Friday, January 2, 2009

ऍक्टिंग कशाशी खातात?

परवा आमच्या एका जिवलग मित्रामुळे आम्हाला सिनेतारकांनी खचखचलेली एक पार्टी अटेंड करण्याचा योग आला. (ज्या मित्रांमुळे असे योग येतात ते सगळे जिवलग) तिथे अनेक ओळखीचे चेहेरे भेटले. आम्ही संधीचा फायदा साधून एक प्रश्न काही जणांना विचारला. ऍक्टिंग कशाशी खातात? हा तो प्रश्न. आम्हाला मिळालेली रंजक ऊत्तरं खाली देत आहोत.

शाहरूख : वेल, मी शूटींग मध्ये बिझी असल्याने माझं खाणं, पिणं, रूटीन सगळं काही ग्वॉरी च बघते. खाण्याचं तिलाच विचारा. (ह्यानंतर तोतरं हसून तो निघून गेला)

सलमान खान : ते त्यात किती कॅलरीज आहेत त्यावर अवलंबून आहे.

ह्रितीक रोशन : माझं फिटनेस रूटीन मी सल्लूच्या सल्ल्याने ठरवतो. त्याचं ऊत्तर तेच माझं.

ऍश्वर्या : खरंतर ह्या प्रश्नाचं ऊत्तर अमितजींच्या सहवासात राहिल्याने मिळेल म्हणून मी इकडच्या स्वारीशी लग्न केलं. पण अजून काही ऊत्तर सापडलेलं नाहीये. आणि त्यात तुम्ही मराठीत प्रश्न विचारताय, आम्ही यू.पी. वाले आहोत हे माहीत असूनही.

रणवीर कपूर : ऊगाच काहीतरी निरर्थक विचारू नका. हे माहित असणं दिग्दर्शकांचं काम आहे.

दिपीका पदुकोण : व्हाय शूड आय केअर?

तेवढ्यात आम्हाला श्रेयस तल्पडे (असा ऊच्चार करायचा असतो म्हणे) दिसला. त्याच्याकडून ऊत्तराची अपेक्षा होती. पण "नंतर भेटा, सविस्तर सांगतो. आत्ता घाईत आहे. ही मंडळी पुढे गेली वाटतं" असं सांगून तो शाहरूख, ग्वॉरीच्या दिशेने पळाला.

आम्ही काय विचारतोय ह्याची बातमी पोहोचल्याने स्वतःहूनच सचिन पिळगावकर आले. त्यांनी "त्या काळी राजा परांजप्यांना एका लहान मुलाच्या भूमिकेसाठी ... " अशी आम्ही पन्नास वेळा ऐकलेली टेप लावली. लिहून घेताघेता पेनमधली शाई संपली असं दाखवत आम्ही दुसरं पेन आणायच्या निमित्ताने पळालो. तिथे आमीर खान ऊभा होता. त्याला आम्ही विचारलं तेव्हा तो म्हणाला की "तसं हे सांगायला खूप वेळ लागेल. बस, दाढी करता करता सांगतो." आमच्या खिशात मोजून परतीच्या तिकिटाचे पैसे असल्याने आमीर कडून साधी मिशी कापून घेणं परवडणार नाही हे लक्षात आल्याने "आलोच" सांगून आम्ही परत सटकलो.

कोपर्‍यावर आमच्या प्रश्नाचं नेमकं ऊत्तर ठावूक असलेल्या मंडळींचं कोंडाळं दिसलं. पण त्यांच्याकडे फिरकायला काही कारणच नव्हतं. त्यांची ऊत्तरं छापली तर ह्या ब्लॉग ला ग्लॅमर कसं मिळेल? असली डाऊनमार्केट कामं आपण नाही करत.

2 comments: