्याची शक्यता खूपच जास्त आहे. आणि त्यांच्या चकचकीतपणा, जाहिरातबाजी, आर्थिक क्षमता ह्यात स्थानिक विद्यापीठं मागे पडतील.
आत्ताच निराशावादी सूर लावणं चुकीचं आहे. बघूया काय होतंय ते.Saturday, March 13, 2010
मराठी अभिमान गीत
' ळ' आणि 'ण' मला अतिशय प्रिय आहेत. म्हणूनच माझा मित्र जेव्हा बालेवाडी असं न म्हणता बाळेवाडी असं म्हणतो तेव्हा मला ते आवडतं (मूळ नावात 'ल' आहे का 'ळ' आहे हे माहीत नसूनही) आणि म्हणूनच श्रेयस तळपदे स्वतः त्याच्या आडनावाचा ऊच्चार जेव्हा तल्पडे असा करतो तेव्हा मला केवळ फॅशन म्हणून अंगिकारलेल्या त्याच्या इंग्रजी गुलामगिरीची चीड येते. अनेक मराठी पालक जेव्हा आपल्या पाल्याला मराठी कसं धड येत नाही हे कौतुकाने सांगतात तेव्हा मला ते ऐकून खिन्नता वाटते.
सांगायचा मुद्दा की मी मराठी आहे एवढंच न सांगता त्या गोष्टीवर भरभरून बोलत सुटण्याइतका मी मराठी आहे. माझा हा बाणा मी आनंदाने जपला आहे मात्र तो कधी अमराठी लोकांवर लादलेला नाही.ह्या पार्श्वभूमीवर, मी जेव्हा हे ऐकलं की कौशल ईनामदारने अथक प्रयत्नांनी मराठी अभिमान गीत तयार केलं आहे तेव्हा मला खूप आनंद झाला.
असंच एक गाणं 'लख लख चंदेरी' (गीत - श्रीरंग गोडबोले, अप्रतिम संगीत - अजय अतुल, गायक - स्वप्नील बांदोडकर). त्यातलं 'प्रभात आली प्रभात झाली जगती गाजावाजा, बोलपटांचा मुहूर्त ठरला अयोध्येचा राजा' नंतर जेव्हा प्रभात ची तुतारी वाजते तेव्हा प्रभात युगाच्या अनेक वर्ष नंतर जन्मलेल्या माझ्या डोळ्यासमोर त्या युगाची माझ्या कल्पनेतली चित्रं तरळू लागतात. (हेच गाणं यु-ट्यूब वर बघा, ह्याच क्षणाच्या वेळचे हेमा-मालिनी च्या चेहेर्या वरचे भाव, खरंतर कोणत्याही भावाचा अभाव बघा. मराठी नसण्याचा फरक तुम्हाला दिसेल. असो.) गाण्याच्या शेवटी 'मराठी पाऊल पडते पुढे' जेव्हा येतं तेव्हा आपण अभिमानाच्या परमोच्च बिंदूला पोहोचलेलो असतो.
वास्तविक ह्यासारखी अपेक्षा ठेवून महाराष्ट्र गौरव गीताचा काही भाग नुकताच ऐकला. पण निराशा झाली. म्हणजे देवकी पंडीत चं गाणं ऐकायला जावं आणि काही अपरिहार्य कारणास्तव ते नं होता त्याऐवजी वैशाली सामंत ऐकायला मिळाल्यावर जे होईल तसं झालं. कौशल ईनामदार मुलाखतीत म्हणाले की "खूप लोकांचं असं मत आहे की ते ऐकून स्फुरण चढत नाही. पण हे तसं गाणं नाहीच आहे. हे प्रेमळ गीत आहे. भाषेबद्दल असलेल्या प्रेमाचं, ओलाव्याचं." असेल बुवा. कदाचित हा हळुवारपणा माझ्यात कमी असावा.
टीपः
पहा - अजय अतुल चे लख लख चंदेरी
पहा - मराठी अभिमान गीत