Wednesday, December 3, 2008

तुम्हाला मराठी शिव्या येतात का?

येत नसतील तर पाठ करा कारण तसं असेल तरच तुम्ही पक्के मराठी आहात असं सिद्ध होतं. वानगीदाखल हे वाचा.

इंग्रजी वृत्तपत्राचा एक वार्ताहर मुंबईत घर नसल्यामुळे आमदार निवासात एका आमदाराच्या खोलीत राहतो. गोरापान, उंचापुरा असलेल्या हा पत्रकार सिक्‍स पॉकेट्‌स जीन्स आणि पाठीवर सॅक अशा वेशात रविवारी रात्री नेहमीप्रमाणे साडेअकराच्या सुमारास ऑफिसवरून आमदार निवासात प्रवेश करीत होता. त्याची देहयष्टी आणि कपड्यांकडे पाहून सुरक्षारक्षकांना संशय आला. तळमजल्यावरच त्यांनी त्याला हटकले. कुठे चाललात, काय काम आहे, अशा प्रश्‍नांची सरबत्ती केली.

त्यावर त्याने आपण पत्रकार असल्याचे सांगून ओळखपत्र दाखविले। त्यावरही सुरक्षारक्षकांचे समाधान झाले नाही. त्यांनी त्याला मराठी बोलता येते काय, तुझे गाव कुठे आहे, असे विचारले. त्याने मराठीत उत्तर देत गावाचे नाव सांगितले. सुरक्षारक्षकांना त्याचे ग्रामीण ढंगातील मराठी बोलणे थोडे खटकले. त्यांनी त्याला मराठीत शिव्या देता येतात काय, असा सवाल केला. त्याने मराठीतील एक सौम्य शिवी म्हणून दाखविली. तरीही सुरक्षारक्षकांचा संशय काही संपेना. त्यांनी त्याला एखादी कचकचीत मराठी शिवी म्हणून दाखव, असे सांगितले. त्याने तशी कचकचीत शिवी हाणली तेव्हा कुठे सुरक्षारक्षकांचा संशय संपला. त्यांनी मोठ्याने व्वा! अशी त्याच्या पाठीवर थाप मारत खरा मराठी आहेस म्हणत सध्याच्या धामधुमीच्या काळात सुरक्षेचा प्रश्‍न आहे. आमच्या डोक्‍यावरही वरिष्ठांची टांगती तलवार आहे. त्यामुळे हे सर्व करावे लागते बाबा, म्हणत अखेर त्याला प्रवेश दिला.


2 comments:

  1. मस्त किस्सा...खरा आहे काय? काही भरवसा नाही आजकाल

    ReplyDelete
  2. च्या ### ! लयच भारी .... आमच्यासारख्याला तर बंगलाच मिळाया पायजे...

    आंदळं दळतयां आन् कुत्रं पिट खातया....कसं ?

    ReplyDelete