सा-रे-ग-म-प ने मागच्या आठवड्यात कार्यक्रमातून स्पर्धेचं स्वरूप काढून टाकलं आणि अनेकांना हायसं वाटलं। हा निर्णय बहुजनहिताय-बहुजनसुखाय असल्याचं दाखवण्यात ही आलं. सर्व स्पर्धकांना, त्यांच्या पालकांना हा निर्णय आवडणं हे समजण्यासारखं आहे. मात्र सगळ्यांनाच महा-अंतिम फेरीची दारं ऊघडून झी-मराठी ने प्रेक्षकांच्या मताला आणि पसंतीला मान दिल्याचा आव आणला आणि प्रेक्षकांना गंडवलं.
ह्या मुलांनी हा रेकॉर्ड केला आहे, सा-रे-ग-म-प च्या इतिहासात हे प्रथमच घडतंय वगैरे डायलॉग्स ऍकून भारावून जाणार्या प्रेक्षकांच्या साधेपणाचा मला हेवा वाटतो. कदाचित फार शंकेखोर स्वभाव असल्याने असेल, पण जे घडतंय ते तसंच असेल हे मानायला सहजासहजी तयार होण्याकडे माझ्या स्वभावाचा कल नाही. सा-रे-ग-म-प आणि झी-मराठी जो निरागसतेचा आव आणतंय तो मला तितकासा पटत नाही.
निर्णयाबाबत न समजणारे काही मुद्दे असे
१. महा-अंतिम फेरी मध्ये पाचच का? सहा का नाही? असं होतं तर शाल्मली ने काय घोडं मारलं? बरं एक आठवड्यापूर्वी परिस्थिती निर्णय घेण्यासारखी होती मात्र पाच जण ऊरल्यावर ती अवघड झाली असा बदल होण्यासारखं विशेष काही घडलं नाही.
२. जर का आज पाच मधून बाद कोण होणार ह्याचा निर्णय करणं शक्य नाही तर अजून काही दिवसांनी पाच मधलं सर्वोत्कॄष्ट कोण हे ठरवणं कसं जमणार आहे?
३. स्पर्धेचं स्व्ररूप "बाद-फेरी" असं होतं आणि केवळ आपला आवडता स्पर्धक बाद होऊ नये म्हणून प्रेक्षक त्याला मत देत होते. म्हणजे "अ" ऐवजी "ब" ने बाद व्हावं म्हणून प्रेक्षक "अ" ला मत देत होते. जर का "अ" आणि "ब" दोघेही अंतिम फेरीत जाणार हे माहित असेल तर देणार्याने एस-एम-एस चे पैसे वाया घालवले असते का? आयडिया ने ह्या प्रकारात किती एस-एम-एस लाटले ह्याचा विचार करा. आजवर ह्या पाचांना, इतर चारांपैकी दुसर्या कोणाही पेक्षा जास्त मत मिळावं ह्यासाठी आलेला एस-एम-एस हा निरूपयोगी ठरला. आयडिया ला पैसे मिळाले. आणि तो आम्ही अंतिम निर्णयासाठी मोजू अशी मखलाशी आता ही मंडळी करत आहेत. पण ही फसवणूकच ठरते.
४. अवधूत वैशाली ह्यांनी निर्णया च्या वेळी एकदम नाटक करणं, तेव्हाच अंतिम स्पर्धेसाठी ठरलेल्या "ज्यूरी" ची मतं दाखवणं हे सगळं पाहता, हे सगळं आयत्या वेळी ठरलं हे दाखवणं म्हणजे गंमत आहे. हा असा निर्णय घेतला जाणार हे खरंतर तेव्हाच दिसत होतं.
कोणी मला माझ्या मते ह्या पाचांचा क्रम लावायला सांगितला तर तो प्रथमेष, आर्या, कार्तिकी, मुग्धा आणि रोहित असा आहे. बाकीच्यांच्या मते क्रम वेगळा असेल. मुद्दा हा आहे की अनेक लोकांच्या मनात एक ठराविक अग्रक्रम पक्का झाला असेल. पाचातलं कोण चांगलं आणि कोण वाईट हे कळतच नाही असं सांगणारे फार असायचं कारण नाही. अनेक बायका साड्यांच्या दुकानात गेल्या की ही घेऊ का ती, अशा प्रश्नात पडतात पण दुकानातून बाहेर पडताना त्या पाच साङ्या घेऊन येत नाहीत कारण प्रकाशात नेऊन, नेसवून, पदर ऊघडून पाहिल्या की साडी बरोबर आवडही ऊलगडत जाते. (एक ही न आणणारी तुम्हाला भेटली असेल तर तुम्ही नशीब काढलंय!) सा-रे-ग-म-प ने प्रेक्षकांना एवढी समज नाही असं गृहित धरलंय.
असं का घडलं असावं ह्याचा अंदाज लावता येऊ शकतो.
१. लोकप्रियता आणि क्षमता ह्याचा मेळ घालणं कठीण होत गेलं. मुग्धाला दे मार एस-एम-एस मिळाले, आर्याला फारच कमी. मग सा-रे-ग-म-प ने हे सांगून टाकलं की ह्या वेळी शेवटपर्यंत परीक्षकांच्या मताला अर्धी किंमत असेल. आता झी ची अशी गोची झाली की लोकप्रिय मुग्धाला किंवा रोहित ला काढलं तर भविष्यातले एस-एम-एस गेले. आणि सक्षम आर्या किंवा प्रथमेष ला काढलं तर कार्यक्रमाची रंगत गेली.त्यापेक्षा त्यांनी एकदम सोपा ऊपाय काढला.
२. स्पर्धकांच्या यशाच्या आणि लोकप्रियतेच्या व्यावसायिकरणाची संधी. पाचही स्पर्धक पुढे नेऊन ती अधिकाधिक होतेय. ह्या आधी कोणत्याच स्पर्धेला ईतकं यश आणि लोकप्रियता मिळाली नाही. कोसंबी-अनघा-बोरगावकर, राघवन-ओक, ४० शीतलीमंङ़ळी .. आठवून पहा, एवढी लोकप्रिय झाली नाहीत. आता हे लोणी निसटू देणं झी आणि आयडिया ला पटलं नसावं.
ह्या अशा व्यावसायिक गोष्टींमुळे हा निर्णय घेण्यात आला असं मला वाटतं. झी, आयडिया आणि त्यांची धेडगुजरी मराठीत बोलणारी पल्लवी ह्यांनी हे सगळ्या प्रेक्षकांच्या आवडीने करण्यात आलंय असा ऊपकाराचा कितीही आव आणू दे.
तुका लोकी निराळा
8 years ago