आयडिया सा रे ग म प हा सध्या त्यातील अतिशय गुणी आणि दर्जेदार बाल-कलाकारांमुळे गाजतो आहे. त्यांच्या प्रतिभेबद्दल कोणालाच यत्किंचितही शंका असण्याचं कारण नाही. मात्र ह्या मुलांचं साधन करून अनेक मंडळी आपल्या भांडवलाची सोय करणार आणि ह्या एका स्पर्धेतून अनेक वेगळ्याच स्पर्धा जन्माला येतील असं एकंदर दिसतंय.
ह्या स्पर्धेला प्रांतिक स्वरूप असणं हे अपेक्षितच आहे. आपल्या जिल्ह्यातल्या, शहरातल्या, गावच्या स्पर्धकांना लोक मत देणार ह्याचा व्यावसायिक फायदा टेलिकॉम कंपन्या घेणार आणि त्याचा कोणाला आक्षेप नसावा. पण ह्या मुलांचं कौतुक करणार्यांची एक स्पर्धा सुरु झाली आहे. मुग्धा ला रायगड गौरव पुरस्कार मिळाला, झालं मग प्रथमेश ला कोकण गंधर्व, आर्या ला माणिक वर्मा अशी रीघ लागली. परवाच कार्तिकी आणि रोहित राऊत ला ही त्यांच्या प्रांताने असे पुरस्कार दिले. हे सगळं इतक्या सहज आणि पटापट की एकाला चॉकलेट मिळालं म्हणून बाकीच्यांचा हट्ट पुरवण्यासारखं झालं. त्यात तो हट्ट त्या मुलांचा नाहीच मुळी. ह्ट्ट "आमास्नी पन हे पायजेलाय" म्हणत प्रांताचं सांस्कृतिक राजकारण खेळणार्यांचा आहे.
नवीन बातमीनुसार शाल्मली सुखटणकर हिला सारस्वत बँकेने "बाल-अग्रदूत" नेमलं आहे - बाल अग्रदूत’ म्हणून बँकेतर्फे तिला पुढील पाच वर्षांसाठी करारबद्ध करण्यात येणार आहे. तिला मिळणारी रक्कम ही शिष्यवृत्तीच्या स्वरूपातील असेल. मात्र या शिष्यवृत्तीची रक्कम गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. शाल्मलीच्या पुढील प्रगत संगीत शिक्षणाचा सारा खर्च यापुढे बँकेतर्फे करण्यात येईल. संगीत शिक्षण आणि सराव, रियाझ यासाठी आवश्यक असणाऱ्या वाद्यांचा खर्चही बँकच उचलेल. त्याशिवाय एखाद्या राजदूताप्रमाणेच तिची बडदास्त ठेवण्यात येईल. तिच्यासाठी साऱ्या सोयीसुविधा पंचतारांकित असतील. विमानप्रवास, चालकासहित वाहन, पंचतारांकित वास्तव्याची व्यवस्था आदींचा त्यात समावेश असेल. असे बँकेच्या सूत्रांनी सांगितले.
माझ्या मते आता बाकी स्पर्धकांना अग्रदूत बनवण्याची स्पर्धा लागेल. एखाद्याच्या लोकप्रियतेचं भांडवल करून आपला कार्यभाग कसा साधावा हे माहित असणारे ईथे अनेक आहेत.
तुका लोकी निराळा
8 years ago
No comments:
Post a Comment