ऊर्ध्वश्रेणीकरण ह्या शब्दाची ओळख करून दिल्याबद्दल धोंडोपंत आपटे ह्यांचे आभार. खरंच छान शब्द आहे. ह्या निमित्ताने विचार आला की आपला आवडता शब्द कोणता?तसे अनेक छान शब्द आहेत आपल्या भाषेत. "एकसमयावच्छेदेकरून" सारखी भारदस्त मंडळी त्यात आहेत, "हळूहळू" सारखे ऊच्चारातून अर्थ ध्वनित करणारी मंडळी आहेत. (ळ मुळे हा शब्द पटकन म्हणता येत नाही, पटकन सारखा). पण आमच्या ल़क्षात आलं आहे की, आमचा सर्वात आवडता शब्द आहे "फुकट".
हा शब्द आम्हाला सर्वात जास्त आनंद देऊन जातो. एखाद्या गोष्टीला फुकट हे विशेषण लागलं की आम्ही हर्षमुदीत होतो. काही नाठाळ मंडळी आम्हाला "फुकटे" असं तुच्छतेने म्हणतील. पण आम्ही त्यांकडे दुर्लक्ष करतो. जे आहे ते आहे - आपण ऊगाच खॉटे आव आणत नाही. अगदी एक शब्द म्हणून सुद्धा "फुकट" ला स्वतंत्र अस्तित्त्व आहे. आम्ही असं म्हणतो कारण त्याचा इंग्रजीतला प्रतीशब्द बघा. free ह्याचे दोन अर्थ होतात. मुक्त किंवा फुकट. त्यामुळे फुकट ह्या अर्थी तो वापरायचा असला तर ऊगाच free as in free beer अशी लांबड लावावी लागते. फुकट चं तसं नाही. आपला अर्थ समजावा ह्या साठी त्याला बाकी शब्दांच्या कुबड्या घ्याव्या लागत नाहीत.
आमच्या खटल्याला, हे अजिबात आवडत नाही. म्हणजे बाकी आमचं काही आवडतं अशातला भाग नाही. पण "फुकट" असं ऐकल्यावर आपल्याला बरं वाटतं, असं आम्ही म्हणालो की ते "श्श्शीईईई" असं करून फणकारतं. खरंतर, आमच्या सारखं रत्न तिच्या नशिबात हुंड्याचा एक पैसा ही ख्रर्च न करता, फुकट पडलं आहे. पण किंमत नाही.
फुकट गोष्टींची किंमत मुळी नसतेच, तसंच त्या बिचार्या शब्दाचं झालं आहे. मग ऊर्ध्वश्रेणीकरण सारखे प्रतिस्पर्धी भाव खाऊन जातात. वास्तविक तुमच्या संगणकातील हार्डवेअरच्या प्रोसेसर आणि रॅम चं ऊर्ध्वश्रेणीकरण कोणी तरी फुकट करून देतंय अशी कल्पना करा, आणि मग सांगा, आहे की नाही हा शब्द आनंददायी?
तुका लोकी निराळा
8 years ago
No comments:
Post a Comment