Monday, January 12, 2009

वसंतोत्सव आणि सा-रे-ग-म-प स्पर्धकां संबंधी

ह्या वर्षी मी वसंतोत्सवाला गेलो नाही. जावसं वाटलं नाही. मागच्या वर्षी आलेला अनुभव आणि इतर काही संबंधीत विचार, ही कारणं. कदाचित काही वाचकांना पटावीत.

१. मागच्या वसंतोत्सवात नाना ने वाजवीपेक्षा जास्त बोलून बोअर केलं. निदान मला तरी बोअर झालं. त्यात त्याने प्रेक्षकांचा अपमान केला. एका श्रोत्याने "वन्स-मोअर" दिला. नाना म्हणाला "केवळ आपण तिकिट काढलंय ह्याचा अर्थ आपण काहीही फर्माईश करावी का? आधी स्वतः काहीतरी होऊन दाखवा." मला कळलं नाही. म्हणजे काय? एकतर हा श्रोता त्याच्या पेशात, क्षेत्रात मोठा नसेल कशावरून? समजा नसला, तरी पैसे देऊन कार्यक्रमाला आल्यावर वन्स मोअर द्यायचा त्याला हक्क नाही? आणि नसेल तर त्याचा असा अपमान करण्याचा अधिकार पाटेकरांना कोणी दिला? नाना हा कलाकार म्हणून श्रेष्ठ आहे ह्यात काहीच वाद नाही. पण एकंदर अशा बडबडीमुळे एकंदर कार्यक्रमाविषयीचा आदर कमी झाला.
२. राहुल देशपांडे च्या गाण्याला मागे साथीला डॉ. विजय कोपरकर बसले होते. राहूल हा वसंतरावांची सगळीच गाणी हूबेहूब आणि छान म्हणतो. पण अभिजात शास्त्रीय संगीतामध्ये त्याला बराच पल्ला अजून गाठायचा आहे. मला तरी हे हरभजन सिंग ने सचिन तेंडूलकरला रनर म्हणून घेतल्यासारखं वाटलं.
३. सवाई गंधर्व शी स्पर्धा. ती जरूर असावी आणि करावी. पण किती कराल, आणि किती घाई? विकिपीडीयाच्या पूणे पेज वर भला मोठा भाग "वसंतोत्सव" वर टाकाल? माझ्या मित्राने चीड येऊन तो ताबडतोब काढून ही टाकला. (हे एक विकिपीडीयाचं खूप छान आहे).
४. सा-रे-ग-म-प च्या बालकलाकारांचा कार्यक्रम आयोजित करणं. बरेच जण म्हणतील की ह्यात चूक ते काय? तसं पाहिलं तर काहीच नाही. आपला कार्यक्रम यशस्वी ठरावा आणि त्याने गर्दी खेचावी ह्या साठी वसंतोत्सव ने सर्वतोपरी प्रयत्न केले तर त्यात काहीही वावगं नाही. हे बालकलाकार गातात छानच. पण त्यांना आपण किती गायला लावावं? दर आठवड्याला गाऊन गाऊन त्यांचा आवाज थकलेला अधून-मधून जाणवतो. भारतीय क्रिकेट टीम ची मध्ये जशी क्रिकेट बोर्डाने एकामागोमाग एक वन-डे सिरीज खेळायला लावून अवस्था केली तसंच हे होतंय.

ही मुलं प्रचंड क्षमता आणि आकलन शक्ती घेऊन जन्माला आली आहेत. ईथून पुढची त्यांची वर्ष ही सरावाची आहेत. स्वतःचा आवाज, शैली शोधण्याची आणि तयार करण्याची आहेत. ते आपण त्यांना करू दिलं तर आपल्या आवाजाने ते पुढची अनेक तपं रसिकांची सेवा करतील. मात्र आपण त्यांना आत्ताच ह्या व्यावसायिक स्पर्धेत ओढलं तर त्यांचं करियर दाजीबासारखी चार गाणी आणि ऊरलेला वेळ ती ऑर्केस्ट्रा मधून गात राहणं ह्याच्या पलिकडे जाणार नाही. कदाचित आज वसंतराव असते तर वाडकरांसारखाच् ह्या मुलांनी अजिबात कार्यक्रमांच्या फंदात न पडता अभ्यास चालू ठेवावा असा सल्ला त्यांनी दिला असता. मात्र एवढी बांधिलकी दाखवणं वसंतोत्सवाने गरजेचं मानलं नसावं.

कार्यक्रम सुंदर झाला असं लोकसत्ता मधून वाचण्यात आलं.

1 comment:

  1. येथे मांडलेल्या विचारांशी पूर्ण सहमत आहे. मागच्या वर्षी आसनव्यवस्थे संबंधी mismanagement हा एक मुद्दा येथे add करावासा वाटतो. दोन तास लवकर जाऊनही रांगेतून (?) आत पोहोचलो तेव्हा कार्यक्रम सुरु झाला होता. मीही याच सर्व कारणांमुळे यावर्षी जायचे नाही असा निर्णय घेतला. वेळेची management नसल्याने किशोरी आमोणकर यांचे गाणे थोडक्यात आटोपते घ्यावे लागले.

    राहुल देशपांडे पुण्यात कार्यक्रम असून व बहुतेक प्रेक्षक मराठी असून हिंदीमध्ये का बोलत होते तेही कळले नाही..

    नितीन देसाई यांनी स्टेज सुंदर उभारले होते.. पण इतका खर्च अनाठायी वाटला.

    सा रे ग म प च्या बाल कलाकारांना दर आठवड्याला जेथे कुठे जाऊन गायला लागते आहे ते दिसतेच. त्यांच्यावर त्यामुळे फ़ार ताण येतो हे जाणवते.

    ReplyDelete