आमच्या काही निरूद्योगी आणि नाठाळ मित्रांनी नुकतेच आम्हाला नवीन वर्षाचे आगमन साजरे करण्यासाठी एकत्र जमण्यास निमंत्रण दिले. वास्तविक सद्य परिस्थितीत काहीही साजरं करण्याच्या आम्ही विरूद्ध आहोत. अरे परिस्थिती काय, पार्टी कसली करता? मात्र, आमचे मित्र ही ह्याच विचाराचे असल्याने २००८ चं एकत्रित सिंहावलोकन करण्यासाठी आम्ही जमू. पार्टी नाही करणार. असो. तर १ जानेवारी हा नववर्षाचा पहिला दिवस धरावा का हा प्रश्न आमच्या मराठी आणि भारतीय मनास शिवला आणि आम्ही ताबडतोब आंतरजालावर पृच्छा केली. सनातन प्रभात द्वारे लगेचच शंकेचं निरसन झालं. (पहा : http://dainiksanatanprabhat.wordpress.com/)
नववर्षाच्या उत्पत्तीबद्दल मिळालेले ज्ञान
अ. नववर्षाच्या उत्पत्तीच्या वेळी कालचक्रातून क्रियालहरींचे प्रक्षेपण होऊन सृष्टीधारणा नवचेतनेने भारित होत असणे व नववर्षारंभ साजरा करणे, म्हणजेच या लहरींना ग्रहण करून धर्मशक्तीच्या तेजाच्या माध्यमातून सृष्टीरूपाला धर्मतेज पुरवणे, तसेच या माध्यमातून स्वत:ची व समाजाची उन्नती करून घेणे नववर्षारंभ गुढीपाडव्याऐवजी १ जानेवारीला साजरा करणे अयोग्य का ?
आम्हाला किती सोपे प्रश्न पडतात ह्याची आम्हाला लाज वाटली. कालचक्रातून क्रियालहरींचे प्रक्षेपण होऊन सृष्टीधारणा नवचेतनेने भारित होत असणे, वगैरे गोष्टी आमच्या वैचारिक शक्तींच्या पलिकडे आहेत. आणि त्याचं ऊत्तर वाचून तर आम्ही दिग्मूढ झालो. संपूर्ण ऊत्तर येथे देत नाही. ते वाचून झाल्यावर शुदधीवर येण्यासाठी आम्हाला १२ घटिका आणि १० पळे लागली. आजूबाजूचे सर्व सहकारी हातात चप्पल घेऊन धावले (हुंगवायला हो!) त्यामुळे ऑफिसमध्ये ठणाणा झाला तो वेगळाच.
काही भाग बघा.
कालपोकळीत आतापर्यंत दिसलेली कालचक्रे वगैरे सर्व गोष्टी काळाची प्रत्यक्ष निर्मिती व संचारण यांच्याशी संलग्न आहेत. समष्टीच्या इच्छाशक्तीच्या बळावर कनिष्ठ, म्हणजेच सगुण स्तरावरच्या काळाची निर्मिती होऊन प्रत्यक्ष सगुणत्व स्वरूपातून सगुणत्व काळाच्या क्रियारूपाच्या अनुषंगाने सगुण स्तरावरील काळरूप घटनाचक्र गतीमान होऊन कार्य करते. अशा प्रकारे होणारी काळाची निर्मिती, हे काळाच्या स्थितीरूप संचारणाशी निगडित असल्यामुळे ब्रह्मांडाच्या कालचक्राच्या स्थितीरूपाच्या संचारणात्मक भागात ब्रह्मांडाच्या स्तरावरील काळाच्या अनुषंगाने पृथ्वीवरील काळाच्या घटक स्वरूपातून सगुणत्वरूपी काळाची निर्मिती होते.
अरे-बापरे ! अगबाईअरेच्चा ! अग्गोबाई-ढग्गोबाई ! काय हे? एकंदरीत काहीतरी वाईट आहे १ जानेवारी ला नववर्ष मानणे. त्यामुळे आम्ही ताबडतोब आमच्या सर्व मित्रांना हा लेख ईमेल ने पाठवला आहे. आणि आता आम्ही ह्या लेखात विखुरलेल्या अनंत ज्ञान-कणांवर चर्चा आणि ऊहापोह करण्यासाठी, ३१ डिसेंबरच्या रात्रौ जमण्याचे ठरवलेआहे.
तुका लोकी निराळा
8 years ago
No comments:
Post a Comment